अध्याय चवथा - श्लोक ५१ से १००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


वाटे पर्वत कोसळला ॥ कीं काळसर्प जिव्हारी झोंबला ॥ कीं तप्तशस्त्रघाय पडला ॥ अंगावरी अकस्मात ॥५१॥

कैकयीवचन कलशोद्भव पूर्ण ॥ प्राशिलें आसुष्यसागरजीवन ॥ राव घाबरा होय जैसा चतुरानन ॥ वेद हरण केले जेव्हां ॥५२॥

परम खेद पावला नृपवर ॥ तीस नेदीच प्रत्युत्तर ॥ मग सुमित्रेचें मंदिर ॥ प्रवेशता जाहला ॥५३॥

संसारतापें जे संतप्त ॥ ते संतसमागमें जैसे निवत ॥ तैसाचि राजा दशरथ ॥ सुमित्रासदनीं सुखावला ॥५४॥

तिचें नाम सुमित्रा सती ॥ परी नामाऐशीच आहे रीति ॥ वरकड नांवें जीं ठेविती ॥ तीं तों व्यर्थचि जाणिजे ॥५५॥

नांव ठेविलें उदार कर्ण ॥ आडका वेचितां जाय प्राण ॥ बृहस्पति नाम ज्यालागून । धड वचन बोलतां न ये ॥५६॥

कमलनयन नाम विशेष ॥ परी दोहीं डोळ्यां वाढले वडस ॥ क्षीरसिंधु नाम पुत्रास ॥ परि तक्र तयासी मिळेना ॥५७॥

नांव ठेविले पंचानन ॥ परी जंबुक देखतां पळे उठोन ॥ जन्म गेला मानतां कोरान्न ॥ सार्वभौम नाम तयातें ॥५८॥

नाम ठेविले जया मदन ॥ तो निर्नासिक कुलक्षण ॥ तैसी सुमित्रा नव्हे पूर्ण ॥ करणी नामासारखी ॥५९॥

नृप आला एकतां कर्णीं ॥ समोर आली हंसगामिनी ॥ दशरथाचिये चरणीं ॥ मस्तक ठेवी सद्भावें ॥६०॥

स्त्रियांस देव तो आपुला नाथ ॥ पुत्रांसी माता पिता सत्य ॥ शिष्यासी गुरु दैवत ॥ गृहस्थासी दैवत अतिथी पैं ॥६१॥

म्हणोन सुमित्रेनें अजनंदन ॥ पूजिला षोडशोपचारेंकरून ॥ उभी ठाकली कर जोडून ॥ अधोवदन सलज्ज ॥६२॥

कैकयीडोहळ्यांचें दुःख प्रबळ ॥ राव विसरला हो सकळ ॥ जैसा बोध ठसावतां निर्मळ ॥ तमजाळ वितुळे पैं ॥६३॥

राजा म्हणे सुमित्रेशीं ॥ काय डोहळे होताती मानसीं ॥ ते मज सांग निश्र्चयेंसीं ॥ कुरंगनेत्रे सुमित्रे ॥६४॥

मग किंचित हास्य करून ॥ बोले सलज्ज अधोवदन ॥ जें ऐकतां सुखसंपन्न ॥ अजनंदन होय पैं ॥६५॥

म्हणे हेच आवडी बहुवस ॥ कौसल्यागर्भीं जगन्निवास ॥ अवतरेल जो आदिपुरुष ॥ जगद्वंद्य जगदात्मा ॥६६॥

त्याची अहोरात्र सेवा बरवी ॥ वाटे मम पुत्रेंचि करावी ॥ जाणीव शहाणीव आघवी ॥ ओंवाळावी तयावरूनि ॥६७॥

सेवेपरतें थोर साधन । मम पुत्रासी न माने आन ॥ आपुले अंगाचें आंथरुण ॥ ज्येष्ठसेवनालागीं करूं ॥६८॥

त्रिभुवनराज्य तृणासमान ॥ त्याहूनि अधिक ज्येष्ठ भजन ॥ चारी मुक्ति वाटती गौण ॥ ज्येष्ठसेवेपुढें पैं ॥६९॥

सुधारस त्यजोनि निर्मळ ॥ कोणास आवडेल हाळाहळ ॥ उत्तम सांडूनि तांदुळ ॥ सिकता कांहो शिजवावी ॥७०॥

त्योजोनि सुंदर रायकेळे ॥ कोण भक्षील अर्कफळें ॥ कल्दद्रुमीं जो विहंगम खेळे ॥ तो नातळे बाभुळेसी ॥७१॥

मानससरोवरींचा हंस पाहीं ॥ तो कदा न राहे उलूकगृहीं ॥ बुडी दीधली क्षीराब्धिडोहीं ॥ दग्ध वन नावडे तया ॥७२॥

नंदनवनींचा भ्रमर कदाकाळीं ॥ अर्कपुष्पीं रुंजी न घाली ॥ जेणें इंद्रभवनीं निद्रा केली ॥ खदिरांगारीं न निजे तो ॥७३॥

रंभेतुल्य जाया चांगली ॥ सांडोनि प्रेत कोण कवळी ॥ तैसी भजनीं आवडी धरिली ॥ कदा विषयीं न रमे तो ॥७४॥

म्हणोनि चक्रचूडामणी ॥ माझी आवडी ज्येष्ठभजनीं ॥ ऐसें सुमित्रेचे शब्द कर्णी ॥ आकर्णिले दशरथें ॥७५॥

वाटे अमृत प्राशन केलें ॥ कीं त्रिभुवनराज्य हातासी आलें ॥ तैसें नृपाचें मन संतोषलें ॥ आलिंगिलें सुमित्रेसी ॥७६॥

म्हणे ऐक सुकुमार राजसे ॥ चंपककळिके परम डोळसे ॥ तुवां डोहळे इच्छिले जे मानसें ॥ ते मी सर्वस्वें पुरवीन ॥७७॥

नानाभूषणें अलंकार ॥ ओंवाळी तिजवरूनि नृपवर ॥ दानें देवविलीं अपार ॥ सुमित्रेहातीं याचकां ॥७८॥

याउपरी ज्येष्ठ राणी ॥ कौसल्या नामें ज्ञानखाणी ॥ जे पुराणपुरुषाची जननी ॥ ख्याति त्रिभुवनीं जियेची ॥७९॥

जे परब्रह्मरसाची मूस ॥ की निजप्रकाशरत्नमांदुस ॥ क्षीराब्धिहृदयविलास ॥ जिनें अंतरीं सांठविला ॥८०॥

जो इंदिरावर त्रिभुवनेश्र्वर ॥ ज्याचे आज्ञाधारक विधी शचीवर ॥ हृदयीं ध्यान अपर्णावर ॥ कौसल्याउदरनिवासी तो ॥८१॥

असो कौसल्येचे मंदिरीं ॥ प्रवेशता जाहला श्रावणारी ॥ सेवक राहविले बाहेरी ॥ द्वारमर्यादा धरोनियां ॥८२॥

कौसल्या ज्ञानकळा परम ॥ तीस अंतर्बाह्य व्यापला राम ॥ चराचर अवघे परब्रह्म ॥ न दिसे विषम कदाहि ॥८३॥

सांडोनि जागृति सुषुप्ति स्वप्न ॥ नयनीं ल्याली ज्ञानांजन ॥ चराचर अवघें निरंजन- ॥ रूप दिसे कौसल्ये ॥८४॥

दशरथ प्रवेशोनी अंतरीं ॥ पाहे स्थूळ ओसरीवरी ॥ मग सूक्ष्मदेह माजघरीं ॥ न दिसे कदा कौसल्या ॥८५॥

कारण कोठडींत पाहे सादर ॥ तंव तेथें अवघा अंधार ॥ मग महाकारण उपरी थोर ॥ त्यावरी नृप चढिन्नला ॥८६॥

तेथेंहि न दिसे कौसल्या सती ॥ मग चकित पाहे नृपति ॥ जिचे उदरीं सांठवला जगत्पति ॥ तिची स्थिति कळेना ॥८७॥

मग परात्परसांत ॥ प्रवेशता होय अजपाळसुत ॥ तों बैंसली समाधिस्त ॥ निर्विकल्पवृक्षास्तळीं ॥८८॥

अंतरीं दृष्टि मुरडली ॥ वदरळ स्वनाम विसरली ॥ ब्रह्मानंदरूप जाहली ॥ न चाले बोली द्वैताची ॥८९॥

जैसा परम सतेज मित्र ॥ तेथें डाग न लागे अणुमात्र ॥ स्वरूपीं पहुडतां योगेश्र्वर ॥ ज्ञान राहे ऐलीकडे ॥९०॥

कल्पांतविजूस मशक गिळी ॥ पिपीलिका मेरु कक्षेसी घाली ॥ धेनुवत्स मृगेंद्रा आकळी ॥ एखादे वेळे घडेल हें ॥९१॥

परी चतुरा विश्र्वरूपावरी ॥ दृष्टांत न चाले निर्धारीं ॥ श्रोतियांचे यज्ञशाळेभीतरीं ॥ कोठें महारी प्रवेशेल ॥९२॥

वडवानळापुढें कर्पूर जाण ॥ कीं जलनिधिमाजी लवण ॥ तैशी बुद्धि आणि मन ॥ स्वसुखावरी विरालीं ॥९३॥

असो स्वानंदसागरांत ॥ कौसल्या पूर्ण समाधिस्थ ॥ जवळी उभा ठाकला दशरथ ॥ पाहे तटस्थ उगाचि ॥९४॥

कौसल्या स्वस्वरूपीं लीन ॥ हे दशरथासी नेणवे खूण ॥ म्हणे हे रुसली संपूर्ण ॥ तरीच वचन न बोले ॥९५॥

म्हणून राजचक्रचूडामणि ॥ कौसल्येजवळ स्वयें बैसोनी ॥ स्नेहें तीस हृदयीं धरूनी ॥ समाधान करीतसे ॥९६॥

तरी न उघडी नयन ॥ नाहीं शरीराचें भान ॥ मी स्त्रीपुरुषस्मरण ॥ गेली विसरोन कौसल्या ॥९७॥

अलंकार कैंचे एक सुवर्ण ॥ तरंग लटके एक जीवन ॥ तैसे विश्र्व नाहीं एक रघुनंदन ॥ आनंदघन विस्तारला ॥९८॥

ऐसी कौसल्येची स्थिति जाहली ॥ राजा म्हणे हे झडपली ॥ कीं महद्भूतें पूर्ण घेतली ॥ ओळखी मोडली इयेची ॥९९॥

राजा म्हणे देव ऋषि सिद्ध ॥ इहीं दीधला आशीर्वाद ॥ कीं पोटा येईल ब्रह्मानंद ॥ आदिपुरुष श्रीराम ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : March 12, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP