|
न. १ प्रत्येक वस्तुजातांत असलेल्या तीन गुण किंवा धर्म यांपैकीं ( सत्त्व , रज , तम ) पहिला . हा सर्व सद्गुणांचा द्योतक आहे . सत्त्वाथिलियां आंतु । सत्त्व मी म्हणे अनंतु । - ज्ञा १० . २८७ . २ अस्तित्व ; स्थिति ; भाव ; अर्थत्व . ३ पदार्थ ; वस्तु ; द्रव्य ( ज्याविषयीं कांहीं गुणधर्मांचें विधान करतां येईल असें द्रव्य , वस्तु ). ४ कस ; सार ; अर्क ; सारभूत अंश ; तत्त्वांश . नराच्या ठायीं नरत्व । जें अहंभाविये सत्त्व । - ज्ञा ७ . ३५ . गुळवेलीचें सत्त्व . ५ बल ; तेज ; अभिमान ; शक्ति ; तत्त्व ; जीवंतपणा ; पाणी . दिसतें सत्त्व असें कीं पडतां न चळेल हेमनगहि वर । - मोवन ४ . २६० . ६ स्वभाव ; स्वभाविक गुणधर्म . सत्त्व टाकिती भाग्यवंत सकळ । चोर पुष्कळ सूटले । - ह २९ . ३२ . ७ खरेपणा ; सद्गुण ; थोरपणा . आलिया अतितां म्हणतसां पुढें । आपुलें रोकडें सत्त्व जाया । - तुगा १२४८ . याचें स्थिर असो सदा सत्त्व । - मोसभा ६ . ४२ . [ सं . अस् ] सत्त्व घेणें , सत्त्व पाहणें - कसून परीक्षा घेणें ; प्रचीति घेणें ; एखाद्याचा बाणा किंवा अभिमान किती टिकतो याची परीक्षा पाहणें . सत्त्व सोडणें - बल , कस , जोर , भरीवपणा , स्वाभाविक गुणधर्म नाहींसे होणें ( जमीन , औषध , मंत्र , देव , मूर्ति वगैरे संबंधीं योजतात ). सत्त्वास जागणें - सत्त्व राखणें ; अडचणीच्या प्रसंगींहि आपला मूळ स्वभाव , सद्गुण , अभिमान , नीतिधैर्य , वर्तन यांपासून न ढळणें . सत्परिचयेंच जडही समयीं सत्त्वास जागलें हो तें । - मो . ०गुण वि. सत्त्वगुण ज्यांत विशेष आहे असा . ०धीर वि. सत्य , इमान , औदार्य , पातिव्रत्य इत्यादि सद्गुण ; धैर्यशील ; दृढनिश्चयी . ०निष्ठ वि. सत्त्व न सोडणारा ; सद्गुणी ; सचोटीचा ; प्रमाणिक वगैरे . ०पर वि. सत्त्वास जागणारे . जे जे असा सत्त्वपर । - उषा ६२ . ०मूर्ति स्त्री. सत्त्वशील ; सत्त्वैष्ठ , सद्गुणी ; प्रामाणिक असा मनुष्य . ०रक्षण न. सद्गुण , सत्य , मान , इत्यादि गुणांचें परिपालन ; अडचणींतहि सत्त्व न सोडणें . ०वान वंत - वि . सत्त्वगुणी ; बल , धैर्य , कस , सार , तत्त्व असलेला . ०शील सीळ - वि . १ सद्गुणी ; प्रामाणिक ; नीतिनियमानें वागणारा , सत्प्रवृत्त . पवित्र आणि सत्त्वसीळ । - दा १ . ८ . १९ . २ ज्यांतील कस , किंवा गुणधर्म दीर्घ कालपर्यंत टिकतात असा ( पदार्थ , वस्तु ). ०शुध्द वि. शुध्द केलेलें ; आंतील निकस भाग काढून सतेज केलेलें ( औषध वगैरे ). ०शुध्दि शोधन - स्त्रीन . औषधी , अथवा वनस्पती वगैरेंची विशुध्दि , स्वच्छ करणें ; निकस भाग काढून टाकून सतेज करणें . तैसी ते सत्त्वशुध्दि । आगळी ज्ञानेंसी वृध्दि । - ज्ञा १४ . २२२ . २ अंतःकरणशुध्दि . आतां सत्त्वशुध्दि म्हणिजे । ते ऐशा चिन्हीं जाणिजे । तरी जळे ना विझे । राखोडीं जैसी । - ज्ञा १६ . ७४ . ०संपन्न वि. सद्गुणी ; सद्वर्तनी बलयुक्त ; सत्त्वांशानें परिपूर्ण . ०स्थ वि. १ सद्गुणी ; नीतिमान् ; सदाचारसंपन्न . २ पथ्यकर ; पुष्टिकारक ; हितकर ; शक्तिवर्धक ( अन्न , पदार्थ वगैरे ) ०हरण न. ( शब्दश ; व ल . ) सद्गुण , उत्कृष्टपणा , शील , कीर्ति , मान वगैरेची नागवणूक , हिरावून घेणें ; त्याचा त्याग करणें ; सदाचाराविषयीं लौकिकाची हानि . ०हानि स्त्री. ( शब्दः व ल . ) सद्गुण , सत्यनिष्ठा , निष्कर्ष , सार वगैरेचा नाश . ०हीन वि. निकृष्ट ; निकस ; गुण , तेज , बल रहित ; निःसत्त्व ; तेजोहीन ; तत्त्वभ्रष्ट . सत्त्वहीन मी बहुतापरी । बुध्दि अघोर असे , माझी । ०क्षमु क्षेमु - वि . सत्त्वगुणसंपन्न . देहीं सत्त्वक्षेमु । आरु जैसा । - भाए ३३५ . सत्त्वागळा - वि . सात्त्विक ; सत्त्वधीर सत्त्वागळी । - दा १ . ८ . २२ . सत्त्वाथिला - वि . सत्त्वस्थ ; सद्गुणी ; सत्त्वगुणयुक्त ; सात्त्विक . सत्त्वाथिला शिबिनृपाळा । - आशिबि ६६ . ४ . त्यागुणें विष्णुभक्त सत्त्वाथिला - ह ३४ . १० . सत्त्वान्न - न . पथ्यकर व पौष्टिक खाद्य . सत्त्वापत्ति - स्त्री . ज्ञानी जीवाच्या सप्तभूमिकांतील चौथी भूमिका . - हंको . सत्त्वाशुंठी - स्त्री . १ निरनिराळीं औषधी द्रव्यें घेऊन तयार केलेली एक प्रकारची सुंठ . २ आंतील सर्व कस कायम राहील अशा प्रकारें आल्याची बनविलेली सुंठ . ३ ज्यास नेहमीं औषधें द्यावीं लागतात असें रोगट मूल ( विशेषणाप्रमाणें उपयोग ). सत्वाश्रित - वि . सद्गुणी व सचोटीचा ; प्रामाणिक ; विश्वासु ; नीतिमान ; शुध्द वर्तनाचा . सत्त्वाची चांगुणा - स्त्री . साध्वी , सद्गुणी स्त्री . [ श्रियाळस्त्री चांगुणा या विशेषनामावरून ] सत्त्वाची सावित्री - स्त्री . पतिव्रता व सद्गुणी स्त्री . [ सावित्री या प्रसिध्द पतिव्रता स्त्रीवरून ]
|