१ कूर्मद्वादशी :
पौष शु. द्वादशीचे हे नाव आहे. या तिथीस नारायणप्रीत्यर्थ घृताचा कलश कासवाच्या व मंदार पर्वताच्या मूर्तीसह दान द्यावा, असे सांगितले आहे.
२ सुजन्म द्वादशी म्हणजे ब्रह्मद्वादशी :
ज्या पौष शु. ११ ला ज्येष्ठा नक्षत्र असेल त्या दिवशी विष्णूचे पूजन करून तूप दान द्यावे. गोमूत्र घेऊन उपवास करावा आणि पुढील माघादी महिन्यांत ठराविक वस्तूंचे दान आणि भोजन करावे. (उदा. माघ-तांदूळ दान व जलप्राशन, फाल्गुन-जवसदान व घृतभोजन, चैत्र- सुवर्णदान व सुपक्व शाकभोजन, वैशाख- जवसदान व दूर्वाभोजन, ज्येष्ठ - जलदान व दधिभोजन, आषाढ - सुवर्णदान व अन्न-जलदान, श्रावण- छत्रदान, भाद्रपद- तीळ, दूध यांचे दान, आश्विन-अन्नदान, कार्तिक गूळ व काष्ठ यांचे दान, दूधभोजन, मार्गशीर्ष- मलयगिरी चंदन दान करून उपवास व्रत करावे.) म्हणजे कुळात श्रेष्ठता व घरात लक्ष्मी यांची प्राप्ती होते व सर्व इच्छा पूर्ण होतात.