मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
४७७१ ते ४७८०

बोधपर अभंग - ४७७१ ते ४७८०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥४७७१॥
प्रारब्धा हातीं जन । सुख सीण पावतसे ॥१॥
करितां घायाळाचा संग । अगें अंग माखावें ॥२॥
आविसा अंगें पीडा वसे । त्यागें असे बहु सुख ॥३॥
तुका म्हणे जीव भ्याला । अवघ्या आला बाहेरी ॥४॥

॥४७७२॥
आशा ते करविते बुद्धिचा लोप । संदेह तें पाप कैसें नव्हे ॥१॥
आपला आपण करावा विचार । प्रसन्न तें सार मन खाही ॥२॥
नांवें रुपें अंगी लाविला विटाळ । होतें त्या निर्मख शुद्ध बुद्ध ॥३॥
अंधळ्यानें नये देखण्याची चाली । चालों ऐसी बोली तुका बोले ॥४॥

॥४७७३॥ आशा तृष्णा माया अपमानाचें बीज । नासिलिया पूज्य होईजेतें ॥१॥
अधीरासी नाहीं चालों जातां मान । दुर्लभ दर्शन धीर त्याचें ॥२॥
तुका म्हणे नाहीं आणिकांसी बोल । वांयां जाय मोल बुद्धीपाशी ॥३॥

॥४७७४॥
कृपेचें उत्तर देवाचा प्रसाद । आनंदीं आनंद वाढवावा ॥१॥
बहुतांच्या भाग्यें लागलें जाहाज । येथें आतां काज लवलाहें ॥२॥
अलभ्य तें आलें दारावरीं फुका । येथें आतां चुका न पाहिजे ॥३॥
तुका ह्मणे जिव्हाश्रवणाच्या दारें । माप भरा वरें सिगेवरि ॥४॥

॥४७७५॥
नये पाहों मुख मात्रागमन्यांचें । तैसें अभक्ताचें गुरुपुत्रा ॥१॥
ह्मणऊनि बरें धरितां एकातं । तेणें नव्हे घात भजनासी ॥२॥
नये होऊं कदा निंदकाची भेटी । जया द्वैत पोटीं चांडाळाच्या ॥३॥
तुका ह्मणे नका बोलों त्यासी गोष्टी । जयाचिये दृष्टी पाप वाढे ॥४॥

॥॥४७७६॥
देवासाठीं जाणा तयासीच आटी । असेल त्या गांठीं पुण्यराशी ॥१॥
निर्बळा पाठवी बळें वाराणसी । गेला आला त्यासी अर्ध पुण्य ॥२॥
कथे निद्राभंग करावा भोजनीं । तया सुखा धणी पार नाहीं ॥३॥
यागीं ऋण घ्यावें द्यावें सुख लाहीं । बुडतां चिंता नाहीं उभयतां ॥४॥
तुका ह्मणे वर्म जाणोनि करावें । एक न घलावें एकावरी ॥५॥

॥४७७७॥
अग्नीमाजी पडे धातु । लीन होउनि राहे आंतु ॥ होय शुद्ध न पवे धातु । पटतंतुप्रमाण ॥१॥
बाह्यरंगाचें कारण । मिथ्या अवघें चि भाषण ॥ गर्व ताठा हें अज्ञान । मरण सवें वाहातसे ॥२॥
पुरे मातलिया नदी । लव्हा नांदे जीवनसंधीं ॥ वृक्ष उन्मळोनि भेदी । परि तो कधीं भंगेना ॥३॥
हस्ती परदळा जो भंगी । तया पायीं न मरे मुंगी ॥ कोण जाय संगी । पाणोवाणी तयेच्या ॥४॥
पिटितां घणें वरी सैरा । तया पोटीं राहे हिरा ॥ तैशा काय तगती गारा । तया थोरा होऊनि ॥५॥
लीन दीन हेंचि सार । भव उतरावया पार ॥ बुडे माथां भार । तुका ह्मणे वाहोनि ॥६॥

॥४७७८॥
आशाबद्ध तो जगाचा दास । पूज्य तो उदास सर्वजना ॥१॥
आहें ते अधीन आपुले हातीं । आणिकां ठेविती काय बोल ॥२॥
जाणतिया पाठीं लागला उपाध । नेणतां तो सिद्ध भोजनासी ॥३॥
तुका भय बांधलेंसें गांठीं । चोर लागे पाठीं दुभतया ॥४॥

॥४७७९॥
आणिकासी तारी ऐसा नाहीं कोणी । घडतें नासुनी भलता टाकीं ॥१॥
सोनें शुद्ध होतें भलतें तें घरीं । नासिलें सोनारीं अळंकारें ॥२॥
ओल शुद्धकाळीं काळें जिरें बीज । कैचें लागनिज हातां तेथें ॥३॥
एक गहूं करिती अनेक प्रकार । सांजा दिवशीं क्षीर घुगरिया ॥४॥
तुका ह्मणे विषा  रुचि एका हातीं । पाधानी नासिती नवनीत ॥५॥

॥४७८०॥
वाटे या जनाचें थोर बा आश्चर्य । न करिती विचार कां हिताचा ॥१॥
कोण दम ऐसा आहे यांचे पोटीं । येईल शेवटीं कोण कामा ॥२॥
काय मानिनियां राहिलों निश्चिंती । काय जाब देती यमदुतां ॥३॥
कां हीं विसरलीं मरण बापुडीं । काय यासी गोडी लागलीसे ॥४॥
काय हातीं नाहीं करिल तयासी । काय झालें यासी काय जाणे ॥५॥
कां हीं नाठविती देवकीनंदना । सुटाया बंधना पासूनियां ॥६॥
काय मोल यासी लागे धनवित्त । कां हें याचें चित्त नाहीं ॥७॥
तुका ह्मणे कांहीं भोगितिल खाणी । कां त्या चक्रपाणी विसरलीं ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP