१ त्रिमूर्तिव्रत :
एक तिथिव्रत . ज्येष्ठ शु. तृतीयेला याचा प्रारंभ करतात वायू, सूर्य व चंद्र या रुपांत श्रीविष्णूची पूजा करणे, हा या व्रताचा विधी आहे. व्रतावधी तीन वर्षे. फल-दीर्घायुरारोग्य व सुख यांची प्राप्ती.
२ पार्वतीपूजा :
ज्येष्ठ शु. तृतीये दिवशी पार्वतीचा जन्म झाला. म्हणून स्त्रियांनी त्या दिवशी आपले सुख, सौभाग्य आदी वृद्धीसाठी तिची पूजा करावी. यथाविधी पंचोपचार पूजा करुन गायन, वादन आणि नृत्य करुन तिचा जन्मोत्सव साजरा करावा.
३ रंभाव्रत :
या व्रतासाठी ज्येष्ठ शु. तृतीया पूर्वाविद्धा प्रशस्त मानली आहे. त्या दिवशी सकाळी स्नानादी नित्यकर्मे आटोपून पुर्वाभिमुख बसावे. आपल्या पाठीमागे गार्हपत्य, दक्षिणाग्नी, सभ्य, आहवनीय व भास्कर या पाचही अग्नींना प्रज्वलित करावे. त्यामध्ये बसून आपल्यापुढे पद्मासनावर बसलेली , सर्वप्रकारच्या आभूषणांनी युक्त जटाजूट व मृगचर्म धारण करणारी देवीची चतुर्भुज मूर्ती स्थापन करावी. नंतर ॐ महकाल्ये नमः , महालक्ष्म्यै नमः महासरस्वत्यै नमः ' आदी नाममंत्राने महानिशा, महामाया, महादेवी , महिषनाशिनी, गंगा, यमुना, सिंधू, शतद्रू, नर्मदा आणि वैतरणीसह सर्वाची पूजा करावी. याच नावाच्या 'नमः' च्या जागी 'स्वाहा' उच्चारून १०८ आहुती द्याव्यात. मग नाना परिमलयुक्त फुले, फळे, नैवेद्य अर्पण करावा.
त्वं शक्तिस्तवं स्वधा स्वाहा त्वं सावित्री सरस्वति ।
पतिं देहि गृहं देहि सुतान् देहि नमोस्तुऽ ते ॥ '
या मंत्राने प्रार्थना करावी. व्रत करणार्या स्त्रीला सुख, समृद्धी, पुत्रादि मनोरथ पूर्ण होतात. आईच्या सांगण्यावरुन हे व्रत पार्वतीने केले होते.