कीं हळाहळ जाहले अपार ॥ म्हणोनि धांवला कर्पूरगौर ॥ चंदनरूपें तो प्राणमित्र ॥ श्यामलांगीं जडला हो ॥१॥
तैसी उटी दिसे सुढाळ ॥ कीं चंद्रबिंब उकले निर्मळ ॥ कीं मुक्ताफळांचा गोळा सुढाळ ॥ इंद्रनीळा चर्चियेला ॥२॥
शंख चक्र धनुष्य बाण ॥ चोहों हस्तीं शोभायमान ॥ हस्तकटकांचे तेजे करून ॥ उजळीत नभातें ॥३॥
क्षणप्रभेचीं चक्रें तळपती ॥ तैशा मुद्रिका करीं झळकती ॥ किंवा औपासक यंत्रें रेखिती ॥ तेचि गति येथें दिसे ॥४॥
प्रळयग्नीनें उघडिले नयन ॥ तेंवि कीर्तिमुखें परिपूर्ण ॥ कीं निष्कलंक रोहिणीरमण ॥ पदक हृदयीं डोलतसे ॥५॥
कंबुकंठ अति शोभत ॥ नासिक सरळ सुकुमार बहुत ॥ मंदिस्मितवदन ॥ विराजत ॥ कोटि मन्मथ ओंवाळिजे ॥६॥
विद्रुमवर्ण अधर सतेज ॥ माजी ओळीनें झळकती द्विज ॥ त्या तेजें शशी नक्षत्रें तेजःपुंज ॥ झांकोळती पाहतां ॥७॥
त्रैलोकींचा मेळवोनि आनंद ॥ ओतिलें रामाचें वदनारविंद ॥ आकर्ण नेत्र भु्रकुटी विशद ॥ धनुष्याकृति शोभती ॥८॥
स्वानंदसरोवरींचीं कमलदलें ॥ तैसे आकर्ण नयन विकासले ॥ त्या कृपादृष्टीनें निवाले ॥ प्रेमळ जन सर्वही ॥९॥
कुंडलें तळपती मकराकार ॥ कीं जडले रवि रोहिणीवर ॥ कीं अंगिरापुत्र भृगपुत्र ॥ विचार पुसती रामातें ॥२१०॥
कीं वेदसागरींच्या रत्नज्योती ॥ पूर्वउत्तर मीमांसा निश्र्चिती ॥ कुंडलरूपें जाणविती ॥ अर्थ विशेष स्वामीतें ॥११॥
श्रीरामतनु सुकुमार ॥ तेणें शोभती अलंकार ॥ पीतवर्ण टिळक सुंदर ॥ अनुपम्य रेखिला ॥१२॥
सुवर्णोदक नदीचा पूर ॥ नीळगिरीपाठारीं निरंतर ॥ तैसा टिळक सुंदर ॥ विशळभाळीं झळकतसे ॥१३॥
जैसा कल्पांतींचा दिनकर ॥ तैसा मुकुट दिसे जाज्वल्य सुंदर ॥ तेज तळपतसे अपार ॥ चक्रामाजी न समाये ॥१४॥
दावाग्नीचा कल्लोळ भडकत ॥ तैसें उत्तरीय वस्त्र रुळत ॥ दशांप्रति मुक्तें झळकत ॥ कृत्तिकापुंज जयापरी ॥१५॥
तें परम तेजाळ क्षीरोदक ॥ कीं शुभ्र यशा चढलें बीक ॥ शुभ्र श्र्वेत मृडानीनायक ॥ कर्पूरेंकरूनि उटिला कीं ॥१६॥
कीं दिव्य रजततगट घडलें ॥ कीं पारंदें कैलास डवरिलें ॥ कीं जान्हवीतोयें ओपविलें ॥ दिनकरनाथें स्वहस्तें ॥१७॥
सच्चिदानंदतनु सगुण ॥ अतसीकुसुमाभास पूर्ण ॥ त्याचि रंगेकरून ॥ नीलोत्पलें राबविलीं ॥१८॥
नभासीं चढला तोच रंग ॥ त्याचि प्रभेनें रंगले मेघ ॥ इंद्रनीळही सुरंग ॥ त्याच प्रकाशें प्रकाशले ॥१९॥
तेथींचें सौंदर्य अद्भुत ॥ गरुडपाचूंसी तेज दिसत ॥ मर्गजासी बीक चढत ॥ तनु सांवळी देखोनीयां ॥२२०॥
तो वैकुंठीचा वेल्हाळ सुंदर ॥ भक्तमंदिरांगणमंदार ॥ कुरवंडी करूनि सांडावे साचार ॥ कोटि मकरध्वज वरोनियां ॥२१॥
ब्रह्मांड फोडोनि बाहेरी ॥ आंगींचा सुवास धांवत वरी ॥ लावण्यामृतसागर कैटभारी ॥ लीलावतारी साधक जो ॥२२॥
पूर्णब्रह्मानंद रघुवीर ॥ लीलाविग्रही श्रीधरवर ॥ हृदयीं रेखिला निरंतर ॥ निजभक्तीं प्रेमभरें ॥२३॥
असो कौसल्या बोले ते अवसरीं ॥ भक्तवत्सला मधुकैटभारी ॥ तूं आतां बाळवेष धरीं ॥ माझें उदरीं अवतरें ॥२४॥
लोक म्हणतील कौसल्यानंदन ॥ ऐसा होय तूं मनमोहन ॥ अमलदल राजीवनयन ॥ हास्यवदन विलोकीं ॥२५॥
सजलजलदवर्ण कोमळ ॥ तो कौसल्येपुढें जाहला बाळ ॥ तंव ते परम सुवेळ ॥ पुष्यार्कयोग ते समयीं ॥२६॥
जो क्षीरसागरवासी तमालनीळ ॥ तो कौसल्येपुढें जाहला बाळ ॥ चरणांगुष्ठ धरोनि कोमळ ॥ मुखकमळीं घालीतसे ॥२७॥
भक्त चरणीं लागले बहुत ॥ गोड म्हणोन वाखाणित ॥ यालागीं गोडी रघुनाथ ॥ स्वयें पाहत चाखोनियां ॥२८॥
कीं स्वचरणगोडी सेवित ॥ भक्तांसी लोभ लागावया बहुत ॥ म्हणोनियां कौसल्यासुत ॥ कौतुकार्थ दावीतसे ॥२९॥
पुत्र जाहला कौसल्येस ॥ लागला वाद्यांचा एकचि घोष ॥ सुरांसहित सुराधीश ॥ जयजयकार नभीं करिती ॥२३०॥
सुमनसंभार ते अवसरीं ॥ देव वर्षती अयोध्येवरी ॥ दुंदुभिनाद अंबरीं ॥ न मायेचि तेधवां हळदीकुंकुमें ताटें भरूनी ॥
बिदोबिदी धांवती सुवासिनी ॥ पावल्या कौसल्येच्या सदनीं ॥ वेगें करोनि तेधवां ॥३२॥
मंगळतुरांचा एकचि नाद ॥ घरोघरीं ब्रह्मानंद ॥ ते समयींचा आनंद ॥ भोगींद्र वर्णूं शकेना ॥३३॥
आनंदला ब्रह्मनंदन ॥ चहूंकडोन धांवले ब्राह्मण ॥ जैसा क्षीरसागर देखोन ॥ क्षुधार्थी वेगें पावती ॥३४॥
कीं महापर्वकाळ प्रकटला ॥ प्रयागासी धांवे भक्तमेळा ॥ कीं गांवासमीप परिस निघाला ॥ दुर्बळ धांवती लोह घेऊनी ॥३५॥
कीं तृषाक्रांत गोभार सकळी ॥ धांवती जैसे गंगाजळीं ॥ कीं वृक्ष दाअले देखून फळीं ॥ विहंगम जैसे झेंपावती ॥३६॥
तैसी ब्रह्मणांची ते काळीं ॥ दाटी जाहली राजाजवळी ॥ पुत्रमुख पहावया ते वेळीं ॥ दशरथराव चालिला ॥३७॥
दशरथ म्हणे याचकांसी ॥ जे जे इच्छा असेल मानसीं ॥ तें तें मागा मजपाशीं ॥ येच समयीं दईन ॥३८॥
भांडारें फोडिलीं बहुत ॥ याचकांसी म्हणे दशरथ ॥ मोटा बांधोनि अमित ॥ आवडे तितुकें न्या आतां ॥३९॥
समागमें घेऊन ब्राह्मण ॥ महाराज तो अजनंदन ॥ प्रवेशला आनंदेकरून ॥ कौसल्यासदनीं तेधवां ॥२४०॥
दशरथें करोनियां स्नान ॥ केलें आधीं पुण्याहवाचन ॥ पहावयासी पुत्रवदन ॥ राजा जवळी पातला ॥४१॥
श्रीरामवदन ते अवसरीं ॥ न्याहाळितां तोषला अंतरीं ॥ मधुबिंदु घालोनि मुखाभीतरीं ॥ मधुकैटभारि तृप्त केला ॥४२॥
श्रीरामाचें जातक ॥ करी तेव्हां नृपनायक ॥ गो भूरत्नें असंख्य ॥ मग देत याचकांसी ॥४३॥
रत्नजडित सिंहासन ॥ त्यावरी माय बैसली राम घेऊन ॥ मृगांकवर्ण चामरें जाण ॥ दोघी ढाळिती दोहींकडे ॥४४॥
पीकपात्र घेऊनि हातीं ॥ समीप विलसे एक दूती ॥ कनकांबराची घेऊन बुंथी ॥ बैसली सती कौसल्या ॥४५॥
भोंवते वेष्टिले विद्वजन ॥ त्यांसी भूतभविष्यवर्तमानज्ञान ॥ सातशतें स्त्रिया धांवोन ॥ येत्या जाहल्या दशरथाच्या ॥४६॥
जैशा केवळ विद्युल्लता ॥ तैशा अलंकारवस्त्रमंडिता ॥ पाळां कौसल्येभोंवता ॥ शोभेल कैसा ते वेळीं ॥४७॥
महामाया आदिभगवती ॥ तीभोंवत्या मिळाल्या अनंतशक्ति ॥ कीं सूर्यचक्रासी वेष्टिती ॥ किरणें जैसी तयापरी ॥४८॥
वसिष्ठ गुरु होऊन पुढें ॥ विलोकी श्रीरामाचें रूपडें ॥ जे जे जन्मकर्मनिवाडे ॥ ते रायापुढें सांगत ॥४९॥
म्हणे हा क्षीरसागरविहारी ॥ जन्मला कौसल्येचें उदरीं ॥ निजजन तारावयासी निर्धारीं ॥ अवतरला आदिपुरुष ॥२५०॥