श्रीगणेशाय नमः ॥
चंडकिरणसुकुमंडणा ॥ अमलकमलाक्षा रघुनंदना ॥ जलजोद्भवजनका जगज्जीवना ॥ पतितपावना श्रीरामा ॥१॥
विद्वज्जनमानसमराळा ॥ कामांतकध्येया भक्तवत्सला ॥ अनंतवेषा त्रिभुवनपाळा ॥ दीनदयाळा रघुपते ॥२॥
जयजय अविद्याविपिनदहना ॥ निजभक्तकौसल्यागर्भरत्ना ॥ जगदोद्धारा मुनिजनरंजना ॥ दुर्जनभंजना राघवेशा ॥३॥
मागें षष्ठाध्यायीं कथन ॥ वसिष्ठें रामास उपदेशून ॥ मग विश्र्वामित्र चालिला घेऊन ॥ यागरक्षणाचेनि काजें ॥४॥
भागीरथींत करोनि स्नान ॥ कौशिक राम लक्ष्मण ॥ सारोनियां नित्य अनुष्ठान ॥ सत्कर्माचरण वेदोक्त ॥५॥
मग धनुर्वेदयुक्ति नानामंत्र ॥ कोणे समयीं कैसें प्रेरावे अस्त्र ॥ तें रामासी अवघें मंत्रशास्त्र ॥ विश्र्वामित्र उपदेशी ॥६॥
युद्धाच्या नाना युक्ति कळा ॥ विश्र्वामित्रें सांगतांचि सकळा ॥ राघवें आकळिल्या त्या वेळा ॥ जैसा आंवळा करतळींचा ॥७॥
मूर्तिमंत अस्त्रदेवता ॥ रामचरणीं ठेविती माथा ॥ मग हृदयीं प्रवेशती तत्वतां ॥ जळीं जळगार जयापरी ॥८॥
पहावया श्रीरामाचें धैर्यमानस ॥ विश्र्वामित्र म्हणे तया समयास ॥ येणें मार्गे जे गेले सिद्धाश्रमास ॥ ताटिकेनें तयांस भक्षिलें ॥९॥
येणें मार्गे रघुपति ॥ जाऊं नये भय वाटे चित्ती ॥ हा मार्ग चुकवून त्वरितगतीं ॥ जावें सिद्धाश्रमातें ॥१०॥
ऐकतां कौशिकाचें वचन ॥ श्रीराम बोले सुहास्यवदन ॥ जेणें विश्र्वामित्राचे कर्ण ॥ तृप्त होऊन सुखावती ॥११॥
स्वामी तुमचे कृपेंकरूनी ॥ महाकाळ उभाच फोडीन बाणीं ॥ तेथें ताटिकेसी कोण गणी ॥ येच क्षणीं मारीन तीतें ॥१२॥
कौशिकाचे मनीं संशय होता ॥ कीं हीं बाळके केंवीं झुंजतील आतां ॥ त्या संशयाची समूळ वार्ता ॥ रामवचनें निरसली ॥१३॥
मग त्या रथावरी बैसोन ॥ ताटिकेचें हिंदोळिक वन ॥ त्याचि मार्गे तिघेजण ॥ जाते जाहले तेधवां ॥१४॥
वातवेगें जात स्यंदन ॥ कीं अपार भूमि टाकिली क्रमोन ॥ जैसें ऐकतां हरिकीर्तन ॥ पापें खंडोनि भस्म होती ॥१५॥
पुढे देखिलें घोर अरण्य ॥ वृक्ष लागले परम सघन ॥ चालावयासी स्यंदन ॥ मार्ग पुढें फुटेना ॥१६॥
रामासी म्हणे गाधिनंदन ॥ राघवा हेंचि ताटिकारण्य ॥ आतां येईल ती धांवोन ॥ वास काढून मनुष्यांचा ॥१७॥
तों हांक फोडिली अकस्मात ॥ जे ऐकतां दचकेल कृतांत ॥ विश्र्वामित्र जाहला भयभीत ॥ रक्षीं म्हणत राघवा ॥१८॥
उन्तत्त दशसहस्र गजांचें बळ ॥ ऐसी ताटिका परम सबळ ॥ पर्वत सांठवती विशाळ ॥ ऐसें उदर तियेचें ॥१९॥
ते कुंभकर्णाची भगिनी ॥ बहुत विशाळ राक्षसिणी ॥ शतांचीं शतें गो-द्विज धरुनी ॥ दाढेखालीं रगडीतसे ॥२०॥
ताटिका मार्गी जातां सहज ॥ मुखांत घालोनि रगडी द्विज ॥ वनपावोनीं शोधोनि द्विज ॥ नित्य भक्षी साक्षेपें ॥२१॥
प्रेतरक्तें वस्त्रें भरलीं ॥ तींचि आपणाभोंवतीं वेष्टिलीं ॥ मनुष्यशिरें कर्णीं बांधिलीं ॥ बहु दाट वळीनें ॥२२॥
नरशिरांच्या अपार माळा ॥ शोणितें चर्चित रुळती गळां ॥ कपाळीं सिंदुर चर्चिला ॥ बाबरझोटी मोकळिया ॥२३॥
द्वादश गांव पसरलें वदन ॥ पांच गांव लांब एकेक स्तन ॥ अगणित राक्षसी संगें घेऊन ॥ रामावरी लोटली ॥२४॥
सखियांस ताटिका म्हणे तेचि क्षणीं ॥ या पंथें येत मनुष्यांची घाणी ॥ नरमांसाची आजि धणी ॥ तुम्हांस देईन निर्धारें ॥२५॥
विश्र्वामित्र म्हणे चापपाणी ॥ हे वृक्ष विशाळ गेले गगनीं ॥ आंत गर्जतात राक्षसिणी ॥ ताटिकेसहित पाहे पां ॥२६॥
राम काढी कोदंडाची गवसणी ॥ जैसा याज्ञिकें कुंडीचा फुंकिला अग्नी ॥ कीं अकस्मात उगावला वासरमणि ॥ यामिनीअंतीं पूर्वेसी ॥२७॥
तंव सित ओढितां आकर्ण ॥ कडकडाट घोष दारुण ॥ जाहला सवेंच योजिला बाण ॥ प्रळयचफ्ळेसारिखा ॥२८॥
ज्या बाणाचें अर्धचंद्राकार वदन ॥ करी धांवत्या वायूचें खंडण ॥ रामें ओढूनि आकर्ण ॥ बाण सोडिला ते समयीं ॥२९॥
वृक्षांसहित राक्षसिणी ॥ मुख्य ताटिका हृदयापासोनी ॥ छेदोन पाडिली ते क्षणीं ॥ घोष गगनीं न समाये ॥३०॥
तों प्राण जातां राक्षसिणी ॥ ताटिका गर्जली ते क्षणीं ॥ तो घोष विमानीं ऐकोनि ॥ देव सर्व जगबजिले ॥३१॥
म्हणती विजयी विजयी श्रीरघुवीर ॥ वर्षती देव पुष्पांचे संभार ॥ ब्रह्मानंदें विश्र्वामित्र ॥ रामालागीं आलिंगी ॥३२॥
म्हणे रविकुळभूषणा रघुवीरा ॥ राजीवनेत्रा परम सुकुमारा ॥ तुझी धनुर्विद्या रामचंद्रा ॥ आजि म्यां दृष्टीं विलोकिली ॥३३॥
जैसें एकाचि नामेंकरून ॥ कोट्यावधि पापें जाती जळून ॥ तैसें ताटिकासहित हें वन ॥ एकाचि बाणें खंडिलें ॥३४॥
ताटिकेच्या रक्तेंकरूनी ॥ असंभाव्य तेव्हां रंगली मेदिनी ॥ देव दुंदुभि वाजविती गगनीं ॥ आला चापपाणि सिद्धाश्रमा ॥३५॥
जैसा वर्षाकाळीं गंगेचे पूर ॥ तैसे चहूंकडून धांवती ऋषीश्र्वर ॥ समस्तांसी वंदोनि रघुवीर ॥ भेटता जाहला ते काळीं ॥३६॥
यज्ञमंडप शास्त्रप्रमाण ॥ कुंड वेदिका भूमि साधोन ॥ चारी द्वारें अष्टकोन ॥ करिती साधून विप्र तेव्हां ॥३७॥
सकळ समग्री सिद्ध करून ॥ आरंभिला महायज्ञ ॥ श्रीरामासी म्हणे गाधिनंदन ॥ मखरक्षण करीं आतां ॥३८॥
तुवां ताटिका वधिली हा समाचार ॥ ऐकोनि धांवतील रजनीचर ॥ मारीच सुबाहु भयंकर ॥ प्रळय थोर करितील ॥३९॥
यालागीं नरवीरपंचानना ॥ सांभाळीं चहूंकडे रघुनंदना ॥ परम कपटी राक्षस जाणा ॥ पर्वतशिळा टाकितील ॥४०॥
श्रीराम म्हणे महाऋषि ॥ तुम्ही चिंता न करावी मानसीं ॥ शिक्षा लावीन कृतांतासीं ॥ विघ्नें करूं आलिया ॥४१॥
ऐकोनि श्रीरामाचें वचन ॥ उल्हासलें ऋषीचें मन ॥ दीक्षाग्रहणें गाधिनंदन ॥ आरंभ करी यज्ञासी ॥४२॥
जैसा चंद्र वेष्टित तारांगणें ॥ कीं मित्राभोवती जैशीं किरणें ॥ तैसा ऋषिवेष्टित गाधिवदन ॥ कुंडासमीप विराजे ॥४३॥
ओंकारासहित स्वाहाकार ॥ अवदानें टाकिती सत्वर ॥ उठला मंत्रांचा गजर ॥ वषटूकारघोष पैं ॥४४॥
तों अस्ता गेला वासरमणि ॥ दोन प्रहर जाहली रजनी ॥ पिशिताशन आले धांवोनी ॥ ताटिकेच्या कैवारें ॥४५॥
वीस कोटी रजनीचर ॥ मुख्य मारीच सुबाहु असुर ॥ सिद्धाश्रमासमीप सत्वर ॥ हांक फोडित पातले ॥४६॥
हाक ऐकोनि दारुण ॥ भयभीत जाहले ब्राह्मण ॥ गळती हातींची अवदानें ॥ वदनी बोबडी वळतसे ॥४७॥
म्हणती रक्षीं रक्षीं रघुनंदना ॥ नरवीरश्रेष्ठा गोविप्रपाळणा ॥ श्रीराम म्हणे वो ब्राह्मणा ॥ चिंता कांहीं न करावी ॥४८॥
तंव एक म्हणे ब्राह्मण ॥ रक्षणार राम आणि लक्ष्मण ॥ पर्वताकार राक्षस संपूर्ण ॥ वीस कोटी पातले ॥४९॥
एक द्वार हे दोघे रक्षिती ॥ दुज्या द्वारें राक्षस संचारती ॥ आतां कैसी होईल गती ॥ पळावया निश्र्चितीं ठाव नाहीं ॥५०॥