अध्याय सहावा - श्लोक २०१ ते २५७

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


निर्गुण निर्विकार निरूपण ॥ पूर्ण शांति योगक्षेम ॥ असतां पूर्ण जाहले निःसीम ॥ केला क्रम विस्मयें ॥१॥

तें तूं स्वरूप निर्वाण ॥ राघवा नटलासि परिपूर्ण ॥ सच्चिदानंद सत्य जाण ॥ हेंहि बोलणें न साहे ॥२॥

आटोनि सर्व अलंकार ॥ एकरस जाहला निर्विकार ॥ आटलें पिंडब्रह्मांड समग्र ॥ तोचि तूं साचार श्रीरामा ॥३॥

कैचें कैलास ॥ लोपला अवघा मायाविलास ॥ शेषशायी जगन्निवास ॥ हाही भास मावळला ॥४॥

वटपत्रशायी सर्वेश्र्वर ॥ हे नित्यकल्पींची गोष्ट साचार ॥ ब्रह्मा विष्णु महेश्र्वर ॥ स्वस्वरूपीं मिळाले ॥५॥

उरलें निर्विकार स्वरूप ॥ तें तूं राघवा निर्विकल्प ॥ अच्छेद्य अभेद्य अरूप ॥ आत्माराम परिपूर्ण ॥६॥

स्वरूप निर्धार होतां पूर्ण ॥ श्रीरामें झांकिले नयन ॥ ब्रह्मानंदसागरीं लीन ॥ रघुनंदन जाहला ॥७॥

वसिष्ठही आनंदें डुल्लत ॥ खुंटला बोध राहिली मात ॥ गुरुशिष्य देवभक्त ॥ एकरूप जाहले ॥८॥

विराल्या रघुनाथाच्या शक्ती ॥ स्वस्वरूपीं पावला विश्रांती ॥ वसिष्ठही आत्मस्थितीं ॥ श्रीरघुनाथीं बिंबला ॥९॥

अठरा दिवसपर्यंत ॥ श्रीराम जाहला समाधिस्थ ॥ विसरला अवतारकारणहेत ॥ राम समरसला आत्मरूपीं ॥२१०॥

शरीर जाहलें अचेतन ॥ हृदयीं आकर्षिले प्राण ॥ गजबजिलें दशरथाचें मन ॥ म्हणे अनर्थ पूर्ण जाहला ॥११॥

गजबजिला विश्र्वामित्र ॥ म्हणे काय संपला अवतार ॥ बंदीं पडले सुरवर ॥ कोण सोडवील तयांतें ॥१२॥

आतां कैचें यागरक्षण ॥ तात्काळ दरशथ देईल प्राण ॥ आजि जाहले अष्टादश दिन ॥ रघुनंदन सावध नोहे ॥१३॥

ऐकतां निर्वाणज्ञान थोर ॥ राम जाहला निर्विकार ॥ मग वसिष्ठासी विश्र्वामित्र ॥ घाली नमस्कार तेधवां ॥१४॥

म्हणे महाराजा ब्रह्मसुता ॥ सावध करीं रघुनाथा ॥ पुढें अवतारकार्य तत्त्वतां ॥ बहु असे तें जाणसी तूं ॥१५॥

मग वसिष्ठ म्हणे श्रीरामा ॥ सावधान होईं मेघश्यामा ॥ चिदानंद पूर्णब्रह्मा ॥ यागरक्षणा आतां जाईंजे ॥१६॥

जाणोनियां स्वरूपातें ॥ सुखें धर्मरीतीं वर्ते ॥ पाळोनियां सज्जनातें ॥ दुष्ट क्षयातें पाववीं ॥१७॥

जैशीं केश नखें आंगीं वाढती ॥ आपुलीं आपणातें रुपती ॥ तीं छेदितां सुख निश्र्चिती ॥ तैसे दुष्टमति वधावे ॥१८॥

समाधि आणि व्युत्थान ॥ दोनी अंतरीं जिरवून ॥ तुर्या उन्मनी वोलांडून ॥ आनंदघन वर्तावें ॥१९॥

तटस्था टाकोनि वेगीं ॥ रामा उघडी समाधि भोगीं ॥ श्रीरामा तूं राजयोगी ॥ सर्व संगीं निःसंग ॥२२०॥

जो आपले ठायीं भ्रमें वर्तत ॥ तया जगही भ्रममय भासत ॥ भ्रमरूप ब्रह्मांड दिसत ॥ भ्रमेंचि मृत्यु जवळी ये ॥२१॥

ईश्र्वराचें स्वरूप निर्वाण ॥ भ्रमें नाकळे जाहला दीन । आपण आहें कोणाचा कोण ॥ भ्रमें पूर्ण नोळखे ॥२२॥

भ्रमेंकरूनि जन्ममरण ॥ भ्रमेंकरून अधःपतन ॥ तो भ्रम गेल्या संपूर्ण ॥ आपणाविण दुजें नसे ॥२३॥

आपण ब्रह्मस्वरूप होतां पूर्ण ॥ ब्रह्मरूप दिसे त्रिभुवन ॥ शत्रु मित्र थोर लहान ॥ ब्रह्मरूप सर्व दिसे ॥२४॥

घागरी मडकीं रांजण ॥ आंत बिंबला चंडकिरण ॥ परी सूर्यासी स्त्रीपुरुष नपुंसकपण ॥ कल्पांतींही घडेना ॥२५॥

सोनें साच लटिके अलंकार ॥ तरंग मिथ्था एक सागर ॥ पट मिथ्या तंतु निर्धार ॥ तैसें चराचर ब्रह्मरूप ॥२६॥

नाना घट एक अंबर ॥ नाना मणि एक सूत्र ॥ नाना मातृका एक ओंकार ॥ ब्रह्म सर्वत्र तैसेंचि ॥२७॥

म्हणोन सुटतां हृदयग्रंथि ॥ सर्व संशया होय निवृत्ति ॥ कर्मींच होय ब्रह्मप्राप्ति ॥ त्रिजगतीं ब्रह्मरूप ॥२८॥

उभय पक्षांचे बळेंकरूनि ॥ विहंगम संचरती गगनीं ॥ तैसें कर्मब्रह्म ऐक्य करूनी ॥ स्वानंदवनीं विचरावें ॥२९॥

जेथें निमाल्या सकळ आधि ॥ श्रीराम पूर्ण तेचि समाधि ॥ तटस्थता हे उपाधि ॥ एकदेशी जाण पां ॥२३०॥

अंतरीं जाणोनि निर्वाण ज्ञान ॥ बाहेर दाविजे भिन्नाभिन्न ॥ अंतरीं बोध परिपूर्ण ॥ बाहेर जडपण दाविजे ॥३१॥

अंतरीं करून पूर्ण त्याग ॥ बाहेर दाविजे लौकिक भाग ॥ अंतरीं होऊनि निःसंग ॥ विषयीं विराग धरावा ॥३२॥

बाहेर लटकेंच कृपणपण ॥ परी अंतरीं समसमान ॥ रामा तोचि साधक पूर्ण ॥ लोकसंगविवर्जित ॥३३॥

जैसा बीजामधूनि वट थोर ॥ निघे अद्भुत पर्वताकार ॥ तैसें आत्मरूपीं चराचर ॥ जाहलें जाणोनि वर्तावें ॥३४॥

तंतू आणि पट पूर्ण ॥ दोघांसी नव्हे वेगळेपण ॥ घट मृत्तिकेसी टाकून ॥ वेगळा नोहे सर्वथा ॥३५॥

तैसें जग आणि जगदीश्र्वर ॥ भिन्न नोहे साचार ॥ हें ज्ञान जाणोनि निर्विकार ॥ वर्तें सदा तूं राघवा ॥३६॥

अविद्या ही विवशी वाड ॥ निजात्मधनासी मध्यें आड ॥ तिचें गुरुकृपें छेदानि बंड ॥ वर्तें अखंड राघवा ॥३७॥

प्रपंचसमुद्र नसतांचि दिसे ॥ गुरुकृपेचें नावेंत बैसें ॥ निवृत्तितटीं समरसें ॥ आत्मप्रकाशेंकरूनिया ॥३८॥

अभ्यासेंविण विद्या सकळा ॥ तात्काळ होती राघवा विकळा ॥ तैसी नोहे ज्ञानकळा ॥ तारी अबळा निजस्पर्शे ॥३९॥

लोहीं झगटतां परिस पूर्ण ॥ मग तें जन्मवरी जाहलें सुवर्ण ॥ तैसें होतां आत्मज्ञान ॥ जन्ममरण त्यांसी कैचें ॥२४०॥

म्हणोन साधक जे सज्ञान ॥ तिहीं प्रतिपाळावें गुरुवचन ॥ सकळ अकार्या टाकून ॥ सन्मार्गेंच वर्तावें ॥४१॥

रामा तूं गुरु म्हणशील कोण ॥ जो तत्त्ववेत्ता अनुभवी पूर्ण ॥ शिष्य व्हावा ज्ञाननिपुण ॥ ऐसी मति जयासी ॥४२॥

साधकीं करावें हेंचि त्वरित ॥ बोधवज्र घेऊन निश्र्चित ॥ जन्ममरण दुःखपर्वत ॥ चूर्ण करूनि टाकावे ॥४३॥

मोक्षतरूचें बीज हें सत्य ॥ अद्वैत ज्ञान क्रियासहित ॥ सदा चालिजे धर्मपंथ ॥ सर्व कुमतें टाकोनियां ॥४४॥

ज्याचें शुद्ध मन तोचि शुचिष्मंत ॥ सद्विवेक वसे तोचि पंडित ॥ जो गुरुभक्तीसी नव्हे रत ॥ तरी विष यथार्थ तोचि प्याला ॥४५॥

कासया ग्रंथ शतसहस्र ॥ मुख्य धर्म तो परोपकार ॥ अधर्म नाम त्या साचार ॥ परपीडा करणें जें ॥४६॥

याकारणें वत्सा रघुनाथा ॥ तूं समाधि ग्रासोनियां आतां ॥ धनुष्य घेऊनियां तत्त्वतां ॥ मखरक्षणा जाइंजे ॥४७॥

ऐकतां सद्रुरूचें वचन ॥ श्रीराम तो सुहास्यवदन ॥ उघडी अमल राजीवनयन ॥ जे कां आकर्ण विकासले ॥४८॥

करूनि सद्रुरूसी नमस्कार ॥ करी प्रदक्षिणा त्रिवार ॥ सद्रद जाहलें अंतर ॥ अष्टभावेंकरोनियां ॥४९॥

मग म्हणे ब्रह्मपुत्र ॥ बारे दावी आतां लीलाचरित्र ॥ ते गुरुआज्ञा राजीवनेत्र ॥ मस्तकीं वंदोनि निघाला ॥२५०॥

दिव्य रथीं बैसला रघुनाथ ॥ सवें कौशिक आणि सुमित्रासुत ॥ लक्षोनि सिद्धाश्रमाचा पंथ ॥ सुमुहूतैंसी चालिला ॥५१॥

दशरथ आणि ब्रह्मसुत ॥ भागीरथीपर्यंत बोळवित ॥ जातां उत्तम शकुन बहुत ॥ श्रीरामासी जाहले ॥५२॥

त्या शकुनांचा करूनि अर्थ ॥ रायासी सांगे विरिंचिसुत ॥ विजयश्रियेसीं रघुनाथ ॥ अयोध्येसी येईल सुखें ॥५३॥

बोळवूनि तेव्हां रघुनाथ ॥ माघारे आले वसिष्ठ दशरथ ॥ पुढें कथा गोड बहूत ॥ अमृताहून विशेषें ॥५४॥

रामविजय वैरागर देख ॥ षष्ठाध्याय हिरा अलोकिक ॥ हृदयपदकीं जडोत सुरेख ॥ संत श्रोते अनुभवीत ॥५५॥

ब्रह्मानंदा रामचंद्रा ॥ श्रीधरवरदा गुणसमुद्रा ॥ हा षष्ठाध्याय रघुवीरा ॥ सदा हृदयीं वसो माझ्या ॥५६॥

स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकिनाटकाधार ॥ सदा परिसोत पंडित चतुर ॥ षष्ठाध्याय गोड हा ॥२५७॥

॥श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु॥ ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP