ऐकतां रामनामस्मरण ॥ कौसल्येनें उघडिले नयन ॥ तों जगदाभास संपूर्ण ॥ रघुनंदनरूप दिसे ॥१॥
राजा म्हणे हो नितंबिनी ॥ कुरंगनेत्रे गजगामिनी ॥ काय जे आवडी असेल मनीं ॥ डोहळे पुरवीन सर्व ते ॥२॥
भ्रम टाकीं बोलें वचन ॥ तों कौसल्या बोले गर्जोन ॥ मी जगदात्मा रघुनंदन ॥ कैंचें अज्ञान मजपासीं ॥३॥
स्थूळ लिंग आणि कारण ॥ यांहून माझें रूप भिन्न ॥ महाकारण हं निरसून ॥ आत्माराम वेगळा मी ॥४॥
द्वैताद्वैत महाद्वैत ॥ याहून वेगळा मी अतीत ॥ सच्चिदानंद शब्द जेथ ॥ खुंटोनियां राहिला ॥५॥
जीव शिव हे दोन्ही पक्ष ॥ ध्याता ध्यान लय लक्ष ॥ यांवेगळा मी सर्वसाक्ष ॥ अचिंत्य अलक्ष श्रीराम ॥६॥
राजा म्हणे कौसल्ये ऐकें ॥ मी कोण आहें मज ओळखें ॥ डोहळे पुसावया महासुखें ॥ तुजजवळी बैसलों ॥७॥
येरी म्हणे ज्ञाता ज्ञेय ज्ञान ॥ हें सर्व गेलें आटोन ॥ नाहीं स्त्रीपुरुषनपुंसकपण ॥ मी तूंपण तेथें कैंचें ॥८॥
नृप म्हणे हे महद्भूतें घेतली ॥ ओळखी सर्व मोडली ॥ मग पुसे गोष्ट मागली ॥ धाकुटपणींची तियेतें ॥९॥
राजा म्हणे शशांकवदने ॥ गुणसरिते पद्मनयने ॥ वऱ्हाड बुडवोनि तुज रावणें ॥ नेलें होतें आठवतें कीं ॥११०॥
शत्रूचें नाम ऐकतां कर्णीं ॥ हाक फोडिली भुजा पिटोनी ॥ म्हणे धनुष्यबाण दे आणोनी ॥ टाकीन छेदोनि दाही शिरें ॥११॥
ताटिका मारूनियां आधीं ॥ ऋृषियाग पाववीन सिद्धी ॥ महाराक्षस वधोनि युद्धीं ॥ गाधितनय तोषवीन ॥१२॥
शिवचाप परम प्रचंड ॥ मोडोनि करीन दुखंड ॥ माझी ज्ञानशक्ति जे अखंड ॥ पणें जिंकोन आणीन ते ॥१३॥
जेणें निःक्षत्री केली अवनी पूर्ण । त्याचा गर्व हरीन न लागतां क्षण ॥ मी एकपत्नीव्रत रघुनंदन ॥ पितृवचन पाळीन मी ॥१४॥
मी सेवीन घोर विपिन ॥ परिवारेंसी त्रिशिरा खर दूषण ॥ क्षणमात्रें टाकीन वधोन ॥ अग्नि तृण जाळी जेवीं ॥१५॥
रिसां वानरांहातीं ॥ लंका घालीन पालथी ॥ माझा वज्रदेही मारुती ॥ परम पुरुषार्थी महावीर ॥१६॥
क्षणें जाळील राक्षसनगर ॥ शत्रूंचीं शिरें छेदीन अपार ॥ पाषाणीं पालाणोनि समुद्र ॥ लंकापुर घेईन मी ॥१७॥
कौसल्या हाक फोडी दारुण ॥ लंकेपुढें माजवीन रण॥ महाढिसाळ कुंभकर्ण ॥ टाकीन छेदून क्षणार्धें ॥१८॥
सहपरिवारें वधोनि दशशिर ॥ बंदीचे सोडवीन सुरवर ॥ माझा बिभीष्ज्ञण प्रियकर ॥ छत्र धरवीन तयावरी ॥१९॥
स्वपदीं स्थापोनि निजभक्त ॥ मी अयोध्येसी येईन रघुनाथ ॥ आधि व्याधि जरा मृत्य ॥ याविरहित करीन प्रजा ॥१२०॥
स्त्रीपुरुषनपुंसकभेद ॥ यावेगळा मी ब्रह्मानंद ॥ मायाचक्रचाळक शुद्ध ॥ निष्कलंक अभेद पैं ॥२१॥
मी प्रळयकाळासी शासनकर्ता ॥ आदिमायेचा निजभर्ता ॥ कर्ता हर्ता पाळितां ॥ मजपरता नसेचि ॥२२॥
मी अज अजित सर्वेश्र्वर ॥ मी नटलों चराचर ॥ धरोनि नाना अवतार ॥ मी मजमाजीं सामावें ॥२३॥
ऐसें ऐकतां दशरथ ॥ म्हणे हे भूतें घेतली यथार्थ ॥ फांटा फुटलासे बहुत ॥ बडबडत भलतेंचि ॥२४॥
पंचाक्षरी आणा पाचारून ॥ महाराज सद्रुरु ज्ञानघन ॥ तो सरसिजोद्भवनंदन ॥ बोलावून आणा वेगीं ॥२५॥
जेणें दर्भावरी धरिली अवनी ॥ कमंडलु ठेविला सूर्यासनीं ॥ इंद्रसभेसी नेला वासरमणी ॥ अद्रुत करणी जयाची ॥२६॥
वसिष्ठ आला धांवोन ॥ राजा दृढ धरी चरण ॥ म्हणे कौसल्येसारखें निधान ॥ भूतें संपूर्ण ग्रासिलें ॥२७॥
म्यां याग केला सायासीं ॥ कीं पुत्र होईल कौसल्येसी ॥ तों मध्येंच हे विवशी ॥ उठली ऋृषि काय करूं ॥२८॥
मग म्हणे ब्रह्मसुत ॥ इच्या पोटा येईल रघुनाथ ॥ तीस गोष्टी ये विपरीत ॥ कालत्रयीं घडेना ॥२९॥
अंधकूपीं पडेल तरणी ॥ कोरान्न मागेल चिंतामणी ॥ सुधारस गेला कडवटोनी ॥ हें कालत्रयीं घडेना ॥१३०॥
क्षुधेनें पीडिला क्षीरसागर ॥ सुरतरूसी येईल दरिद्र ॥ तीव्र तपेल रोहिणीवर ॥ हें कालत्रयीं घडेना ॥३१॥
असो वसिष्ठ कौसल्येजवळी ॥ येऊनि विलोकी तयेवेळी ॥ तंव ती श्रीरामरूप जाहली ॥ अंतबार्ह्य समूळ ॥३३॥
न दिसे स्त्रियेसी आकृति ॥ धनुष्यबाण घेऊनि हातीं ॥ आकर्ण नयन विराजती ॥ देख मूर्ति जगद्वंद्य ॥३४॥
मूर्ति पाहतां आनंदघन ॥ सद्रद जाहला ब्रह्मनंदन ॥ अष्टभाव दाटले पूर्ण ॥ गेला विसरोनि देहभाव ॥३५॥
वसिष्ठ कौसल्या ते अवसरी ॥ मुरालीं ब्रह्मानंदसागरीं ॥ दशरथ परम अंतरीं ॥ घाबरा जाहला नेणोनियां ॥३६॥
वसिष्ठासारखा महामुनी ॥ भूतें झडपिला येक्षणीं ॥ या भूताची करिता झाडणी ॥ कोणी त्रिभुवनीं दिसेना ॥३७॥
मी हतभाग्य संपूर्ण ॥ मज कैचें पुत्रसंतान ॥ कौसल्याही गेली झडपोन ॥ ब्रह्मानंदें मूर्च्छित ॥३८॥
निरपराध वधिला श्रावण ॥ तेणें हें दुःख दारुण ॥ ऐसा तो महाराज अजनंदन ॥ जळाला पूर्ण अंतरीं ॥३९॥
तों स्वानंदलहरी जिरवून ॥ वसिष्ठें उघडिले नयन ॥ राजा धांवोन धरी चरण ॥ आनंद न माय अंतरीं ॥१४०॥
रायासी कैसी परी जाहली ॥ कीं पुरीं बुडतां नौका आली ॥ अंधकूपीं पडतां तात्काळीं ॥ हस्त सूर्यें दीधला ॥४१॥
सर्पे डंखितां गरुड धांवे ॥ गर्जे कोंडितां केसरी पावे ॥ कीं क्षुधितांपुढें हेलावे ॥ क्षीरसागर येऊनियां ॥४२॥
कीं वणव्यांत जळतां वरुर्षे घन ॥ कीं हुडहुडी भरतां कृशान ॥ कीं दरिद्रें पीडितां लक्ष्मी आपण ॥ घरीं येऊनि बैसली ॥४३॥
ऐसा आनंदला सद्गुरु स्वामी तूं समर्थ ॥ मज नवल हें वाटत ॥ तुजही भूतें झडपिलें ॥४४॥
आम्ही अत्यंत भाग्यहीन ॥ कैंचें देखो पुत्रसंतान ॥ मग हांसिन्नला ब्रह्मनंदन ॥ काय गर्जोन बोलत ॥४५॥
जो नीलग्रीवहृदयरत्न ॥ जो कमलोद्भवाचें देवतार्चन ॥ सनकादिक करोनी यत्न ॥ हृदयसंबळींत वाहती पैं ॥४६॥
तो वैकुंठपुरविलासी ॥ आला कौसल्येच्या गर्भासी ॥ मारूनि सकळ दुष्टांसी ॥ देव सोडवील बंदीचे ॥४७॥
जें जें कौसल्या बोलिली सत्य ॥ तितुकें होईल यथार्थ ॥ तुज होतील चार सुत ॥ सत्य वचनार्थ राजेंद्रा ॥४८॥
शंख चक्र शेष नारायण ॥ चर्तुधा रूपें प्रकटेल जगज्जीवन ॥ ज्याची कथा ऐकतां पापी जन ॥ उद्धरोनि तरतील ॥४९॥
माध्यान्हा येईल चंडकिरण ॥ पुष्य नक्षत्र साधून ॥ अवतरेल रघुनंदन ॥ पूर्णब्रह्म जदद्रुरु ॥१५०॥