ब्रह्मानंदस्वामीचा बंधु सत्य ॥ नाम तयाचें श्रीरंगनाथ ॥ ज्याची कविता ऐकतां समस्त ॥ अपार जन उद्धरले ॥१॥
आतां असोत समस्त कविवर ॥ अवघे ब्रह्मानंदरूप साचार ॥ त्यांसी अनन्य शरण श्रीधर ॥ द्यावा वर ग्रंथासी ॥२॥
रविकुळीं अवतरोनि श्रीरघुवीर ॥ कैसें केलें लीलाचरित्र ॥ धन्य त्या वाल्मीकाचें वक्र ॥ कथा अपार बोलिला ॥३॥
हें वर्णितां श्रीरामचरित्र ॥ तरला वाल्मीक साचार ॥ पापें आचरला अपार ॥ ऐका सादर गोष्टी ते ॥४॥
वाल्मीक पूर्वीं द्विजसुत ॥ त्यजोनि आचार यज्ञोपवीत ॥ किरातसंगें वाट पाडित ॥ अति उन्मत्त विषयांध ॥५॥
महा दुर्धर कानन ॥ देखतां भयभीत होय मन ॥ पर्वतदरीमाजीं स्थळ करून ॥ सहपरिवारें वसे तेथें ॥६॥
भोंवतें द्वादश गांवेंपर्यंत ॥ पाळती राखोनि वाट पाडित ॥ केल्या ब्रह्महत्त्या असंख्यात ॥ नाहीं गणित इतर जीवां ॥७॥
मत्स्य धरावयालागीं बक ॥ बैसे होऊनियां सात्विक ॥ कीं मृषकालागीं बिडालक ॥ बैसे टपत जयापरी ॥८॥
कीं अंगसंकोचें पारधी ॥ जपोनि तत्काळ मृग साधी ॥ तैसा वाल्हा जीव वधी ॥ पापनिधि निर्दय ॥९॥
अपार जीव मारिले ॥ पापाचे पर्वत सांचले ॥ जैसे अंत्यजगृहाभोंवते पडिले ॥ ढीग बहुत अस्थींचे ॥११०॥
ऐसें करितां पापाचरण ॥ तयासी आलें वृद्धपण ॥ पुत्र झाले अति तरुण ॥ तरी अंगवण न सोडी ॥११॥
शस्त्र हातीं घेऊनि वाल्हा ॥ मार्ग रक्षीत जों बैसला ॥ तों अकस्मात नारद प्रगटला ॥ पूर्वपुण्येंकरूनियां ॥१२॥
चंद्रा वेष्टित नक्षत्रें जैसीं ॥ भोंवतीं ऋषींची मांदी तैसी ॥ तों पाळती सांगती वाल्हियासी ॥ जाती तापसी बहुसाल ॥१३॥
वाटेसी धांवोन आडवा आला ॥ शस्त्र उभारोनी तें वेळां ॥ दटावोनि ऋषींचा मेळा ॥ उभा केला क्षणभर ॥१४॥
कीं स्वर्गपंथें जातां नेटें ॥ जैसी यमपुरी लागे वाटे ॥ कीं तपें आचरतां उद्भटें ॥ कामक्रोध अडविती ॥१५॥
असो वाल्हा म्हणे तयांसी ॥ मात्रा आणारे मजपासीं ॥ नाहीं तरी मुकाल प्राणासी ॥ माझिया हस्तें या काळीं ॥१६॥
मग पुढें होऊन ब्रह्मनंदन ॥ म्हणे ऐक एक आमुचे वचन ॥ तुज आलें वृद्धपण ॥ पापें अपार घडलीं कीं ॥१७॥
द्रव्य जोडिलें त्वां अपार ॥ झाले दृष्कृतांचे संभार ॥ तुझे पापासी वांटेकर ॥ कोण आहेत हे विचारीं ॥१८॥
तुझें आलें जवळी मरण ॥ यम जेव्हां गांजील दारुण ॥ तेव्हां तुजला सोडवील कोण ॥ पाहें विचारून अंतरीं ॥१९॥
दारा पुत्र धन यौवन ॥ बंधु सेवक आप्त स्वजन ॥ शस्त्रें अस्त्रें चतुरंग सैन्य ॥ न ये कामा ते वेळे ॥१२०॥
जीं जीं प्राणी कर्में करिती ॥ तितुकीं देव सर्व विलोकिती ॥ सकळ तत्त्वें व्यापून वर्तती ॥ मग साक्ष देती परत्रीं ते ॥२१॥
यमपुरीस चित्रगुप्त ॥ पत्रें काढुनि वाचित ॥ मग त्यासारिखा दंड करीत ॥ कोण तेथें सोडवील ॥२२॥
जो पुण्यपंथें न चाले नर ॥ निंदी तीर्थयात्रा समग्र ॥ त्यासी ताम्रभूमि तप्त अपार ॥ तीवरी चालविती हळूहळू ॥२३॥
जो परोपकार न करिती ॥ त्यांसी असिपत्रावरि हिंडविती ॥ इकडून तिकडे शस्त्रें टोंचती ॥ कोण सोडवील ते स्थानीं ॥२४॥
तप्त लोहाचा स्तंभ दारुण ॥ त्यासी भेटविती नेऊन ॥ देवद्विजां जो न करी नमन ॥ त्यासी जाण हीच गती ॥२५॥
जो संतांसी देखों न शके अपवित्र ॥ त्याचे रागें गीध फोडिती नेत्र ॥ जो कीर्तन स्मरण न करी अणुमात्र ॥ जिह्णा तोडिती सांडसें ॥२६॥
गुरु देवब्राह्मण सांडूनी ॥ जो षड्रस सेवी पापखाणी ॥ महानरकींचें दुर्गंध पाणी ॥ तयाचे वदनीं ओतिती ॥२७॥
जो तीर्थस्नान निंदी खळ ॥ त्यासी तप्त कढयीमाजीं जें तैल ॥ त्यांत तळिती तत्काळ ॥ कोण सोडवील तेथें पैं ॥२८॥
जे साधुसंतासि पीडिती ॥ त्यांचे अंगाची सालें काढिती ॥ जे गुरु द्विज तीर्थें अव्हेरिती ॥ त्यांचे तोंडीं घालिती नरकमूत्र ॥२९॥
धर्मवाट रोधून हरिती जे धन ॥ त्यांसी कुंभीपाकीं घालून ॥ खालीं चेतविती कृशान ॥ माजीं आक्रंदोनि चडफडती ॥१३०॥
लोहदंड करूनि तप्त ॥ कानीं खोंविती यमदूत ॥ जो नायके हरिकथामृत ॥ गति निश्र्चित त्यास ही ॥३१॥
ऐसें बोलतां नारदऋृषी ॥ अनुताप जाहला त्याचे मानसीं ॥ वेगें आला निजसदनासी ॥ स्त्रीसुतांदिकांसीं पुसत ॥३२॥
पापें घडलीं मजलागीं ॥ कोणी होतां काय विभागी ॥ तंव ते म्हणती आमुचे अंगीं ॥ न लागती पापें सर्वथा हीं ॥३३॥
आम्ही भाग्याचे वांटेकरी यथार्थ ॥ पापें तुझीं तूं भोगी समस्त ॥ वाल्हा झाला सद्रदित ॥ म्हणे कैसें आतां करावें ॥३४॥
हा नरदेह उत्तम पूर्ण ॥ केवळ भगवत्प्राप्तीचें कारण ॥ म्यां आत्महित न करून ॥ बुडालों कीं अंधतमीं ॥३५॥
पुण्यक्षेत्र सरसाविलें ॥ तेथें कनकबीज पेरिलें ॥ कनकाचें ताट घडिलें ॥ त्यांत वाढिलें तृणबीज ॥३६॥
सुधारसकुंभ दैवें जोडला ॥ तो नेऊन उकिरडां ओतिला ॥ चिंतामणि फोडून घातला ॥ पायरीस अभ्याग्यें ॥३७॥
सुरभी शोधीत आली घर ॥ तिसी मारूनि काष्ठप्रहार ॥ अभ्याग्यें घातली बाहेर ॥ तोच प्रकार मज जाहला ॥३८॥
बळें कल्पवृक्ष तोडून ॥ वाढविलें कंटकवन ॥ राजहंस दवडून ॥ दिवाभीत पाळिलें ॥३९॥
रंभा तोडूनि महामुर्खें ॥ अर्की वाढविल्या सकौतुकें ॥ वोसंडोनि सतेज मुक्तें ॥ सिकताहरळ भरियेली ॥१४०॥
असो ऐसा अनुतापें वाल्हा ॥ नारदापासीं परतोन आला ॥ सद्रद कंठ अश्रु डोळां ॥ साष्टांग घातला नमस्कार ॥४१॥
तनुमनधनेंसीं अनन्य ॥ स्वामी तुज मी आलों शरण ॥ तूं कृपेची नौका करून ॥ तारीं मज अघसाागरीं ॥४२॥
महाराज तूं धन्वंतरी ॥ माझा भवरोग दूर करीं ॥ जळतों या वणव्याभीतरीं ॥ मेघ झडकरी वर्षें तूं ॥४३॥
पडिलों मायेचे मेळीं ॥ पंचभूतें मज झोंबलीं ॥ वासनाविशवी गळां पडली ॥ कदाकाळीं सोडीना ॥४४॥
अहंदेहबुद्धि डांकिण ॥ ममता सटवी दारुण ॥ लोभ झोटिंग एक क्षण ॥ मज उमज घेऊं नेदी ॥४५॥
क्रोध महिषासुर दारुण ॥ कामवेताळें झडपिलें पूर्ण ॥ तृष्णा मायराणी अनुदिन ॥ सर्वदाही न सोडी ॥४६॥
जाहलों मी अत्यंत क्षीण ॥ पंचाक्षरी तूं ब्रह्मनंदन ॥ सकळ भूतें टाकीं झाडून ॥ म्हणोनि चरण धरियेले ॥४७॥
अष्टभावें जाहला सद्रदित ॥ मग मनीं विचारी ब्रह्मसुत ॥ रोग पाहुनि वैद्य निश्र्चित ॥ दिव्य मात्रा काढी जेवीं ॥४८॥
म्हणे हा अनधिकारी परम ॥ ‘मरा’ ऐसें सांगें नाम ॥ म्हणे हेंचि तूं जपें सप्रेम ॥ मुख्य वर्म जाण पां ॥४९॥
तें जीवन नाम जपत ॥ तेथेचि बैसला ध्यानस्थ ॥ आंगावरी वारुळ वाढत ॥ ध्वनि उमटत आंतोनी ॥१५०॥