जे भक्तसरोवरीचें राजहंस ॥ जे कां अविद्यारण्यहुताश ॥ कीं ते पद्महस्ती विशेष ॥ भवरोगा वैद्य होती ॥५१॥
कीं जीव पावे आपले पदासी ॥ ऐसा मुहूर्त देणार ते ज्योतिषि ॥ कीं ते पंचाक्षरी स्वप्रतापेंसीं ॥ पंचभूतांसी पळविती ॥५२॥
कीं ते दैवीसंपत्तीनें भाग्यवंत ॥ मुमुक्षूंसी करिती दरिद्ररहित ॥ कीं ते दयेचीं अद्भुत ॥ गोपुरें काय उंचावलीं ॥५३॥
संत श्रोते चतुर पंडित ॥ माझें बोलणें आरुष अत्यंत ॥ जैसा सरस्वतीपुढें मूढ बहुत ॥ वाग्विलास दावीतसे ॥५४॥
सूर्यापुढे जैसा दीप देख ॥ कीं जान्हवीस न्हाणावया थिल्लरोदक ॥ कीं कनकाद्री जो अति सुरेख ॥ त्यासी अलंकार पितळेचे ॥५५॥
कामधेनूस अर्पिलें अजाक्षीर ॥ चंद्रासी शीतळ करी रंभापुत्र ॥ कल्पतरु कल्पिलें देणार ॥ त्यासी निंबोळ्या समर्पिल्या ॥५६॥
रत्नाकरापुढें कांच समर्पिली ॥ तैसी माझी हे आरुष बोली ॥ परी तुम्ही प्रीति बहु ठेविली ॥ प्राकृत शब्दीं नवल हें ॥५७॥
विष्णुसी भूषणें अपार ॥ परी तुळसीवरी आवडी थोर ॥ कीं पार्वतीपतीस बिल्वपत्र ॥ भक्तीं वाहतां आवडे ॥५८॥
रायें दासीस पाठीं घालितां । तिची सर्वांवरी चाले सत्ता ॥ थोड्या मोलाचे अळंकार लेतां ॥ जनसमस्तां थोर दिसे ॥५९॥
म्हणोनि तुम्ही संत प्रभु थोर ॥ तुमचा महिमा न वर्णवे अपार ॥ मोटेंत बांधवेल समीर ॥ चरणीं अंबर क्रमवेल पैं ॥६०॥
गणवतील पृथ्वीचे रजःकण ॥ मोजवेल सिंधूचें जीवन ॥ कनकाद्रीचा चेंडू करून ॥ उडविजेल सर्वथा ॥६१॥
भोगींद्रमस्तकींचा मणी ॥ आणवेल एखादे क्षणीं ॥ सूर्य जातां धरवेल गगनीं ॥ नक्षत्रें गुणीं ओंविजेतील ॥६२॥
काढवेल शशिमंडळीचें अमृत ॥ मोडवतील ऐरावतीचे दांत ॥ कीं दिग्गज आणोन समस्त ॥ एके ठायीं बांधिजेतील ॥६३॥
तुरंग करूनि प्रभंजन ॥ करवेल सर्वत्र गमन ॥ परी न कळे संतांचें महिमान ॥ जे ब्रह्मानंदें पूर्ण सदा ॥६४॥
तों संत बोलती आनंदघन ॥ मन निवालें तव बोल ऐकून ॥ आम्ही करूं इच्छितों रामकथा श्रवण ॥ वरी दृष्टांत गोड तुझे ॥६५॥
मेरू सुंदर रत्नेंकरून ॥ कीं नक्षत्रें मंडित गगन ॥ कीं वृक्ष फळीं परिपूर्ण ॥ तैसा दृष्टांतें ग्रंथ शोभे ॥६६॥
कीं शांति क्षमा दया विशेष ॥ तेणें मंडित सत्पुरुष ॥ कीं परिवारासहित नरेश ॥ दृष्टांत सुरस ग्रंथीं तैसे ॥६७॥
आधींच भूक लागली बहुत ॥ त्याहीवरी वाढिलें पंचामृत ॥ कीं दुर्बळासी अकस्मात ॥ कल्पतरु भेटला ॥६८॥
कन्यार्थी हिंडतां भूमंडळ ॥ त्यासी राजकन्या घाली माळ ॥ कीं रोगीयासी रसायन निर्मळ ॥ अकस्मात जोडलें ॥६९॥
आतां बहु टाकोनि शब्दजाळ ॥ बोलें रामकथा रसाळ ॥ जैसी सिकता सांडोनि मराळ ॥ मुक्ताफळेंचि सेविती ॥७०॥
कीं कोशगृहीं प्रवेशोनी ॥ भांडारी रत्नें काढी निवडोनि ॥ कीं दोष टाकून सज्जनीं ॥ उत्तम गुण स्वीकारिजे ॥७१॥
ऐसे संतांचें बोल परिकर ॥ ऐकोनी ब्रह्मानंदें श्रीधर ॥ साष्टांग घालोनि नमस्कार ॥ म्हणे सादर परिसिजे ॥७२॥
असंभाव्य श्रीरामचरित्र ॥ शतकोटि ग्रंथ सविस्तर ॥ वाल्मीक बोलिला अपार ॥ कथासमुद्र अगम्य ॥७३॥
जो सत्यवतीहृदयरत्न ॥ कथी जगद्रुरु पराशरनंदन ॥ तें व्यासोक्त रामायण ॥ कोणा संपूर्ण न वर्णवे ॥७४॥
वसिष्ठें कथिलें निश्र्चितीं ॥ तें वासिष्ठरामायण म्हणती ॥ शुकें कथिलें नानारीतीं ॥ शुकरामायण बोलती तया ॥७५॥
जो अंजनीहृदयारविंदभ्रमर ॥ तेणें पाहोन श्रीरामचरित्र ॥ कथिलें नाटकरामायण साचार ॥ अपार चरित्र निजमुखें ॥७६॥
जो परम विश्र्वासें श्रीरामासी शरण ॥ शक्रारिजनकबंधु बिभीषण ॥ तेणें रामचरित्र कथिलें पूर्ण ॥ बिभीषणरामायण म्हणती तया ॥७७॥
कमलोद्भव विष्णुसुत ॥ तेणें नारदासी कथिलें हें चरित्र ॥ तें ब्रह्मरामायण अद्भुत ॥ उमेसी सांगत शिव रामायण ॥७८॥
जो कलशोद्भव महामुनी ॥ जेणें जलधि आटिला आचमनेंकरूनी ॥ तेणें रामकथा ठेविली विस्तारोनी ॥ अगस्तिरामायण म्हणती तया ॥७९॥
भोगींद्र कथी सर्पांप्रती ॥ तें शेषरामायण बोलिजे पंडितीं ॥ अध्यात्मरामायण समस्तीं ॥ ऋषींनीं निवडून काढिलें ॥८०॥
एक शेषरामायण सत्य ॥ आगमरामायण एक बोलित ॥ कूर्मरामायण यथार्थ ॥ कूर्मपुराणीं बोलिलें ॥८१॥
स्कंदरामायण अपार ॥ एक पौलस्तिरामायण परिकर ॥ कालिकाखंडीं सविस्तर ॥ रामकथा कथियेली ॥८२॥
रविअरुणसंवाद ॥ ते अरुणरामायण प्रसिद्ध ॥ पद्मपुराणीं अगाध ॥ पद्मरामायण कथियेलें ॥८३॥
भरतरामायण चांगलें ॥ एक धर्मरामायण बोलिलें ॥ आश्र्चर्यरामायण कथिलें ॥ बकदाल्भ्यऋृषीप्रती ॥८४॥
मुळापासून इतक्या कथा ॥ कैशा वर्णवतील तत्त्वतां ॥ त्यांमाजीं वाल्मीकनाटकाधारें कथा ॥ रामविजयालागीं कथूं ॥८५॥
समस्त कवींस नमस्कार ॥ जो जगद्रुरु आचार्य श्रीशंकर ॥ जेणें मतें उच्छेदोन समग्र ॥ शुद्ध मार्ग वाढविला ॥८६॥
पूर्वी एक सत्यवतीकुमर ॥ तैसाचि कलियुगीं श्रीशंकर ॥ जो ज्ञानाचा सागर ॥ जनदुद्धार केला जेणें ॥८७॥
सकळ मतें उच्छेदून ॥ सन्मार्ग वाढविला पूर्ण ॥ सकळ मतवादी जंबुक जाण ॥ शंकरसिंह गर्जतसे ॥८८॥
सकळ मतवादी दरिद्री ॥ शंकर श्रीमंत पृथ्वीवरी ॥ संन्यासदीक्षा निर्धारीं ॥ स्थापिली जेणें विधियुक्त ॥८९॥
अवघे मतवादी रजनीचर ॥ शंकर त्यांवरी रघुवीर ॥ कीं कौरव वधावया यादवेंद्र ॥ अति उदित साक्षेपें ॥९०॥
तैसा श्रीशंकराचार्य सकळ ॥ कुमतें छेदी तात्काळ ॥ त्या आचार्याचें पदकमळ ॥ श्रीधरभ्रमरें वंदिलें ॥९१॥
जो श्रीधराचार्य टीककारा ॥ त्यासी नमस्कारी श्रीधर ॥ मधुसूदनादिक कवींद्र ॥ ग्रंथ अपार जयांचे ॥९२॥
जो श्रृंगारवनींचा विहंगम जाण ॥ जो जयदेव पद्मावतीरमण ॥ त्याची काव्यकला पाहून ॥ पंडितजन तटस्थ ॥९३॥
जो वेदांतक्षीरार्णवींचा मीन ॥ जेणें विवेकसिंधु रचिला पूर्ण ॥ तो मुकुंदराज गुणनिधान ॥ तयाचे चरण वंदिले ॥९४॥
तारावया जन समग्र ॥ पुनः अवतरला रमावर ॥ गीतार्थ केला साचार ॥ तो ज्ञानेश्र्वर जगद्गुरु ॥९५॥
जो भानुदासकुळभूषण ॥ प्रतिष्ठानवासी परिपूर्ण ॥ त्या एकनाथें ग्रंथसंपूर्ण ॥ बहुसाल कथियेले ॥९६॥
जे चातुर्यजानधानीचे कळस ॥ मुक्तेश्र्वर मुद्रलदास ॥ ज्यांचे ग्रंथ पाहतां सुरस ॥ ब्रह्मानंद उचंबळे ॥९७॥
जैसा चंडांशु सतेज व्योमीं ॥ तैसाचि केवळ वामनस्वामी ॥ ज्याची श्र्लोकरचना या भूमि-॥ मंडळीवरी अपूर्व ॥९८॥
कृष्णदास जयराम ॥ जो शांतिदयेचें निजधाम ॥ ज्याचे ग्रंथ ज्ञानभरित परम ॥ जो निस्मीम ब्रह्मचारी ॥९९॥
श्रीरामउपासक निर्मळ ॥ जो भजनसरोवरींचा मराळ ॥ तो रामदासमहाराज केवळ ॥ भक्ति प्रबळ लावी जनां ॥१००॥