विद्यानन्द - श्लोक ४१ ते ६५

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


याप्रमाणें पुर्वींची स्थिति आठवुन आपलें कृतकृत्यत्व नित्य मनांत आणूत तो नित्य तृप्त राहतो. ॥४१॥

तो आपली धन्यता याप्रमाणें मानतों अज्ञानी लोक दुःखी होत्साते पुत्रादिकांची अपेक्षा करुन संसार करणार तर करीत ना बापडे, मी परमानंदाने पुर्ण असल्यामुळें मला कोणतीत इच्छा नाही. मग मी संसार कशास करुं ॥४२॥

ज्यांना परलोकांची इच्छा असेल ते यज्ञदानादिक कर्में खुशाल करोत मी सर्व व्यापक असल्यामुळें मी नाहीं असा लोकच नाहीं; मग तीं कर्मे घेऊन करावयाची काय? ॥४३॥

जे अधिकारी असतील त्यांणी वेदशास्तें खुशाल पढावी व पढवावींत मी मुळींच अक्रिय झालों मग मला अधिकार कुठला? ॥४४॥

निद्रा, भिक्षा, स्नान, शौच इत्त्यादिक कर्में मी इच्छितहीं नाहीं व करितही नाहीं. जवळच्या पाहणारांनां मी कर्में करितासें वाटेल, तर वाटेना बापडें त्यास तसें वाटल्याने मला काय होणार? ॥४५॥

ज्याप्रमाणें गूंजांच्या राशीच्या दुसर्‍यांनी अग्नि म्हटल्यानें ती जाळू सकत नाहीं, त्याप्रमाणें मी संसार करितो, असें दुसर्‍यानीं म्हटलें तरी त्याचा स्पर्श मला लागत नाहीं. ॥४६॥

ज्यांना ब्रह्मतत्त्व समजलें नाहीं ते खुशाल श्रवळ करोत मला तें तत्त्व पक्कें समजल्यावर मीं तें कां करावें ? तसेंच आत्मस्वरुपाविषयीं ज्यांच्या मनांत वारंवार संशय येतात त्यांणीं मनन करावें माझें ज्ञान निःसशंय झाल्यावर मला त्यांचे काय प्रयोजन? ॥४७॥

ज्याला देहात्म बुद्धि वारंवर होते त्याणें निदिध्यान करावा मला तसा विपर्यय मुळींच होत नाहीं. मग निदिध्यासाची खटपट परी कशाला? ॥४८॥

आतां मी मनुष्य असा केव्हा केव्हा व्यवहार घडतो, परंतु तो विपर्यासामुळे नव्हे. त्याचे कारण अनेक जन्माचा संस्कारच होय. ॥४९॥

पारब्ध कर्माचा क्षय झाला म्हणजे हा व्यवहार आपोआप नाहींसा होतो . परंतु त्या कर्माचा क्षय न होतां आम्हीं शेकडों वर्षे ध्यान केलें तरी ते व्यर्थ आहे. ॥५०॥

आतां व्यवहाराच अडथळा झाल्यामुळे तो कमी व्यावा अशी ज्याला इच्छा असेल. त्याणें खुशाल ध्यान करावें पण मला जर त्यांचा मुळींच अडथळा वाटत नाहीं तर त्यांची मला काय गरज आहे. ॥५१॥

मनांत मध्यें मध्यें विक्षेप येतो. तो न यावा म्हणून समाधि लावावयाचा तो विक्षेपण जर माझा गेला, तर तो समाधि तरी कशाला पाहिजे कारण विक्षेप आणि समाधि हे दोन्हीं मनाचेच धर्म आहेत आणि मला तर तें मन मुळींच नाहीं, मग विक्षेप कोठुन असणार? ॥५२॥

आतां अनुभव येण्याकरितां समाधि करावा असें जर म्हणावें तर मीच अनुभवरुप आहे मग मला दुसरा आणखी अनुभव तो कोठुन व्हावा ? जें करावयाचें तें मीं केलें. आणि मिळवायाचें तें मिळविलें असा माझा पक्का निश्चय झाला आहे. ॥५३॥

माझा व्यवहार प्रारब्धानुरुप कसा तरी चालो. मग तो लौकिकी असो किंवा शास्त्रीय असा कसाहीं असो. मी स्वतःअकर्ता असून मला कर्माचा मुळींच लेप नाहीं. ॥५४॥

किंवा मी जरी कृतकृत्य झालों तरी लोकांनी मला पाहुन चांगल्या रीतीनें आचरण करावें, या हेतुनें शास्त्रांत सांगितल्याप्रमाणें मी वागेन त्यांत तरी माझा काय तोटा होणार? ॥५५॥

हें माझें शरीर देवाची पूजा करो स्नान करो; शौच भिक्षादि कमें करो; ही माझीं वाणी प्रणवाचा जप करो; किंवा उपानिषदाचें अध्ययन करो. ॥५६॥

तशीच माझी बुद्धि विष्णूंचे ध्यान करो, किंवा ब्रह्मनंदी लीन होवो; मी तर सर्वांचा साक्षी आहे. मी कांहीं करीत नाही आणि करवीतही नाहीं. ॥५७॥

याप्रमाणें आपली कृतकृत्यता व प्राप्तप्राप्यता स्मरुन निरंतर मनांत तृप्त असतो. तो असें म्हणतो. ॥५८॥

आर्या मी धन्य धन्य झालों आत्मा प्रत्यक्ष जाणिला म्यां कीं ॥ ब्रह्मनंद कसा हा भासे मजसम दुजा न या लोकीं ॥१॥ ॥५९॥

आ०- मी धन्य धन्य मोठा, संसारिक दुःख मज दिसत नाहीं । अज्ञान पळुनि गेलें त्याचा गंधही न राहिला कांहीं ॥२॥ ॥६०॥

आ०- मी धन्य धन्य मोठा कांहीं कर्तव्य नाहीं मज उरलें ॥ प्राप्तव्य पदरीं आलें, सद्गूरुच चरण घट्टमी धरिले ॥३॥ ॥६१॥

आ० मी धन्य धन्य मोठा माझ्या तृप्तीस नाहीं हो उपमा । कोठवरी वर्णावी आतां मी पावलों स्वमुखधामा ॥४॥ ॥६२॥

आ०- बहु जन्मि पुण्य केलें, त्याचें फळ पक्क आजिं मज मिळलें ॥ सद्गूरुराजकृपेनें माझें आनंदरुप मज कळलें ॥५॥ ॥६३॥

आ०- स्वच्छास्त्र सद्गूरुचा वर्णू मी या मुखें किती महिमा ॥ ज्ञान अमोलिक किती हें आनंदाब्धीस या नसे सीमा ॥६॥ ॥६४॥

याप्रमाणें ब्रह्मनंद प्रकारणाच्या चौथ्या आध्यायांत विद्यानंदाचें निरुपण केलें. तो प्राप्त होईपर्यंत मुमुक्षनें त्याचा अभ्यास करावा ॥६५॥

इति विद्यानंद समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP