अध्याय सातवा - श्लोक ५१ ते १००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


विश्र्वामित्र म्हणे स्वस्थ करा मन ॥ मानव नव्हे रघुनंदन ॥ पुराणपुरुष आदिनारायण ॥ राक्षस वधावया अवतरला ॥५१॥

तों पर्वत आणि पाषाण ॥ यज्ञमंडपावरी पडती येऊन ॥ हाक फोडिती दारुण ॥ मग रघुनंदन काय करी ॥५२॥

कोदंड ओढून आकर्ण ॥ सोडी बाणपाठीं बाण ॥ राक्षसांचीं शिरें करचरण ॥ तटातटां तुटताती ॥५३॥

राक्षस परम अर्तुबळी ॥ ज्यांहीं सुरांचे मुकुट पाडिले तळीं ॥ हाक देती अंतराळीं ॥ यज्ञमंडप वेढिला ॥५४॥

एक उडती अंबरीं ॥ प्रेतें टाकिती यज्ञकुंडावरी ॥ मग रघुत्तम अयोध्याविहारी ॥ सर्वद्वारीं व्यापिला ॥५५॥

जिकडे तिकडे रघुनंदन ॥ चारी द्वारें अष्टकोन ॥ अष्टदिशा व्यापोन ॥ सोडी बाण श्रीराम ॥५६॥

मंडपाचिया कळसावरी ॥ उभा राम कोदंडधारी ॥ बाणांचा पर्जन्य तये अवसरीं ॥ चहूंकडोन पाडितसे ॥५७॥

रामरूपें असंख्यात ॥ यागमंडपाभोंवते वेष्टित ॥ बाणांचे पूर वर्षत ॥ संहार होत असुरांचा ॥५८॥

मंडपावर आणि खालतें ॥ सर्व व्यापिलें रघुनाथें ॥ तीळ ठेवावयापुरतें ॥ रामाविण रितें स्थळ नसे ॥५९॥

तृणीरांतूनि किती निघती शर ॥ शेषासी त्याचा न कळे पार ॥ कीं लेखकापासूनि अक्षरें ॥ किती निघती कळेना ॥६०॥

कीं मुखांतूनि शब्द निघती ॥ त्यांची जैशी न होय गणती ॥ कीं मेघधारा वर्षती ॥ नाहीं गणती तयांची ॥६१॥

महाकवीची पद्यरचना ॥ किती जाहली हें कळेना ॥ कीं कुबेरभांडारींची गणना ॥ कदा न कळे कोणातें ॥६२॥

मेरुपाठारीं रत्नखाणी निश्र्चिती ॥ त्यांतून रत्नें जैशीं निघती ॥ कीं पृथ्वीवर तृणांकुर किती ॥ नाहीं गणती तयांची ॥६३॥

कीं शास्त्रसंमतें अनेकार्थ ॥ असंख्य करिती निपुण पंडित ॥ तैसा रामबाणांसी नाहीं अंत ॥ तूणीर निश्र्चित रिता नोहे ॥६४॥

मेघ समुद्रजळ प्राशितां ॥ परी तो रिता नाहे तत्त्वतां ॥ कीं विष्णुमहिमा वर्णितां ॥ न सरे सर्वथा कल्पांतीं ॥६५॥

तैसा उणा नोहेचि तूणीर ॥ कोट्यानकोटी निघती शर ॥ करीत राक्षसांचा संहार ॥ समरधीर श्रीराम ॥६६॥

जैसी जाहलीया प्रभात ॥ वृक्षाहूनी पक्षी उडती बहुत ॥ तैसीं राक्षसशिरें अकस्मात ॥ आकाशपंथें उसळती ॥६७॥

वीस कोटी राक्षस देख ॥ एकला राम अयोध्यानायक ॥ परी ते मृगेंद्रावरी जंबुक ॥ अपार जैसे उठावले ॥६८॥

कीं दंदशूक मिळोन अपार ॥ धरूं आले खगेश्र्वर ॥ कीं प्रळयाग्नीवरी पतंगभार ॥ विझवावया झेंपावती ॥६९॥

कीं बहुत मिळून खद्योत ॥ धरून आणूं म्हणती आदित्य ॥ कीं शलभ मिळोनि समस्त ॥ महामेरु उचलूं म्हणती ॥७०॥

एकलाचि फरशधर ॥ परी अवनि केली निर्वीर ॥ एकले नृसिंहें संभार ॥ आटिले पूर्वी दैत्यांचे ॥७१॥

असो राक्षसशिरांच्या लाखोल्या ॥ रामें भूलिंगासी समर्पिल्या ॥ मरीच सुबाहु ते वेळां ॥ गदा घेऊन धांविन्नले ॥७२॥

रामें काढिला निर्वाण बाण ॥ ज्या शरमुखीं दैवत सूर्यनारायण ॥ सुबाहुचा कंठ लक्षून ॥ केलें संधान राघवें ॥७३॥

जैसा विहंगम वेगेंकरून ॥ धांवे वृक्षाग्नीचें फळ लक्षून ॥ तैसा सवेग गेला बाण ॥ शिर उडविलें सुबाहुचें ॥७४॥

त्या बाणाचा पिसारा किंचित ॥ मारीचास लागला अकस्मात ॥ त्या शरवातें अद्भुत ॥ मारीच गेला उडोनि पैं ॥७५॥

कीं खगेश्र्वराच्या पक्षफडत्कारीं ॥ अचळ उडोनि जाय दिगंतरी ॥ तैसा मारीच समुद्राभींतरीं ॥ जाऊनिया पडियेला ॥७६॥

परम होऊनियां भ्रमित ॥ लंकेस गेला धाकें पळत ॥ वाटे पाठीसी लागला रघुनाथ ॥ परतोनि पाहात घडिघडी ॥७७॥

लंकेंत राक्षस प्रवेशोन ॥ राक्षसेंद्रातें सांगे वर्तमान ॥ म्हणे मानव नव्हे रघुनंदन ॥ आदिपुरुष अवतरला ॥७८॥

अवघा ऐकोन वृत्तांत ॥ रावण दचकला मनांत ॥ जैसा सुपर्णाचा ऐकतां पुरुषार्थ ॥ सर्प बहुत संतापती ॥७९॥

कीं ऐकोन संतांचें स्तवन ॥ मनांत कष्टी होय दुर्जन ॥ कीं पतिव्रतेचा धर्म परिसोन ॥ व्याभिचारिणी विटती पैं ॥८०॥

असो समस्त आटोनि रजनीचर ॥ सिद्धाश्रमीं रणरंगधीर ॥ रणमंडळी रघुवीर ॥ एकला कैसा शोभला ॥८१॥

जैसा महाकल्पीं सर्व संहारे ॥ मग एकलें परब्रह्म उरे ॥ कीं समस्त लोपोनि नक्षत्रें ॥ एकला दिनकर उगवे जैसा ॥८२॥

कीं शुक्तिकेवेगळें मुक्ताफळ ॥ दिसे जैसें परम तेजाळ ॥ कीं प्रपंच त्यागोनि निर्मळ ॥ योगेश्र्वर विलसे जेंवि ॥८३॥

जैसी रात्र निरसतां उठती जन ॥ तैसे यज्ञमंडपांतूनि उठती ब्राह्मण ॥ भेटती रामास जाऊन ॥ ब्रह्मानंदेंकरोनियां ॥८४॥

जठरीं अन्नपाक होय वेगें ॥ परी गर्भास ढका न लागे ॥ कीं ज्ञानी वेष्टित तापत्रयभोगें ॥ परी अंतर न भंगें सर्वथा ॥८५॥

तैसे यज्ञमंडपासहित विप्र ॥ सघुत्तमें रक्षिले साचार ॥ पूर्ण जाहला मख समग्र ॥ श्रीरघुवीरप्रतापें ॥८६॥

विश्र्वामित्रासी नावरे प्रेमा ॥ म्हणे वत्सा माझिया श्रीरामा ॥ सहस्रवदनास तुझा महिमा ॥ न वर्णवेचि सर्वथा ॥८७॥

कौशिकासी म्हणती ऋषीजन ॥ श्रीराममूर्ति धाकुटी सगुण ॥ पर्वताकार राक्षस संहारून ॥ कैसे क्षणमात्रें टाकिले ॥८८॥

विश्र्वामित्र हास्यवदन ॥ ऋषिप्रति बोले वचन ॥ म्हणे आदित्यमंडळ दिसे लहान ॥ परी पृथ्वीभरि प्रकाश ॥८९॥

धाकुटा दिसे कलशोद्भव ॥ परी उदरीं सांठविला जलार्णव ॥ कीं वामनरूप धरी केशव ॥ परी दोन पाउलें ब्रह्मांड केलें ॥९०॥

दिसे इंद्राचें वज्र लहान ॥ परी पर्वताचें केलें चूर्ण ॥ पंडितहृदयीं बुद्धी सर्षपप्रमाण ॥ परी आब्रह्मभुवन व्यापिलें ॥९१॥

तैसा राम धाकुटा दिसे तुम्हां ॥ परी ब्रह्मादिकां नेणवे महिमा ॥ पुराणपुरुष हा परमात्मा ॥ भक्तरक्षणा अवतरला ॥९२॥

असो भूतावळी पातल्या तेथें ॥ त्यांहीं भक्षिलीं राक्षसप्रेतें ॥ यज्ञमंडपाभोंवते ॥ शुद्ध केलें भूमंडळ ॥९३॥

तों आलें मिथुलेश्र्वराचें पत्र ॥ तें स्वयें वाची विश्र्वामित्र ॥ सवें घेऊन समस्त विप्र ॥ स्वयंवरालागीं येइंजे ॥९४॥

ते दिवशीं बहुत सोहळा ॥ सिद्धाश्रमीं कौशिकें केला ॥ ब्राह्मणभोजन जाहलिया सकळां ॥ वस्त्रें अलंकार दीधले ॥९५॥

जेथें साह्या श्रीराम आपण ॥ तेथें कांहीं न दिसे अपूर्ण ॥ बहुत दक्षिणा देऊनि ब्राह्मण ॥ विश्र्वामित्रें तोषविले ॥९६॥

असो तेव्हां जाहलिया रजनी ॥ कौशिक निजला स्वशयनीं ॥ पुढें रामलक्ष्मण घेऊनी ॥ सुखें करून पहुडला ॥९७॥

साक्षात् शेषनारायण ॥ कौशिक निजला पुढें घेऊन ॥ निद्रा नव्हे ते समाधि पूर्ण ॥ उन्मनी ओंवाळून टाकावी ॥९८॥

हृदयीं न धरितां रघुनाथा ॥ शेजे निजती जे तत्त्वतां ॥ मज गमे ऐसें पाहतां ॥ कीं पशुच केवळ पडियेले ॥९९॥

रामस्मरणेंविण भोजन ॥ जैसें भस्मी घातलें अवदान ॥ तें यज्ञपुरुषासी न अर्पण ॥ वृथा भोजन तैसें तें ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP