वैशाख शु. सप्तमी
Vaishakh shuddha Saptami
१) कमल सप्तमी :
या व्रतासाठी कमल आणि सुर्य यांच्या सुवर्णमुर्ती कराव्यात. या दिवशी वेदीवर कमल व कमलावर सुर्य मुर्ती स्थापन करावी. त्यांचे यथाविधी पूजन करावे.'' नमस्ते पद्महस्ताय नमस्ते विश्वधारिणें । दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते ॥ ' अशी सुर्याची मग प्रार्थना करावी. सुर्यास्ताच्यावेळी एक जलपूर्ण घागर , एक गाय व वरील कमलादी ब्राह्मणाला दान द्यावीत व दुसरे दिवशी त्यांस भॊजन घालून मग आपण जेवावे. याप्रमाणे प्रति शु. सप्तमीला एक वर्षभर व्रत करावे, म्हणजे सर्व सुखे प्राप्त होतात.
२) गंगासप्तमी अगर जन्हुसप्तमी :
ही सप्तमी वैशाख शु. सप्तमी दिवशी करतात. या दिवशी गंगामाता पुन्हा प्रकट झाली. या दिवशी गंगेचे पूजन करतात. ब्रह्मपुराणातून ' पृथ्वी चन्द्रोदय ' ग्रंथात असे सांगितले आहे की, राजर्षी जन्हूने प्रथम गंगेला क्रोधाने प्राशन करुन टाकली होती. नंतर सप्तमी दिवशी ती राजाच्या कानातून कन्येच्या रुपाने दिगंबरावस्थेत प्रकट झाली. म्हणून त्यादिवशी अशाच गंगेचे पूजन केले पाहिजे. हरिवंशात पुण्यकव्रतानंतर (शेवटी ) हे व्रत सांगितले आहे. गंगेने हे व्रत पार्वतीला सांगितले आहे, म्हणून आजही पार्वतीच्यासाठी हे व्रत केले जाते. या दिवशी प्रात:काली विधिपूर्वक गंगास्नान करावे. माघ शु. सप्तमी दिवशी दुसर्याही तीर्थात स्नान करता येते. या व्रताने सर्व कामना पूर्ण होतात, म्हणून या व्रताला 'सर्व-कामप्रद' असे म्हणतात. जी स्त्री हे व्रत करते , तिच्या सासर, माहेर व आजोळच्या सात पिढ्यांचा उध्दार होतो. या दिवशी एक सहस्त्र कुंभ दान करावेत , असे आहे. हे व्रत तारण, पारण, सर्वकामप्रद आहे. अन्य पुराणातही या व्रताचा उल्लेख मिळतो. वैशाख शु. सप्तमी दिवशी परमेश्वराची पूजा करवी. गंगेत यथाविधी आंघोळ करुन गंगेत पितृतर्पण करावे. दहा ब्राह्मणांना भोजन घालावे. चांगल्या पुष्पमाला, चंदनाच्या गंधाने व तलम वस्त्रांनी त्यांचे पूजन करावे. याने पूजक सर्व पातकातून मुक्त होतो. हे व्रत मध्यान्हव्यापिनी सप्तमीला करतात. जर दोन दिवश तशी सप्तमी असेल तर ' षष्ठीविद्धा' सप्तमी ' गंगासप्तमी ' मानतात व हे शिष्टसंमत आहे. कारण सप्तमी व्रताच्या निर्णयप्रसंगी ' षष्ठीयुक्त ' सप्तमीच धरावी, असा युग्मवाक्य-निर्णय आहे.
३) निम्बसप्तमी :
वैशाख शु. सप्तमी दिवशी स्नान वगैरे नित्यकर्मे करुन अक्रोध व जितेन्द्रिय राहून निंबाची पाने आणावीत व
निम्बपल्लव भद्रं ते सुभद्रं तेऽस्तु वै सदा। ममापि कुरु भद्रं वै प्राशनाद्रोगहा भव ॥
हा मंत्र म्हणत म्हणत एकेक पान खावे. भूमिशयन करावे व अष्टमीला सुर्यनारायणाचे पूजन करून , ब्राह्मणभोज घालून मग स्वत: भोजन करावे.
४) शर्करासप्तमी :
हे व्रत वै. शु. सप्तमीसच असते. यासाठी शुभ्रतिलमिश्रित पाण्याने स्नान करून शुभ्र वस्त्रे परिधान करावीत. एका चौरंगावर कुंकवाने अष्टदल कमल काढून ' ॐ नम: सवित्रे ' या मंत्राने त्याची पूजा करावी. त्यावर खांडसरीने भरलेला व शुभ्र वस्त्राने आच्छादलेला सुवर्णयुक्त कोरा कलश स्थापन करावा व
विश्वदेवमयो यस्माद्वेदवादीति पठ्यसे । त्वमेवामृतसर्वस्वमत: पाहि सनातन ॥
या मंत्राने यथाविधी पूजन करावे व दुसरे दिवशी ब्राह्मणांना घृतशर्करामिश्रित खिरीचे भोजन घालून तो घट दान करावा. यामुळे आयुष्य , आरोग्य व ऎश्वर्य यांची वृध्दी होते.
N/A
N/A
Last Updated : December 09, 2007
TOP