१ संकष्टी :
श्रीगणपतीच्या व्रतांपैकी हे दर महिन्यास येणारे एक संकटनाशक, महासिद्धिदायक असे व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या वद्य पक्षात जी चतुर्थी असते, त्या चतुर्थीस 'संकष्टी -चतुर्थी ' असे म्हण्तात. या दिवशी दिवसभर उपवास करावयाचा असतो. रात्रौ चंद्रदर्शनानंतर गणपतीची षोडशोपचारे पूजा करावी व त्यानंतर चंद्राची पूजा करुन त्याला व चतुर्थी तिथीला अर्घ्य द्यावे, अशी पद्धत आहे. श्रीगणपती ही विघ्ननाशक देवता असल्याने हा या व्रतप्रभावाने ती प्रसन्न होते आणि सर्व विघ्नांचा नाश होतो, असे महात्म्य आहे. या दिवशी चंद्रदर्शनानंतर चंद्राची पूजा करुन पारणे करावयाचे असते; हे ह्या व्रताचे मुख्य अंग आहे.
या दिवशी संध्याकाळी आंघोळ करुन श्रीगणपतीच्या पूजेची तयारी करून घ्यावी. पुजास्थानी घरातील गणेशमूर्ती असेल तर ती ठेवावी. नसल्यास सुपारी अक्षतापुंजावर ठेवून तिची गणपती म्हणून पूजा करावी. अथर्वशीर्षाची २१ आवर्तने करावीत. पूजा षोडशोपचारांनी पंचामृतअभिषेकासह करावी. आवर्तनाच्या प्रत्येक वेळी
'श्रीविघ्नविनायकदेवताभ्यो नमः ।'
असे म्हणावे. प्रारंभी संकल्प करताना 'अमुक संकटनाशनार्थ ' असे म्हणून त्या संकटाचा उल्लेख करावा.चंद्राला अर्घ्य द्यावा. त्याच्या दिशेने गंध, फूल,अक्षता उडवाव्या व नमस्कार करावा. चतुर्थी तिथीला अर्घ्य ताम्हनात द्यावा व शेवटी महानैवेद्य दखवून पारणे करावे. कथा ऐकावी. यायोगे सर्व संकटाचा नाश होतो, व गणेशकृपा होते, असा अनुभव आहे.
मंगळवारी येणार्‍या चतुर्थीला 'अंगारकी संकष्टी ' म्हणतात. हा एक महान योग आहे. हे संकष्टीचे व्रत यथासांग करणार्‍यास वर्षातील सर्व चतुर्थी केल्याचे पुण्य मिळते. यथाविधी व षोडशोपचारांनी गणपतीचे पूजन केल्यानंतर चंद्रोदय होताच चतुर्थी तिथीस, चंद्रास आणि श्रीगजाननास अर्घ्यप्रदान करावे. गजाननाची करुणा भाकावी. या व्रताच्या प्रभावाने साधकाची सर्व विघ्ने, संकटे दूर होतात. त्यास सर्व ऐहिक सुखे प्राप्त होऊन मंगलमूर्तीचे दर्शन होते, साक्षात्कार होतो, अशी लोकांत श्रद्धा आहे.

N/A

N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP