|
पु. ( संगीत ) गायनशास्त्रातील एक राग . ह्या रागांत षड्ज , तीव्र ऋषभ , तीव्र गांधार , कोमल मध्यम , पंचम , तीव्र धैवत , निषाद हे स्वर लागतात . अवरोहांत गांधार धैवत वर्ज्य . जाति संपूर्ण औडुव . वादी मध्यम व संवादी षड्ज हे स्वर आहेत . हा रात्रीच्या दुसर्या प्रहरी गातात . पु. एक जात व तींतील व्यक्ति ; डोंबारी ; कोल्हाटी ; बहुरुपी ; नट हा स्त्रिया इ०कांचा वेष धारण करुन नाचतो , दोरीवर चालणे , उड्या मारणे इ० अनेक प्रकारचे खेळ करुन उपजीविका करतो . नाच्या पोर्या ; सोंगाड्या . - ज्ञा १४ . २९० . कृष्णा दारोदारी नटसा कां मी सुयोध नाचेन ? मोभीष्म १ . १०३ . २ ( नाट्य ) नाटकांत स्त्री - पुरुष भूमिकेचे काम करणारा मनुष्य . ४ उनाड ; व्रात्य ; कपटी , हरामी मनुष्य . ठस ठोंबस खटनट । जगभांड विकारी । - दा २ . ३ . ३२ . ५ चेष्टा ; हावभ व . वदंता रद्दीप्तिस दावि नटे । - अकक २ . किंकरकृत शुकरंभा संवाद २० . ६ वेष ; अवतार ; रुप ; सोंग . धरोनिया रुद्राचा नट । नंदीवरी जाहला उपविष्ट । - कथा २ . १२ . २४ . [ सं . नट ; सिं . नटु ] नटामाजी नेटका जाया - ( सुंदर अशा पुरुषनटाने सुंदर स्त्रीचा वेष धारण केला असतां तो जसा कृत्रिम असतो व त्या भूमिकेतील तशी सुंदर स्त्री जशी दुर्लभ असते त्यावरुन ) दिसण्यांत अतिशय सुंदर पण बनावट व दुर्लभ अशी वस्तु . ( तुल० ) की नटामाजील कामिनी ! की तममयकुहूची यामिनी । की अजाकंठिचे स्तन दोन्ही । तैसे प्राणी व्यर्थ ते । - ह १६ . ३२ . सामाशब्द - ०बिलावल पु. ( संगीत ) एक राग . ह्यांत षड्ज , तीव्र ऋषभ , तीव्र गांधार , कोमल मध्यम , पंचम , तीव्र धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . जाति संपूर्ण - संपूर्ण . वादी मध्यम . संवादी षड्ज . गानसमय दिवसाचा पहिला प्रहर होय . ०खट वि. लुच्चा ; सोदा ; हरामी . [ नट + खट ; हिं . नटखट ] ०मल्लार पु. ( संगीत ) एक राग . ह्यांत षड्ज , तीव्र ऋषभ , कोमल गांधार , कोमल मध्यम , पंचम , तीव्र धैवत व कोमल निषाद हे स्वर लागतात . जाति संपूर्ण - संपूर्ण . वादी मध्यम , संवादी षड्ज . हा रात्रीच्या दुसर्या प्रहरांत गातात . ०धारी वि. नाटकी . पाहून लुब्धलो तुसी आतां किती दिवस चाळवसी नटधारी । - होला ८९ . [ नट + धारी = धारण करणारा ] ०नर्तक पुअव . ( व्यापक ) नट , डोंबारी , कोल्हाटी , नाचणारे , सोंगाडे इ० समुच्चयाने . [ नट + सं . नर्तक = नाचणारा ] ०नागर वि. नटून , सजून गांवभर हिंडणारा . - शर . [ नट + ] ०नाच पु. १ उल्लास ; उत्कर्ष ; प्रताप ; आधिक्य . हे असो या चिन्हांचा । नटनाचु ठायी जयाच्या । जाण ज्ञान तयाच्या । हातां चढे । - ज्ञा १३ . २१५ . २ हावभाव ; अभिनय ; अंगविक्षेप . माते गाती वानिती । नटनाचे रिझविती । - ज्ञा १६ . ३६१ . [ नट + नाच ] ०नाटक नाटकी - पु . १ नाना प्रकारचे चमत्कारिक खेळ करुन दाखविणारा परमेश्वर , श्रीकृष्ण इ० देवता . २ नाटकी ; सोंगाड्या माणूस . नटनाटक ठक बालट हरि तू ठाऊक मज मी न नवी । - रासक्रीडा १३ . ०नाट्य न. १ नाटक इ० खेळ ; सोंगे . नटनाट्य केले तुम्ही याचसाठी । कौतुके दृष्टि निववावी । - तुगा . २ बतावणी ; सोंग . तरी कां वंचतकु सुमनासि वो । नट नाट्य बरे संपादू जाणसी वो । - तुगा १४२ . ०बाज वि. १ दिमाखाने , ताठ्याने , नटून चालणारा ; अक्कडबाज ; नखरेबाज ; नटवा . २ दांडगा व धसकट ( मनुष्य ). [ नट + बाजिंदा ] ०बाजी स्त्री. १ दिमाखदारी ; अक्कडबाजी . २ नटवेपणा ; नखरेबाजी ; नखरा . [ नट + बाज ] ०बाट वि. लुच्चा ; सोदा ; हरामी . [ नट + बाट = लुच्चा ] ०मोगरा पु. नटणारा मनुष्य . नटणारे छानछोकी नटमोगरे फारच बोकाळले आहेत . - इपं १५५ . [ नट + मोगरा ] ०राज पु. १ तांडवनृत्य करीत असणारा शंकर , त्याची मूर्ति ; नटेश . २ अर्धनारी नटेश्वर , उजवे अंग पुरुषाचे व डावे स्त्रीचे असे स्वरुप . ०वर पु. ( गु . ) नटांत श्रेष्ठ ; कृष्ण ; शंकर ; परमेश्वर . नटनाटकी पहा . [ नट + सं . वर = श्रेष्ठ ] नटाई स्त्री . लुच्चेगिरी ; सोदेगिरी ; कपट . ( क्रि० करणे ) नटाईस नटाईवर येणे लबाडी , लुच्चेगिरी करणे . नटेश , नटेश्वर पु . १ परमेश्वर ; नटवर . २ नटराज पहा . [ नट + सं . वर = श्रेष्ठ ] नटोवा पु . ( महानु . ) नट ; नटवा पहा . आंगीचीआं रवरवां । ढळतां कैस सांगावा । जैसा रणरंगिचा नटोवा सरांऊ करितुसे । - शिशु १००४ . [ नटवा ]
|