॥ श्री गणेशाय नमः ॥
जयजय जदद्वंद्या वेदसारा ॥ अनंगदहनहृदयविहारा ॥ कमलोद्भवजनका परात्परा । अगोचरा निरुपाधिका ॥१॥
इच्छामात्रें प्रचंड ॥ मायेनें रचिलें ब्रह्मांड ॥ चौऱ्यांशीं लक्ष योनि उदंड ॥ जीव आंत भरियेले ॥२॥
ते जीव विसरूनि तूंतें ॥ भुलले देखोनि विषयांतें ॥ म्हणोनी विसरलें निजपदांतें ॥ अहंमतीनें भुलोनियां ॥३॥
शब्दविषय घेतां कानें ॥ कुरंग वेचिला समूळ प्राणें ॥ स्पर्शविषय सेवितां वारणें ॥ अंकुशें आकर्षोनि हिंडविती ॥४॥
रूपविषय देखतां पतंग ॥ करी आपला देहत्याग ॥ रसविषय मीन सवेग ॥ गळ गिळोनि मुके प्राणा ॥५॥
गंधविषयें मिलिंद भुलोन ॥ कमळकोशीं वेंची प्राण ॥ ते पांचहि विषय संपूर्ण ॥ भोगिती जाण मानव हे ॥६॥
तुज विसरोनि श्रीरामा ॥ जीव भुलले देहगेहधनकामा ॥ त्यांसी तारावया पूर्णब्रह्मा ॥ दशरथात्मज जाहलासी ॥७॥
पंचमाध्यायाचे अंती कथा ॥ दशरथें राम दिधला गाधिसुता ॥ यावरी वर्तलें तें तत्वतां ॥ ऐका आतां सावधान ॥८॥
गुरूशी शरण रिघाला रघुनाथ ॥ हे कथा वाल्मीकें कथिली अद्भुत ॥ तो बृहद्वसिष्ठग्रंथ ॥ छत्तीस सहस्र श्र्लोक पैं ॥९॥
समुद्राऐसा थोर ग्रंथ ॥ त्यांतील सार सांगों मुख्यार्थ ॥ जैसें भागीरथींतून तृषार्थ ॥ पाणी सेवी अंजुळीनें ॥१०॥
सागरामाजी बुडी देऊन ॥ काढिती सतेज मुक्ते वेंचून ॥ कीं यायकांसी सांपडे अपार धन ॥ परी यथाशक्ति मोट बांधी ॥११॥
देखिला अन्नाचा पर्वत ॥ परी आपणापुरतेंच घे क्षुधार्त ॥ तैसा बृहद्वासिष्ठग्रंथ ॥ त्यांतील गृह्यार्थ ऐका हो ॥१२॥
वाल्मीकाचीं उच्छिष्ट उत्तरें ॥ तींच परिसा तुम्ही सादरें ॥ श्रोते म्हणती उच्छिष्ट खरें ॥ तरी तेंच कांहो बोलतां ॥१३॥
पराचें उच्छिष्ट अंगिकारा ॥ कदा न करिती श्रोते चतुरा ॥ संदेहधनुष्य घेऊनि थोर ॥ प्रश्र्नाक्षरशर सोडिती ॥१४॥
तों वक्त्यानें स्फूर्तिधनुष्य घेऊन ॥ शास्त्रसंमत टाकोनि बाण ॥ प्रश्र्नाक्षरशर निवारून ॥ संदेहधनुष्य छेदिलें ॥१५॥
वक्ता म्हणे ऐका सावधान ॥ कोणतें उच्छिष्ट घेती सज्जन ॥ तरी तें मधुमक्षिकांचें उच्छिष्ट पूर्ण ॥ मधु आवडे देवांतें ॥१६॥
वत्स आधीं करी दुग्धपान ॥ तें अवश्य घ्यावें न करितां अनुमान ॥ भ्रमर आधीं जाय पुष्प सेवून ॥ परी तें शास्त्रज्ञ अंगिकारिती ॥१७॥
मेघमुखीचें जीवन ॥ ते उच्छिष्ट नव्हे कदा जाण ॥ यागीचा पुरोडाश पूर्ण ॥ उच्छिष्ट कोण म्हणे त्यासी ॥१८॥
गौतमें गोदा आणिली प्रार्थून ॥ तेणें आधीं केलें स्नानपान ॥ व्यासाचें उच्छिष्ट पुराण प्राचीन ॥ उच्छिष्ट पूर्ण नव्हे तें ॥१९॥
विष्णुनैवेद्य पावन ॥ त्यास उच्छिष्ट म्हणेल कोण ॥ वाल्मीककाव्य म्हणोन ॥ उच्छिष्ट नव्हे सर्वथा ॥२०॥
व्याघ्रमृगचमन गहन ॥ सूकरकेश पट्टकुलें जाण ॥ हस्तिदंत गवाश़ृंग पूर्ण ॥ इतकीं ब्राह्मण पवित्र म्हणती ॥२१॥
असो ऐका पूर्वानुसंधान ॥ यागरक्षणार्थ जातां रघुनंदन ॥ कौशिकाप्रति राजीवनयन ॥ बोलता जाहला तेधवां ॥२२॥
श्रीराम म्हणे महाऋषी ॥ मज तुम्ही नेतां युद्धासी ॥ क्षणभंगुरता देहासी ॥ आत्मप्राप्ति नाहीं मातें ॥२३॥
आत्मप्राप्तिविण साधन ॥ जैसे अलंकार गळससरीविण ॥ कीं दीपाविण शून्य सदन ॥ जीवनाविण सरिता जैसी ॥२४॥
कीं प्राणाविण कलेवर ॥ कीं आवडीविण आदर ॥ कीं इंद्रियनिग्रहाविण आचार ॥ अनाचार तोचि पैं ॥२५॥
कीं भा्रताराविण कामिनी ॥ कीं अत्रिसुताविण रजनी ॥ तैसे आत्मप्राप्तीवांचुनी ॥ व्यर्थ प्राणी नाडले ॥२६॥
आत्मप्राप्तीसी कारण ॥ धरावे श्रीगुरूचे चरण ॥ गुरुकृपेविण ज्ञान ॥ कल्पातींही साधेना ॥२७॥
पदार्थ न दिसे नेत्रेंविण ॥ गोड न वाटे जीवनाविण ॥ परिसाविण सुवर्ण ॥ लोहाचे नोहे कल्पांतीं ॥२८॥
जो गुरुसेवेसी सादर ॥ आत्मज्ञान जोडोनि कर ॥ उभा त्यांपुढे निरंतर ॥ अहोरात्र तिष्ठतसे ॥२९॥
गुरुसेवा ज्यासी नावडे ॥ त्याचे ज्ञानाचे पडले किडे ॥ जन्ममरणाचें सांकडें ॥ न सरे त्याचें कल्पांतीं ॥३०॥
ज्यासी नावडे गुरुसेवन ॥ तो जाहला चतुःषष्टिकलाप्रवीण ॥ साही शास्त्रें मुखोद्रत पूर्ण ॥ परी तें भाषण मद्यपियाचें ॥३१॥
तेणें केलें जरी कीर्तन ॥ दावी वरपांगें डोलोन ॥ परी गुरुदास्य नावडे पूर्ण ॥ त्याचें बंधन चुकेना ॥३२॥
जळो जळो त्याचा प्रताप ॥ काय चाटावें कोरडें तप ॥ जैसें विगतधवेचें स्वरूप ॥ यौवन काय जाळावें ॥३३॥
गर्भांधाचे विशाळ नेत्र ॥ अदातयाचें उंच मंदिर ॥ कीं धनलुब्धाचा तत्त्वविचार ॥ जैसें मद्यपियाचें पात्र ॥ श्रोत्रिय न शिवे सर्वथा ॥३४॥
तैसे गुरुकृपेविण जे नर ॥ व्यर्थ नरदेहा आले खर ॥ सदा विषयव्यापारीं सादर ॥ त्यासी आपपर नाठवे ॥३५॥
उत्तम मनुष्यदेह पावोन ॥ तेथें साधावें आत्मज्ञान ॥ ज्ञानहीन ते मूढ पूर्ण ॥ गूढ नरक भोगिती ॥३६॥
रघुपतीचे बोल ऐकुनी ॥ सभासंत सुखावले मनीं ॥ विश्र्वामित्र तेव्हां आनंदोनी ॥ ब्रह्मनंदनाप्रति बोले ॥३७॥
जगद्वंद्य रविकुळभूषण ॥ त्यास उपदेशीं दिव्यज्ञान ॥ जो अनंतब्रह्मांडांची सांठवण ॥ लीलावेषधारक जो ॥३९॥
ते वेळे उठोनि रघुनाथ ॥ जो होय कमलोद्भवाचा तात ॥ तो विसिष्ठासी साष्टांग नमित ॥ शरणागत जाहला असे ॥४०॥
म्हणे तनमनधनेंसी अनन्य ॥ श्रीवसिष्ठा तुज मी शरण ॥ ऐसें ऐकतां ब्रह्मनंदन ॥ हृदयीं धरी राघवातें ॥४१॥
म्हणे जगद्वंद्या श्रीरामा ॥ अवतारपुरुषा परब्रह्मा ॥ तूं सच्चिदानंदघन परमात्मा ॥ तुज मी काय उपदेशूं ॥४२॥
तूं आदिनारायण निष्कलंक ॥ भोगींद्र जाहला तुझा तल्पक ॥ वेदशास्त्रांसी पडले टक ॥ तुझें स्वरूप वर्णितां ॥४३॥
तुझें नाम जपतां सार ॥ शीतळ जाहला अपर्णावर ॥ गुरुमहिमा प्रकटावया साचार ॥ शरण मज आलासी ॥४४॥
देव भक्तांची पूजा करी यथार्थ ॥ याचकांसी राजा दान मागत ॥ सागर जैसा स्तवन करित ॥ सरोवराचें प्रीतीनें ॥४५॥
वाचस्पति मुक्यासी पुसे विचार ॥ दीपप्रकाश इच्छी दिनकर ॥ चकोरांसी म्हणे अत्रिकुमर ॥ मज तृप्त करा तुम्ही ॥४६॥
कल्पतरु दुर्बळासी मागे दान । जलद चातकासी मागे जीवन ॥ चक्रवाकाचें दर्शन ॥ तरणि इच्छी नवले हें ॥४७॥
प्रीतीनें माता बाळकासी म्हणत । मी तुझें स्तनपान करीन सत्य ॥ कीं तृषाक्रांतासी मागत ॥ उदक जैसें जान्हवी ॥४८॥
वनस्पतींस म्हणे वसंत ॥ मज तुम्ही निववा समस्त ॥ तैसा तूं जगद्गुरु रघुनाथ ॥ गुरूसी शरण आलासी ॥४९॥
संतोषोनि ब्रह्मंनंदन ॥ श्रीरामास सन्मुख बैसवून ॥ गुरुसंप्रदाय शास्त्रप्रमाण ॥ महावाक्य दीक्षाविधि ॥५०॥