साच न करवे पितृवचन ॥ व्यर्थ काय जन्मास येऊन ॥ विगतधवेचें सुंदरपण ॥ किंवा ज्ञान दांभिकाचें ॥५१॥
कीं वोडंबरीचें शूरत्व जाण ॥ कीं अजाकंठींचें जैसे स्तन ॥ कीं नटामाजील कामिन ॥ कीं कंटकवन सधन पैं ॥५२॥
कीं जन्मांधाचे विशाळ नेत्र ॥ कीं मद्यपियाचें अपवित्र पात्र ॥ कीं अदात्याचें उंच मंदिर ॥ व्यर्थ काय जाळावें ॥५३॥
यालागीं पुत्र तोचि धन्य ॥ जो साच करी पितृवचन ॥ तरी मज वना जावयालागून ॥ आज्ञा देईं अंबे तूं ॥५४॥
म्हणोनि श्रीरामें धरिले चरण ॥ उभा राहिला कर जोडून ॥ धबधबां वक्षःस्थळ बडवून ॥ कौसल्येनें घेतलें ॥५५॥
नगरीं जेव्हां फुटली मात ॥ कीं वना जातो श्रीरघुनाथ ॥ वर्तला एकचि आकांत ॥ पडिले मूर्छित लोक तेव्हां ॥५६॥
कौसल्या म्हणे रघुनंदना ॥ सुकुमारा जगन्मोहना ॥ माझी मोडोनियां आज्ञा ॥ कैसा वना जातोसी ॥५७॥
श्रीरामासी म्हणे लक्ष्मण ॥ मज आज्ञा देईं अणुप्रमाण ॥ कैकयीचें शिर छेदून ॥ संतोषवीन सकळांसी ॥५८॥
रघुपति तूं वना जातां व्यर्थ ॥ प्राण त्याजील दशरथ ॥ राज्य बुडेल समस्त ॥ अयोध्या ओस होईल ॥५९॥
परम प्रेमळ बंधु भरत ॥ तो राज्य न करील यथार्थ ॥ इचा वध करितां सत्य ॥ तोही सुख पावेल ॥६०॥
सकळ अनर्थांचें कारण ॥ कैकयी असत्याचें भाजन ॥ इजला टाकितां वधून ॥ सकळ जन आनंदती ॥६१॥
जैसी समूळ टाकितां दुर्वासना ॥ साधक पावती आत्मसदना ॥ कीं रजनी सरतां सकळ जनां ॥ सूर्योदयीं आनंद ॥६२॥
मग बोले श्रीराम ॥ प्राणांत जाहलिया विपरीत कर्म ॥ सहसा न करावें हें वर्म ॥ हृदयीं धरीं लक्ष्मणा ॥६३॥
कौसल्या सुमित्रा जैशा माता ॥ तैशीच कैकयी जाण तत्वतां ॥ तियेचा वध करितां ॥ मग यश कैचें आम्हांतें ॥६४॥
लक्ष्मण म्हणे श्रीरामातें ॥ तरी मज न्यावें सांगातें ॥ नाहीं तरी प्राण त्यागीन येथें ॥ मग तूं वना सुखें जाय ॥६५॥
तों सुमित्रा म्हणे रघुनंदना ॥ माझा लक्ष्मण नेईं वना ॥ सेवील तुझिया निजचरणां ॥ प्रेमभावेंकरूनियां ॥६६॥
रामा तुजवेगळा एक क्षण ॥ सर्वथा न राहे लक्ष्मण ॥ वनीं फळें जीवन आणून ॥ शय्येसी तृण निजावया ॥६७॥
तुझी सेवा करील परिकर ॥ तेणें आनंद मज थोर ॥ ऐसें बोलतां सुमित्रेचें नेत्र । प्रेमोदकें भरून आले ॥६८॥
मग उर्मिलेचें समाधान ॥ करूनियां लक्ष्मण ॥ सिद्ध जाहला प्रयाण ॥ वनाप्रति करावया ॥६९॥
कौसल्या म्हणे रघुनंदना ॥ बारे मज टाकूनि जासी वना ॥ कांटे पाषाण तुझिया चरणां ॥ चालतां रज खुपतील ॥७०॥
जडितांबरें सर्व सांडोनि ॥ कैसा राहशील वल्कलें वेष्टुनि ॥ भ्रमरपर्यंक त्यजोनि ॥ भूमिशयनें केंवि करिशी ॥७१॥
त्यजूनि रत्नजडित कोटीर ॥ कैसा राखसी जटाभार ॥ रामा तुझी तनु सुकुमार ॥ वातउष्णें श्रमेल कीं ॥७२॥
सुगंध परिमळ त्यजूनि परम ॥ कैसें चर्चिसी भस्म ॥ वनीं राक्षस दुर्धर परम ॥ छळावया तुज येतील ॥७३॥
वनीं सांडपसी तूं जगजेठी ॥ म्ग तुझी कोण राखील पाठी ॥ शोकें कौसल्या हृदय पिटी ॥ म्हणे काय करूं आतां ॥७४॥
मग औषधी मोहरे अनेक आणुनी ॥ रामाचे दंडीं बांधीं जननी ॥ रामासी पाणी लागेल वनीं ॥ औषधीमणी कबरीं बांधी ॥७५॥
वनीं दृष्टावेल रघुनाथ ॥ म्हणोनि मोहरे करीं बांधित ॥ कांही एक पीडा न होय यथार्थ ॥ ऐशा वस्तु देत माता ॥७६॥
ते आदिपुरुषाची जननी ॥ वनसी निघतां चापपाणी ॥ पंचभूतांसी कर जोडोनी ॥ प्रार्थना करी भावार्थें ॥७७॥
धरणीस कौसल्या विनवीत ॥ माते तुझा श्रीराम जामात ॥ यासी रक्षीं यथार्थ ॥ निजस्नेहेंकरूनियां ॥७८॥
ज्या पंथें जाईल कमलपत्राक्ष ॥ रक्षो यासी सर्वदा ॥७९॥
रातोत्पलें कमलें पूर्ण ॥ त्यांहून सुकुमार रामचरण ॥ त्याचिया चरणीं खडे पाषाण ॥ रुतों नेदीं अवनीये ॥८०॥
उदकासी कौसल्या म्हणत ॥ रघुवीर होईल तृषाक्रांत ॥ नदी सरोवरें समस्त ॥ पूर्णोदकें ठेवीं कां ॥८१॥
म्हणे विश्र्वप्रकाश चंडकिरणा ॥ तूं रक्षीं आपले कुलभूषणा ॥ तुझीं किरणें मनमोहना ॥ स्पर्शो नेदीं सर्वथा ॥८२॥
लोकप्राणेशा प्रभंजना ॥ लघु माझिया रघुनंदना ॥ तुझिया गुणें धुळी नयनां ॥ माजी न जावी सर्वथा ॥८३॥
उष्णें शिणतां रघुनाथ ॥ तूं मंद मंद येई मारुत ॥ जेणें सुखावे अवनिजाकांत ॥ करीं ऐसें प्राणेशा ॥८४॥
अंबरा तूं निर्विकार पाहीं ॥ शब्दविषय तुझे ठायीं ॥ मंजुळ शब्द तुझे हृदयीं ॥ अंडज करोत सर्वदा ॥८५॥
ब्रह्मा शिव इंदिरावर ॥ अष्ट दिक्पाल एकादश रुद्र ॥ नव ग्रह वसु द्वादश मित्र ॥ माझा रघुवीर रक्षोत ॥८६॥
देव उपदेव कर्मज देव ॥ पाताळभोगी सर्प मानव ॥ जलचर जलार्णव ॥ माझा रघुवीर रक्षावा ॥८७॥
चराचर प्राणी जे वहिले ॥ चहूं खाणींमाजीं जन्मले ॥ वेदशास्त्रें पुराणें सकळें ॥ ब्रह्म सांवळे रक्षोत ॥८८॥
कर जोडोनि कौसल्या सती ॥ चराचर जीवांसी प्रार्थिती ॥ परी हा आदिपुरुष रघुपति ॥ नेणवेचि तियेतें ॥८९॥
जो दानवकुळवैश्र्वानर ॥ साधुहृत्प्रमच्छेदक दिवाकर ॥ नेणें साचार कौसल्या ॥९०॥
जो अरिचक्रावारणपंचानन ॥ कीं दुःख पर्वतभंजन सहस्रकिरण ॥ कीं विघ्नफणिपाळ विदारून ॥ त्यावरून ॥ त्यावरी सुपर्ण रघुवीर ॥९१॥
तो सज्जनचकोरामृतकर ॥ भक्तचातकसजलजलधर ॥ कीं साधुनयनाब्जमित्र ॥ तो हा साचार अवतरला ॥९२॥
असो याउपरी कौसल्या म्हणत ॥ चतुर्दश वर्षेंपर्यंत ॥ व्यर्थ देह हा प्रेतवत ॥ कैसा पाळूं मी आतां ॥९३॥
कैसें पूर्वकर्म गहन ॥ फळा आलें मुळींहून ॥ अमलदलराजीवनयन ॥ वनास जातो ये वेळे ॥९४॥
तूं वना जातोसी रघुनंदना ॥ स्तनीं दाटला प्रेमपान्हा ॥ माझ्या विसाविया मनमोहना ॥ गुणनिधाना जाऊं नको ॥९५॥
श्रीरामा भुवनसुंदरा ॥ डोळसा सुकुमारा राजीवनेत्रा ॥ मुनिजनरंजना गुणसमुद्रा ॥ जाऊं नको वनातें ॥९६॥
हृदयीं नसतां रघुनंदन ॥ संपत्ती त्या विपत्ती जाण ॥ कळा त्या विकळा संपूर्ण ॥ विद्या होत अविद्या ॥९७॥
श्रीरामाविण करिती कर्म ॥ तोच तयांस पडला भ्रम ॥ सच्चिदानंद मेघश्याम ॥ मज टाकूनि जातो कीं ॥९८॥
तंव देववाणी गर्जिन्नली पाहीं ॥ सर्वांठायीं राम विजयी ॥ कल्पांतीं तयासी भय नाहीं ॥ हा शेषशायी अवतरला ॥९९॥
जैसा जीव जातां वैद्य येऊन ॥ म्हणे मी तुज वांचवीन ॥ तैसे मायेस वाटलें पूर्ण ॥ आकाशवाणी ऐकतां ॥१००॥