|
स्त्री. १ ज्या ठिकाणी विद्वान , पंडित , गुणीजन , राजे लोक वगैरे जमतात , बसतात अशी जागा ; दरबार ; मंत्रगृह ; राजसभा , ब्रह्मसभा . सभे शिशुपाळ घेतला प्राणें । - मुसभा १२ . १४४ . २ संमाज ; मंडळी ; जमाव ; समुदाय ; बैठक ; आखाडा ; मेळा . ३ सभेसंबंधी गाणें . तेचि सभा गातों सभेमधि तेचि सभा गातो - पला २० . ४० . ४ शाळा ; धर्मशाळा ; दालन . एका सभेंत रात्रौ निजला ... । - मोवन ४ . १११ . सभा जिंकणें - वादविवादांत यश मिळविणें ; फड मारून नेणें ; आपलें म्हणणें खरे करणें . सभाकंप - पु . सभेमध्ये भरणारें कांपरें ; लाजाळूपणा ; संकोच . २ मन अपराधी असल्यामुळे वाटणारी भीती व त्यामुळे होणारा थरकांप गोंधळ . सभांगण - न . १ सभेची जागा . २ रंगण ; चौक ; मोकळी जागा सजूनि वर वल्लभी तव सभांगणी नाचतो - केका ११४ . सभांगना - स्त्री . वारांगना ; कलावंतीण ; नायकीण . तक्तराव जिलेवंत नाचती सभांगना आनंदांत - ऐपो ११९ . सभागृह - न . कचेरी ; दिवाणखाना ; सभेची जागा ; दरबारची जागा . सभाचातुर्य , सभाकौशल्य , सभापाटव - न . शिष्टाचार ; सभ्यता ; रीतरिवाज ; चार मंडळीत वागण्याची योग्य पद्धति व त्यांत दिसून येणारी चांगली बुद्धि . सभाजन - पु . १ सभेतील सदस्य ; मंडळी ; समाज ; लोकसमुदाय . २ सभासद ; सभेत बसणारा गृहस्थ . सभादिप , सभादीपक , सभादिवा - वि . १ श्रावणीच्या दिवशी ब्राह्मणास अग्निसमक्ष सुवासिनी दान करतात तो दिवा . २ सभादिप दान करण्याचा विधि . ३ ( ल . ) सभाभूषण ; सभेचा अलंकार . सभाधिकारी - पु . सभेचा नेता ; अध्यक्ष . सभाधीट - वि . सभेमध्यें न भितां , न गोंधळतां भाषण करणारा . सभाधूर्त - वि . सभेमध्यें , दरबारांत वाद , मसलत , मध्यस्थी वगैरे कामांत प्रवीण , वाकबगार , हुशार ; सभाकुशल - चतुर - पटु हे पर्याय शब्द आहेत . ०धैर्य न. सभेतील धीटपणा ; आत्मविश्वास ; धिटाई . ०धौर्त्य न. सभेंतील धूर्तता , चातुर्य , कौशल्य . सभाध्यक्ष , सभानायक , सभापति - पु . सभेचा प्रमुख , मुख्य , नेता , पुढारी , अध्यक्ष , मुखार , उपदृष्टा . ०नियम पु. सभेसंबंधी कायदा , निर्बंध , काम चालविण्याविषयी पद्धति . ०नीति स्त्री. सभेंसंबंधी नियम ; निर्बंध ; कायदा , पद्धति . ०पाण्डित्य न. तादृश अंगी विद्यादि असोनसो पण सभादिकांमध्यें भाषणादि करण्याचें सामर्थ्य . केवळ सभेमध्यें ज्ञानाचे प्रदर्शन ; वरकरणी दाखविण्याची विद्धता . ०प्रवेश पु. १ सभेच्या कामास आरंभ , सुरुवात . २ सभासदाचा सभेमध्यें येण्याचा पहिला प्रसंग ; नवीन सभासदास सभेंत दाखल करून घेणें . ०भीत वि. सभेमध्यें लाजणारा ; संकोच वाटणारा ; धीटपणा नसणारा . ०भीति स्त्री. समाजाची , मंडळाची भीति , भीड , लाज , संकोच ; सभेमध्यें घाबरण्याची संवय . भीरू - वि . सभेमध्यें लाजणारा ; संकोची . ०भूषण न. सभेचा अलंकार ; पंडित , विद्वान मनुष्य ; सभेला शोभा आणणारा विद्वान . ०मंडप पु. १ सभास्थान ; सभेची जागा ; मंत्रगृह ; दिवाणखाना . २ मंदिराच्या गाभार्यापुढे कीर्तन - पुराणादिकांकरितां बांधलेली आच्छादित जागा . ३ गाभार्यापुढील मोकळी जागा . ०मोहन न. नजरबंदी ; सभेस चकविण्याची , भुलविण्याची विद्या . सभा मोहन भुररी चेटकें । साबरी मंत्र कौटलें अनेकें । - दा ५ . २ . २ . ०रंजन न. सभेची करमणूक ; मंडळीचें मनोरंजन ०रत्न न. सभाभूषण ; सभेचा अलंकार . ०लंकार पु. सभारत्न . ०व्यवस्थापक वि. सभेची व्यवस्था ठेवणारा ; शिस्त राखणारा ; सभा व्यवस्थितपणें चालविणारा . ०व्यवस्थापन न. सभेची व्यवस्था , व्यवस्थित मांडणी , व्यवस्थित कार्य , शिस्त , देखरेख . ०शूर वि. सभेंत किंवा मंडळीत धीट ; आत्मविश्वासी ; सभेमध्ये पराक्रम गाजविणारा . ०संकेत पु. सभेचे नियम , पद्धति ; रूढि . सभासद - पु . १ सदस्य ; सभेचा प्रत्येक घटक ; सभामध्यें बसलेला प्रत्येक इसम . २ ( ल . ) लोकांच्या फिर्यादी दाखल करून घेणारा कचेरीतींल कामगार . ३ सभास्थान ; सभामंडप ; सभामंडळ ; बैठक . तूं या विश्वाची अनादि आदी । बैससी जिये सभासदी । तेथे सोयरिकीचिया संबंधी । रळी बोलों । - ज्ञा ११ . ५४४ . ४ पंच ; न्यायदानाच्या कामी मदत करणारा अधिकारी . सभासद भलेलोकी सांगितलें की - भाइसमं २ . ६३ . ०स्थान न. सभेची जागा ; सभागृह , मंढप , ०स्फूर्ति स्त्री. सभेमध्यें प्रसंगावधान ; सभेंमध्यें भाषण करतांना येणारें अवसान , स्फुरण . ०क्षोभ पु. सभेमध्यें गांगरून जाणें ; सभेमध्यें घाबरणें , घोटाळणें . किंवा सभाभोक्ष तयास झाला । - सारुह ६ . ९५ . सभोचित - वि . सभेमध्यें करावयास , मंडळीत करण्य़ास योग्य ; बैठकीत करण्यासारखे . सभ्य - पु . १ सभासद ; प्रेक्षक . सभेतील योग्य मनुष्य . तै गुणदोष सायिखेडें । सभ्युं जैसा । - ज्ञा १४ . ३४३ . भरत कुल धर्म न बुडो सभ्याला पूस एकदा जागा । - मोसभा ४ . १०३ . न वदति सभ्य न पांडव । मोसभा ५ . ५८ . २ पंचाग्निपैकी एका अग्नीचे नांव . - वि . संभावित ; प्रतिष्ठीत ; शिष्ट ; सज्जन .
|