अध्याय सहावा - श्लोक ५१ ते १००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


जो मायानियंता जगद्भूषण ॥ तो वसिष्ठापुढें ओढवी कर्ण ॥ चहूं वेदांचें जीवन ॥ तें महावाक्य ऋृषि सांगे ॥५१॥

वसिष्ठ म्हणे सप्रेम ॥ सर्वद्रष्टा तूं आत्माराम ॥ सर्वव्यापक तूं पूर्णब्रह्म ॥ अतींद्रिय वेगळा ॥५२॥

जगडंबराभास सकळ ॥ हा तुझे मायेचा खेळ ॥ मिथ्याभूत जैसें मृगजळ ॥ साच नव्हे सर्वथा ॥५३॥

तूं अलिप्त सर्वांसी तत्त्वतां ॥ जैसा सर्वांघटीं बिंबला सविता ॥ कीं काष्ठामाजी अग्नि पाहतां ॥ अलिप्त जैसा असोनी ॥५४॥

कीं वाद्यांमाजी ध्वनि उमटती ॥ कीं कंठी राग उठती ॥ परी तेथें असोनि नसती ॥ तैसा सर्वांभूतीं राघवा तूं ॥५५॥

कीं दर्पणींचीं स्वरूपें ॥ दिसती परी मिथ्यारूपें ॥ तैसा रामा तूं विश्र्वरूपें ॥ व्यापोनियां अलिप्त ॥५६॥

बीजामाजी तरुवर ॥ कीं तंतूमाजी वस्त्र ॥ कीं उदकीं तरंग अपार ॥ विश्र्व समग्र तुजमाजी ॥५७॥

अनंत ब्रह्मांडांच्या कोडी ॥ तुझी माया घडी मोडी ॥ जीवांस भुरळ घालोनि पाडी ॥ विषयवर्तीं सर्वदा ॥५८॥

मायेचे अवघे विकार ॥ ते मृगजळाचे दाटले पूर ॥ कीं गंधर्वनगर सविस्तर ॥ रचिलें दिसे परी मिथ्या ॥५९॥

हे वोडंबरीचें लेणें पूर्ण ॥ कीं स्वप्नींचें राज्यसिंहासन ॥ कीं चित्रींचा हुताशन ॥ ज्वाळा अद्भुत दीसती ॥६०॥

कीं दर्पणींचा दिव्य हार ॥ कीं मृगजळामाजी वंध्यापुत्र ॥ शुक्तिकारजताचें करोनि पात्र ॥ रात्रीस मीन धरितसे ॥६१॥

नयनांतील पुतळी ॥ गर्भांधें पदरीं धरिली ॥ कल्पांतविजू गिळिली ॥ मश्यकें केंवि घडे हें ॥६२॥

पांगुळ धांवे अंतराळीं ॥ तेणें आकाशाची साल काढिली ॥ प्रभंजनाची चिंधी फाडिली ॥ साच बोली काय हे ॥६३॥

कीं कुहूचे काळोखें भरिलें ॥ तें दिवा दोहों प्रहरां वाळूं घातलें ॥ कीं उरगाचे पाय बांधिले ॥ सिकतातंतूकरूनियां ॥६४॥

काढोनि दीपाचा रंग ॥ वस्त्रे रंगविली सुरंग कीं वडवानळामाजी काग ॥ खेळती काय घडे हें ॥६५॥

हें सर्व जैसें असत्य ॥ तैशी माया मिथ्याभूत ॥ साच कीं लटकी इत्यर्थ ॥ ब्रह्मादिकां नव्हेचि ॥६६॥

मायेचें परम विंदाण ॥ थोरथोरांसी न कळे पूर्ण ॥ तरी मायेची कथा सांगेन ॥ ऐक सावधान श्रीरामा ॥६७॥

जेणें न्यासशास्त्र निर्मिलें पूर्ण ॥ तो गौतम ऋषि परम प्रवीण ॥ त्याचा शिष्य अति सुजाण ॥ गाधि नाम तयाचें ॥६८॥

त्यास चोहों वेदांचें अध्ययन ॥ षट्शास्त्रीं परम निपुण ॥ तेणें केलें दिव्य अनुष्ठान ॥ जाहला प्रसन्न श्रीविष्णु ॥६९॥

मग बोले इंदिरानाथ ॥ प्रसन्न जाहलों माग इच्छित ॥ यावरी तो ब्राह्मण बोलत ॥ काय तें ऐक श्रीरामा ॥७०॥

गाधि म्हणे हृषीकेशी ॥ मज दावी तुझी माया कैशी ॥ तिणें ठकविलें बहुतांसी ॥ मज वेगेंसी पाहूंदे ॥७१॥

ऐकोनि हांसला नारायण ॥ मायापाश परम दारुण ॥ तोडीं म्हणोनि येती शरण ॥ तूं तीस पाहीन कां म्हणसी ॥७२॥

दिसतें तें अवघें असत्य ॥ हेंचि मायेचें रूप यथार्थ ॥ जैसा दोरावरी सर्प भासत ॥ कीं शुक्तिकेवरी रजत जैसें ॥७३॥

कीं खुंट तोचि चोर ॥ भ्रांतासी भासे साचार ॥ जैसें स्वप्नींचें सैन्य अपार ॥ जागृतींत मिथ्या तें ॥७४॥

गाधि म्हणे वैकुंठराया ॥ तूं मिथ्यारूप सांगसी माया ॥ तरी मार्कंडेयऋषिवर्या ॥ ब्रह्मादिकां भुलविलें ॥७५॥

तरी ते मज क्षणभरी ॥ सर्वोत्तमा दावी नेत्रीं ॥ हांसतसे वैकुंठविहारी ॥ बोल ऐकोन तयाचे ॥७६॥

हरि म्हणे माया देखून ॥ समूळ जासी तूं भुलोन ॥ तुझे कासावीस होतील प्राण ॥ मग कोण सोडवील ॥७७॥

तुझी भ्रंशेल सकळ मति ॥ पडसील महाआवर्ती ॥ मग गाधि म्हणे जगत्पति ॥ वर निश्र्चित देईं मातें ॥७८॥

मी कासावीस जेव्हां होईन ॥ तेव्हां तूं मज आठवण दे येऊन ॥ तुझें करितांचि नामस्मरण ॥ पुढती भेटें ऐसाचि ॥७९॥

अवश्य म्हणोनि जगन्निवास ॥ जाता जाहला स्वस्थानास ॥ कांहीं एक लोटले दिवस ॥ ऐकें सर्वेशा राघवा ॥८०॥

जान्हवीतीरीं अरण्यांत ॥ गाधि राहिला स्त्रियेसहित ॥ एकदां मध्यान्ही आला आदित्य ॥ ऋषि जात स्नानातें ॥८१॥

प्रवेशतां गंगाजीवनीं ॥ मनांत म्हणे माया अझुनी ॥ मज कां न दावी चक्रपाणी ॥ कैशी करणी तयाची ॥८२॥

अघमर्षण करी ब्राह्मण ॥ तों मायेनें मांडिलें विंदाण ॥ गाधीस वाटे आलें मरण ॥ व्यथा दारुण जाहली ॥८३॥

तों पातलें यमदूत ॥ तिहीं प्राण काढिले त्वरित ॥ यमापाशीं मारित ॥ गाधि नेला तेधवां ॥८४॥

तो तेथें यमजाचणी दारुण ॥ कुंभीपाकीं घालिती नेऊन ॥ असिपत्रवनीं हिंडवून ॥ तप्तस्तंभासी बांधिती ॥८५॥

इतुकीं दुःखें विप्र भोगित ॥ परी आपण उभा जान्हवींत ॥ मग तो जन्मला चांडाळयोनींत ॥ कंटज नाम तयाचें ॥८६॥

पंचवीस वर्षेंपर्यंत ॥ स्त्रीपुत्र जाहले बहूत ॥ वाटा पाडोन असंख्यात ॥ द्रव्य अपार जोडिलें ॥८७॥

नानापरीच्या हिंसा करी ॥ गोब्राह्मणांस जीवें मारी ॥ तों तेथें आली महामारी ॥ सर्वही मेलीं कुटुंबींचीं ॥८८॥

बाप माय स्त्री सुत ॥ एकदांचि पावलीं मृत्य ॥ कंटक विचारी मनांत । होऊं विरक्त येथोनियां ॥८९॥

रडे कंटजनाम माहार ॥ आतां न मिळे म्हणे संसार ॥ मग अतीत होऊन दुराचार ॥ देशोदेशीं हिंडतसे ॥९०॥

आला केरळदेशाप्रति ॥ तों तेथींचा मृत्यु पावला नृपति ॥ त्यास नाहीं पुत्र संतति ॥ मग प्रधान करिती विचार ॥९१॥

मग शुंडादंडीं माळ देऊन ॥ श़ृंगारूनि हिंडविती हस्तीण ॥ तंव कंटजाचे कंठीं आणोन ॥ माळ घातली अकस्मात ॥९२॥

सहा वर्षें राज्य करून देख ॥ भ्रष्टविले सकळ लोक ॥ घरीं जेऊं घातले सकळिक ॥ सोयरे केले बहुतचि ॥९३॥

एके दिवशीं तो निर्लज्ज ॥ एकला जात बाहेर कंटज ॥ प्रधानादि सेवक सहज ॥ पाठीं धांवती रायाचे ॥९४॥

अवघियांस दटाविलें रागें ॥ म्हणे येऊं नका मज मागें ॥ प्रधान गुप्त पाहती वेगें ॥ कोठें जातो म्हणोनियां ॥९५॥

तों ते गांवींचे अनामिक ॥ परम उन्मत्त मद्यप्राशक ॥ ते वाटेंसीं भेटले सकळिक ॥ कंटजासी तेधवां ॥९६॥

तिहीं कंटज ओळखिला सत्वरा ॥ म्हणती आमुचा हा सोयरा । येणें लोक भ्रष्टविले एकसरा ॥ नाहीं कळलें कोणासी हें ॥९७॥

त्यांसी कंटज दटावी देखा ॥ म्हणे ही गोष्ट बोलूं नका ॥ नाहीं तरी तुम्हां सकळिकां ॥ शिक्षा करीन साक्षेपें ॥९८॥

तें प्रधानवर्गीं ऐकिलें ॥ म्हणे राज्य समस्त बुडविलें ॥ कंटजासी मारून बाहेर घातलें ॥ मग विचारी बैसलें समस्त ॥९९॥

श्रेष्ठीं काढिला शास्त्रार्थ ॥ घ्यावें देहांतप्रायश्र्चित्त ॥ मग अग्निप्रवेश समस्त ॥ लोक करिती नगरींचे ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP