१ अनघा व्रत :
एक तिथिव्रत. मार्ग. व. अष्टमीस गोमयाने पवित्र केलेल्या वेदीवर अनघ व अनघा या नावांनी दोन शहाळी स्थापन करून त्यांची पूजा करावी व पुढे एक वर्षपर्यंत प्रत्येक वद्य अष्टमीस हे व्रत चालवून मग त्याची सांगता करावी, असे हेमांद्रीने सांगितले आहे.
फल-पापनाश
२ अष्टका-श्राद्ध :
मार्गशीर्ष व. अपराह् न-व्यापिनी अष्टमीच्या दिवशी शास्त्रोक्त विधीने अष्टका-श्राद्ध करावे. ब्राह्मणभोजन घालून त्यांचा तोषवावे, त्यामुळे उत्तम फल मिळते, आणि न केल्यास दोष लागतो.
३ रुक्मिणी अष्टमी :
मार्ग. व. अष्टमीच्या दिवशी कृष्ण, रुक्मिणी व प्रद्युम्न यांच्या सुवर्णाच्या मूर्ती करून त्यांचे सुगंधी जलाने आणि गंधादीने पूजन करावे. नैवेद्याला उत्तम पदार्थ अर्पण करावेत आणि सामर्थ्य असल्यास आठ सुवासिनीना चांगली वस्त्रे देऊन दक्षिणा द्यावी. यामुळे रुक्मिणीची प्रसन्नता मिळते.