* पिठोरी अमावास्या
एक काम्य व्रत. श्रावण अमावास्येला पिठोरी अमावास्या म्हणतात. ज्यांची मुले जगत नाहीत, अशा स्त्रिया पिठोरीचे व्रत करतात. हे व्रत पूजाप्रधान असून, चौसष्ट योगिनी या त्याच्या देवता आहेत. या व्रताचे विधान असे -
श्रावण अमावास्येच्या दिवशी दिवसभर उपोषण करावे. सायंकाळी स्नान करून सर्वतोभद्र मंडलावर आठ कलश स्थापावे. त्यावर पूर्णपात्रे ठेवून त्यांत ब्राह्मी, माहेश्वरी, इ. शक्तींच्या मूर्ती स्थापाव्या. तांदुळाच्या राशीवर चौसष्ट सुपार्या मांडून त्यावर चौसष्ट योगिनीचे आवाहन करावे. त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. नंतर व्रतासाठी केलेले पक्वान्न डोक्यावर घेऊन 'कोणी अतिथी आहे काय? असा प्रश्न विचारावा. मुलांनी 'मी आहे' असे म्हणून ते पक्वान्न मागच्या बाजूने काढून घ्यावे.
पूर्वी पूजेच्या मूर्ती पिठाच्या करीत. अलिकडे त्यांची छापील चित्रे मिळतात. या व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करतात. त्यावरून या तिथीला पिठोरी अमावास्या असे नाव पडले असावे.
* कुशग्रहणी
हे व्रत श्रावण अमावस्येदिवशी सकाळी करतात. शास्त्रानुसार
'कुशा: काशा यव दूर्वा उशीराश्च सकुंदका: ।
गोधूमा ब्राह्मयो मौजा दशदर्भा सबल्बजा" ।'
असे दहा प्रकारचे कुश ( दर्भ ) सांगितले आहेत. यांतील जे मिळतील ते घ्यावेत. ज्या दर्भाचे मूळ तीक्ष्ण असेल, त्याला सात पाने असतील, शेंडा तोडला गेलेला नसेल व हिरवा असेल, तो देव व पितृ दोन्ही कार्यात चालतो. यासाठी दर्भ असलेल्या ठिकाणी जाऊन अमावस्येदिवशी पूर्व वा उत्तराभिमुख बसून
'विरंचिनासहोत्पन्न परमेष्ठिन्निसर्गज ।
नुद सर्वाणि पापानि दर्भ स्वस्तिकरो भव । हुं फट्'
हा मंत्र उच्चारून कुशदर्भाला उजव्या हाताने उपटावे व हवेतेवढे आणावेत.
* सतीपूजन
याच दिवशी सतीचे पूजनही करतात. सर्व सौभाग्यवायने, आभूषणे एकत्र करून त्याला सात प्रदक्षिणा करतात. यात घरच्या मुलींनी भाग घ्यायचा नसतो.
* दर्शश्राद्ध
दर्शाच्या दिवशी केले जाणारे श्राद्ध पितृत्रयी, मातृत्रयी व मातामहत्रयी यांना उद्देशून करतात. हे श्राद्ध नेहमीच्या श्राद्धासारखेच असते.