अध्याय पहिला - श्लोक १ ते ५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ ॐ नमोजी पुराणपुरुषा ॥

श्रीमद्भीमातटविलासा ॥ दिगंबरा अविनाशा ॥ ब्रह्मानंदा जगद्रुरो ॥१॥

जय जय जदद्वंद्या पूर्णब्रह्मा ॥ अजअजित आत्मयारामा ॥ नीलग्रीवहृदयविश्रामा ॥ पूर्णनंदा परात्परा ॥२॥

जयजय मायाचक्रचालका ॥ मायातीता विरिंचिजनका ॥ सकळचित्तरीक्षका ॥ निजजनरक्षका करुणाब्धे ॥३॥

कमलोद्भव वैकुंठ कर्पूरगौर ॥ अंबिका गजवदन दिनकर ॥ हीं स्वरूपें तुझी साचार ॥ तूं निर्विकार सर्वदा ॥४॥

मंगळकारक तूं गजवदन ॥ मंगळारंभीं तुझेंचि नमन ॥ मंगळजननीवरी करितां लेखन ॥ तुझे गुण न सरती ॥५॥

रातोत्पलें सकुमार बहुत ॥ तैसे चरतळवे आरक्त ॥ प्रपद गौर नेपुरांसहित ॥ ध्याती भक्त हृदयांतरीं ॥६॥

क्षीरावर्णवश्र्वेतांबर ॥ कीं कांसेसी लागला क्षीरसागर ॥ कीं निर्दोष यश पवित्र ॥ वसनरूपें आकारलें ॥७॥

अरुणसंध्यारागामिश्रित ॥ तैसी उटी दिसे आरक्त ॥ कीं मंदराचळ सिंदूर चर्चित ॥ चारी हस्त विराजती ॥८॥

भक्तांचा मनोवारण अनिवार ॥ नावरेचि कदा साचार ॥ तो आकर्षावया निर्धार ॥ विवेकांकुश धरियेला ॥९॥

भावें जे शरण येती अज्ञानजन ॥ त्यांचें छेदावया अविद्याविपिन ॥ यालागीं ऊर्ध्व फरश धरून ॥ सिद्ध गजानन सर्वदा ॥१०॥

हातीं झळके लीलाकमळ ॥ जें अम्लान न विटे सर्वकाळ ॥ तेणें पुजूं इच्छी भक्त प्रेमळ ॥ जे कां निर्मळ अंतर्बाह्य ॥११॥

जैसे कल्पांतविजूचे उमाळे ॥ तैसे अलंकार अंगीं मिरवले ॥ नक्षत्रपुंज गुणीं ओंविले ॥ तेवीं मुक्ताहार डोलती ॥१२॥

हृदयकाशीं सुरेख ॥ पदक झाला तो मृगांक ॥ क्षयरहित निष्कलंक ॥ निजसुखें सुरवाडला ॥१३॥

भक्तांसी विघ्ने येती प्रचंडें ॥ तीं जो आकळी शुंडादंडें ॥ कल्पांत विजूचेनि पाडें ॥ एकदंत झळकतसे ॥१४॥

दिगंतचक्रीं तेज न समाय ॥ तैसीं कुंडलें झळकती मणिमय ॥ किंवा चंद्र आणि सूर्य ॥ कुंडलरूपें तळपती ॥१५॥

मुगुटीं झळकती रत्नकळा ॥ तेणें नभमंडप उजळला ॥ आदिपुरुष हा साकारलां ॥ वरदान द्यावया कवीतें ॥१६॥

ऐसा महाराज गजवदन ॥ वरदहस्तें दावी चिन्ह ॥ करी रामकथाबीजारोपण ॥ त्यासी जीवन घालीन मी ॥१७॥

ऐसा उगवतां वरदचंद्र ॥ तेणें उल्हासे कविहृदयसमुद्र ॥ साहित्यभरतें अपार ॥ असंभाव्य दाटलें ॥१८॥

जयजय गजवदना निरुपमा ॥ अगाध न वर्णवे तव महिमा ॥ तुझिया गुणांची पाववया सीमा ॥ कैसा सरता होईन मी ॥१९॥

काखेंसी मेरू घेऊनि देखा ॥ कैसी नृत्य करील पिपीलिका ॥ कैसे ब्रह्मांड उचलेल मशका ॥ भृगोळ मक्षिका केविं हलवी ॥२०॥

चंद्रासी कर्पूराचें उटणें ॥ वासरमणीस दर्पण दावणें ॥ हिमनगासी वारा घालणें ॥ मेघासी अर्पणें उदकांजुळी ॥२१॥

सुरतरूपुढें ठेविजे बदरीफळ ॥ मलयाचळासी धूपपरिमळ ॥ कामधेनूसी शुष्कतृणकवळ ॥ आणोनियां समर्पिलें ॥२२॥

क्षीरसिंधूसी समर्पिजे अजाक्षीर ॥ कनकाद्रीपुढें ठेविजे गार ॥ तैसें प्राकृतबोलें अपार ॥ तुझें महत्त्व केविं वर्णंू ॥२३॥

परी जो जो छंद घेत बाळक ॥ तो स्नेहेंकरोनी पुरवी जनक ॥ तरी हा रामविजय सुरेख ॥ सिद्धि पावो तव कृपें ॥२४॥

आतां नमूं सरसिजोद्भवकुमारी ॥ जे विलसे सदा कविजिह्णाग्रीं ॥ जिच्या प्रसादें मुकाही करी ॥ वाचस्पतीसीं संवाद ॥२५॥

जे आनंदसरोवरमराळिका ॥ जे चातुर्यचंपककळिका ॥ जे निजकृपेची करूनि नौका ॥ कविबाळका परतीरा नेत ॥२६॥

कृपें तुझ्या विरिंचिकुमारी ॥ जन्मांध होती महाजोहरी ॥ अतिमूढ तो वेदार्थ करी ॥ शक्रपदीं निर्धारीं रंक बैसे ॥२७॥

अंबे तूं कविहृदयाब्जभ्रमरी ॥ कीं निजानंदसागरींची लहरी ॥ वाग्वल्ली तूं बैसोनि जिह्णाग्रीं ॥ विरूढें सफळ सर्वदा ॥२८॥

विवेकहंस शुद्ध धवळ ॥ त्यावरी तुझें आसन अचळ ॥ तप्त कांचन जैसें सुढाळ ॥ तैसें निर्मळ निजांग तुझें ॥२९॥

शुभ्र कंचुकी शुभ्र अंबर ॥ दिव्य मुक्तनग अळंकार ॥ निजबोधवीणा घेऊन सुस्वर ॥ गायन करिसी स्वानंदें ॥३०॥

ऐकतां शारदेचें गायन ॥ तन्मय विधि विष्णु ईशान ॥ अंबे तुझें सौंदर्य पाहोन ॥ मीनकेतन तटस्थ ॥३१॥

रंभा ऊर्वशी तिलोत्तमा ॥ सावित्री अपर्णा मुख्य रमा ॥ तुझ्या चातुर्यसमुद्राची सीमा ॥ त्याही कदा न पावती ॥३२॥

अंबे तुझे गुण केविं वर्णावे ॥ केविं अर्कास अर्कीसुमनें पूजावें ॥ अंबर मुष्टींत केविं सांठवे ॥ पल्लवीं बांधवे वायु कैसा ॥३३॥

न करवे उर्वीचें वजन ॥ न गणवे सिंधूचें जीवन ॥ सप्तावरणें भेदोन ॥ मशक केविं जाऊं शके ॥३४॥

ऐकोनि बाळकाचीं वचनें ॥ जननी हृदयीं धरी प्रीतीनें ॥ तैसें सरस्वतीनें निजकृपेनें ॥ घातलें ठाणें जिह्णाग्रीं ॥३५॥

माझें मन मूढ चकोर ॥ कुहूमाजी इच्छी रोहिणीवर ॥ तरी सरस्वती कृपाळु थोर ॥ शुद्ध बीज प्रकटली ॥३६॥

बीजेपासून चढत्या कळा ॥ तों तों चकोरांसी अधिक सोहळा ॥ तैसी येथें रघुनाथलीळा ॥ चढेल आगळा रस पुढें ॥३७॥

ज्ञानाचे अनंत डोळे ॥ उघडिले एकेचि वेळे ॥ आतां वंदू श्रीगुरूचीं पाऊलें ॥ जयाचेनि प्रगटलें दिव्य ज्ञान ॥३८॥

जो अज्ञानतिमिरच्छेदक ॥ जो प्रकट वेदांतज्ञानार्क ॥ तो ब्रह्मानंदमहाराज देख ॥ परमाद्भुत महिमा जयाचा ॥३९॥

जो कां पांडुरंगभक्त नर विख्यात ॥ जो भक्त भीमातीरीं समाधिस्थ ॥ तो यतिराजमहिमा अद्भुत ॥ कवण वर्णूं शके पैं ॥४०॥

जागृती स्वप्न सुषुप्ति तुर्या पूर्ण ॥ या चार अवस्थांवरी ज्याचें आसन ॥ उन्मनीही निरसोन ॥ स्वसुखें पूर्ण समाधिस्थ ॥४१॥

चांदिणें कैचें नसतां मृगांक ॥ किरणें कैचीं नुगवतां अर्क ॥ जीवनावांचोनि बीजीं देख ॥ अंकुर सहसा फुटेना ॥४२॥

जरी नेत्रेंवीण जरी निवडे नवनीत ॥ तरी सद्भुरूवांचोनि परमार्थ ॥ ठायीं न पडे जीवासी ॥४३॥

वर नसतां व्यर्थ वऱ्हाड ॥ शिर नसतां कायसें धड ॥ तैसें गुरुकृपेंवीण कबाड ॥ तपें व्रतें साधनें ॥४४॥

अजनेंवीण न सांपडे निधान ॥ गायत्रीवीण ब्राह्मणपण ॥ सीमा कैंची ग्रामावीण ॥ तैसें गुरूवीण ज्ञान नोहे ॥४५॥

म्हणोनि तनमनधनेंसी अनन्य ॥ ब्रह्मानंदस्वामीस शरण ॥ आरंभिली श्रीरामकथा गहन ॥ ग्रंथ संपूर्ण सिद्धी पावो ॥४६॥

ऐसें ऐकतां सप्रेम बोल ॥ बोलिला श्रीगुरू दयाळ ॥ चकोराकारणें उतावेळ ॥ मृगांक जैसा उगवे पैं ॥४७॥

कीं चातकालागीं धांवे जलधर ॥ कीं क्षुधितापुढें क्षीरसागर ॥ कीं कल्पतरू शोधीत आला घर ॥ दरिद्रियाचें साक्षेपें ॥४८॥

तैसा श्रीगुरु दयासागर ॥ तेणें दिधला अभयवर ॥ म्हणे सिद्धि पावेल साचार ॥ रामविजय ग्रंथ हा ॥४९॥

आतां वंदूं संतसज्जन ॥ जे वैराग्यवनीचें पंचानन ॥ कीं ज्ञानांबरींचे चंडकिरण ॥ उदय अस्त नसे जयां ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 10, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP