ज्येष्ठ पौर्णिमा

Jyeshtha  Purnima


१ एरुवाक पौर्णिमा :

ज्येष्ठ पौर्णिमा . आंध्रमधल्या शेतकर्‍यांचा एक विशेष सण. शेतात नांगर धरण्याचा हा दिवस असतो. या दिवशी शेतकरी आपले बैल व आउते यांना धुऊन काढतात. बैलांच्या अंगावर नवे कपडे व दागिने घालतात. त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवतात. मग गावातले सर्व शेतकरी मिळून गावभर त्यांची मिरवणूक काढतात. मग बैलांसह आपल्या शेतात जाऊन नांगरणीचा मुहूर्त करतात आणि एवढे झाल्यावर घरी परततात.

महाराष्ट्रातील शेतकरी बैलपोळा म्हणून हा सण साजरा करतात. त्या दिवशी बैलांना कामास जुंपत नाहीत. नदी, तळे, विहीर अगर घरात सोय असेल त्याप्रमाणे बैल धुऊन काढतात. अंगावर नवी वस्त्रे, दागिने घालतात. नैवेद्य दाखवून ज्वारी, बाजरी वगैरेंचा खिचडा खावयास घालतात. बैलांच्या मिरवणुकी गावातून वाजतगाजत काढतात. हा सण महाराष्ट्रात निरनिराळ्या भागात मासभेदाने असतो.

गावातील पाटील, कुलकर्णी (तलाठी) यांच्यासमोर गावच्या वेशीत तोरण बांधून चांगले दोन बैल, त्यांपैकी एक तांबडा व एक पांढरा पळवत आणतात. त्यांपैकी ज्या रंगाचा बैल शिंगाने तोरण तोडील , त्या रंगाचे धान्य त्या वर्षी अधिक पिकेल, असा अंदाज बांधतात.

या दिवशी घराबाहेर मातीच्या बैलाची पुजा करतात. हा सण कर्नाटकात या अगोदर एक महिना करतात.

२ बिल्वत्रिरात्रिव्रत :

ज्येष्ठ शु. पौर्णिमा ज्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्र व मंगळ्वार असेल, त्या दिवशी तिलमिश्रित पाण्याने स्नान करुन बेलाच्या झाडाची गंधादी पदार्थांनी पूजा करावी व एकवेळ हविष्यान्नाचे भोजन करावे. जर त्या वेळी कुत्रा, डुक्कर अगर गाढव दृष्टीस पडले तर जेवणाचा त्याग करावा.याप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेला करुन वर्षअखेर समाप्तीच्या दिवशी बेलाच्या झाडाजवळ जाऊन एका भांड्यात १ शेर वाळू वा जव, गहू, तांदूळ व तेल भरावे, त्याचप्रमाणे आणखी एक भांडे वस्त्राने झाकून त्यावर उमा-महेश्‍वराची मूर्ती स्थापन करावी. त्यास दोन तांबडी वस्त्रे वाहावीत आणि नानापरिमल गंध, फुले, धूप, दीप, नैवेद्य वगैरेंने पूजा करावी व प्रार्थना करून बेलपानांच्या एक हजार आहुती द्याव्यात आणि यथाशक्ती सोळा अगर आठ दांपत्यांना वस्त्रालंकार देऊन जेवण घालावे. यायोगे सर्वप्रकारची अभिष्टसिद्धी प्राप्त होते.

३ महाज्येष्ठी :

ज्येष्ठ पौर्णिमेला ज्येष्ठानक्षत्र असेल, चंद्र व गुरु यांची युती असेल आणि सूर्य रोहिणी नक्षत्रात असेल , तर तिला महाज्येष्ठी असे म्हणतात. या दिवशी जप, दान इ.केल्याने महाफळ प्राप्त होते.

४ वटसावित्री अथवा जलयात्रा :

ज्येष्ठ पौर्णिमेला काही ठिकाणी भगवंताच्या मूर्तीला सरोवरात स्नान घालतात आणि फुलांच्या देवालयात स्थापन करून पूजा करतात. गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवून ब्राह्मणभोजन घालतात. काही ठिकाणी वरुणदेवतेला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत करतात. त्याची पूजा करतात.

५ वटसावित्रीव्रत :

सुवासिनी स्त्रियांनी सौभाग्यवृद्धीसाठी करावयाचे एक व्रत. हे ज्येष्ठ पौर्णिमेला करतात. ज्येष्ठ शु. त्रयोदशीपासून पौर्णिमेस हे त्रिरात्रव्रत करावे, असे सांगितले आहे. तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल, त्यांनी फक्त पौर्णिमेच्या दिवशी उपवास करावा. सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून, सत्यवान सावित्री, नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत. या व्रताचा विधी असा :-

नदीकाठी वाळू आणून पात्रात भरावी. तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाव्या. मग त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. त्यानंतर अर्घ्य द्यावे. मग पुढील मंत्राने सावित्रीची प्रार्थना करावी.-

सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणि ।

तेन सत्येन मां पाहि दुःखसंसारसागरात् ।

अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते ।

अवियोगस्तथाऽस्माकं भूयाज्जन्मनि जन्मनि ॥

पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनींसह सावित्रीची कथा श्रवण करावी.

या व्रतात सावित्रीच्या मूर्तीची पूजा सांगितलेली असली तरी रुढी मात्र वेगळी आहे. सावित्रीचा पती सत्यवान वडाच्या झाडाखाली गतप्राण झाला आणि पुन्हा तिथेच सजीव झाला, या संकेताला अनुसरुन स्त्रिया या दिवशी वडाचीच पूजा करतात. त्यासाठी त्या वटवृक्ष असेल त्या ठिकाणी जाऊन वडाच्या मुळाशी पाणी घालतात आणि त्याला प्रदक्षिणा घालून सुताचे वेष्टण करतात; नंतर त्याच्या मुळाशी असलेल्या सावित्री-ब्रह्मदेव ; सत्यवान-सावित्री, धर्मराज व नारद यांच्या प्रतिमांचे पूजन करतात व प्रार्थना करतात.

वड जवळपास नसेल, तर वडाची फांदी कुंडीत रोवून किंवा वटसावित्रीचे चित्र भिंतीवर चिकटवून त्याची पूजा करण्याचीही प्रथा आहे. पूजेनंतर सुवासिनींना सौभाग्यवायने देतात.

व्रताचे उद्यापन करताना ज्येष्ठ शु. द्वादशीला अल्पाहार करतात. त्रयोदशीच्या दिवशी व्रताचा संकल्प करतात. वटवृक्षाच्या मुळाशी किंवा घरी चंदनाने काढलेल्या वटवृक्षाच्या मुळाशी सर्वत्रोभद्र मंडलावर कलश मांडतात आणि त्याच्यावर सात धान्यांनी भरलेले वेळूचे शिप्तर ठेवतात. त्याच्या जवळच चांदीचा वटवृक्ष, लाकडांचा भारा, कुर्‍हाड , व चांदीचा रथ मांडतात. रथात चांदीचा पलंग मांडून त्याच्यावर ब्रह्मा, सावित्री, सत्यवान, त्याची पत्नी सावित्री, यमधर्म आणि नारद यांच्या सुवर्णाच्या प्रतिमा ठेवतात. सुवर्णाच्या प्रतिमा शक्य नसल्यास मातीच्या प्रतिमा ठेवतात व त्याची पूजा करतात. रात्री सावित्रीचे चरित्रकथन, नृत्य, गीते इ. कार्यक्रम करतात. चवथ्या दिवशी आचार्यद्वारा हवन व यथाशक्ती चोवीस, सोळा, बारा किंवा आठ दांपत्यांची पूजा करतात. गोदान, शय्यादान व प्रतिमादान देऊन आणि ब्राह्मणभोजन घालून व्रताची समाप्ती करतात.

भारतखंडात अनेक पतिव्रता प्रसिद्ध आहेत; पण त्यांत सावित्री हीच आदर्श मानलेली आहे. एखाद्या सुवासिनीने दुसर्‍या स्त्रीला नमस्कार केला असता, ती 'जन्मसावित्री हो' असाच आशीर्वाद तिला देते. सावित्री हे भारतीय संस्कृतीत अखंड सौभाग्याचे प्रतीक ठरले आहे.

बंगालमध्ये वटसावित्रीव्रत करण्याची रीत थोडी वेगळी आहे. बंगाली सुवासिनी या दिवशी आपल्या पतीची पूजा करतात. त्या प्रसंगी पतीच्या अंगाला सुगंधी तेल व चंदनाची उटी लावतात, त्याच्या गळ्यात फुलांचा हार गालतात आणि त्याला नवीन वस्त्र देतात. याव्यतिरिक्त , त्या यमाचीही पूजा करतात. आणि त्याला फुले, फळे व वडाची डहाळी अर्पण करतात.

N/A

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP