आरोग्यव्रत किंवा आरोग्य द्वितीया :
पौष शु. द्वितीये दिवशी गो-शृंगोदका (गाईची शिंगे धुऊन घेतलेले पाणी )- ने स्नान करावे. श्वेतवस्त्रे परिधान करावीत. सूर्यास्तानंतर बालेंदू म्हणजे द्वितीयेच्या चंद्राची पूजा करावी. जोपर्यंत त्याचा अस्त होत नाही ,तोपर्यंत गूळ, दही, परमान्न (खीर) आणि मीठ यांचे दान द्यावे. ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर केवळ गाईच्या दुधाचे ताक प्राशन करून भूमिशयन करावे. याप्रमाणे प्रत्येक शु. द्वितीयेला एक वर्षपर्यंत चंद्रपूजन व भोजनादी व्रत करावे व बाराव्या (मार्गशीर्ष) ला बालेंदुची यथासांग पूजा करावी आणि घागर भरुन उसाचा रस, सोने व वस्त्र ब्राह्मणाला दान देऊन मग स्वतः जेवावे. यायोगे रोगनिवृत्ती होऊन आरोग्यवृद्धी होते. सर्वप्रकारची सुखे प्राप्त होतात.
(२) याच दिवशी गुरुवार असेल, तर प्रातःस्नान झाल्यावर यथाविधी ब्रह्मदेवाची पूजा करून नक्तव्रत करावे. यायोगे उत्तम संपत्ती प्राप्त होते. यालाच विधिपूजा म्हणतात. हे व्रत ब्रह्मपुराण ग्रंथात सांगितले आहे.