मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
४८९१ ते ४९००

बोधपर अभंग - ४८९१ ते ४९००

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥४८९१॥
वंदिलें वंदावें जीवाचिये साटीं । किंवा बरी तुटी आरंभींच ॥१॥
स्वहिताची चाड ते ऐका हे बोल । अवघेंचि मोल धीरा अंगीं ॥२॥
सिंपिलें तें रोप वरीवरी बरें । वाळलिया वरी कोंभ नये ॥३॥
तुका ह्मणे टाकी घायें देवपण । फुटलिया जन कुला पुसी ॥४॥

॥४८९२॥
आम्हा विष्णु दासां हेंचि भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ॥१॥
वाणी नाहीं घ्यावें आपुलिया हातें । करोनियां चित्तें समाधान ॥२॥
तुका ह्मणे द्रव्य मेळविलें मागें । हें तों कोणासंगें आलें नाहीं ॥३॥

॥४८९३॥
सुखाचे व्यवहारीं सुखलाभ झाला । आनंदें कोंदला मागें पुढें ॥१॥
संगती पंगती देवासवें घडे । नित्यानित्य पडे तेंचि सांचा ॥२॥
समर्थाचे घरीं सकळ संपदा । नाहीं तुटी कदा कासयाची ॥३॥
तुका म्हणे येथें लाभाचिया कोटी । बहु वाव पोटीं समर्थाचे ॥४॥

॥४८९४॥
अग्नि हा पाचारी कोणासी साक्षेपें । हिंवे तोचि तापे जाऊनियां ॥१॥
उदक म्हणे काय याहो मज प्यावें । तृषित तो धांवे सेवावया ॥२॥
काय वस्त्र म्हणे यावो मज नेसा । आपुले स्वइच्छा जग वोढी ॥३॥
तुक्यास्वामी ह्मणे काय मज स्मरा । आपुल्या उद्धारा लागुनियां ॥४॥

॥४८९५॥
॥विष पोटीं सर्पा । जन भीतें तया दर्पा ॥१॥
पंच भूतें नाहीं भिन्न । गुण दु:ख देती शीण ॥२॥
चंदन प्रिय वासें । आवडे तें जाती ऐसें ॥३॥
तुका ह्मणे दाणा । कुचर मिळों नये अन्ना ॥४॥

॥४८९६॥
भल्याचें दर्शन । तेथें शुभचि वचन ॥१॥
बोलावी हे धर्मनीत । क्षोभें होत नाहीं हित ॥२॥
मर्यादा ते बरी । वेळ जाणावी चतुरीं ॥३॥
तुका ह्मणे बहू । लागे ऐसें बरें मऊ ॥४॥

॥४८९७॥
सर्वा भूतीं द्यावें अन्न । द्रव्य पात्र विचारोन ॥ उपतिष्टे कारण । तेथें बीज पेरीजे ॥१॥
पुण्य करितां होय पाप । दुग्ध पाजोनि पोशिला साप ॥ करोनि अघोर जप । दु:ख विकत घेतलें ॥२॥
भूमी पाहतां नाहीं वेगळी । माळ बरड एक काळी ॥ उत्तम निराळी । मध्यम कनिष्ट ॥३॥
ह्मणोनि विवेकें । कांहीं करणें निकें ॥ तुका ह्मणे फिकें । रुची ने दी मिष्टान्न ॥४॥

॥४८९८॥
देवावरी भार । वृत्ति अयाचित सार ॥१॥
देह देवाचे सांभाळी । सार योजे यथाकाळीं ॥२॥
विश्वासीं निर्धार । विस्तारील विश्वंभर ॥३॥
तुका ह्मणे व्हावें । बळ एकचि जाणावें ॥४॥

॥४८९९॥
थोर ती गळाली पाहिजे अहंता । उपदेश घेतां सुख वाटे ॥१॥
व्यर्थ भराभर केलें पाठांतर । जोंवरी अंतर शुद्ध नाहीं ॥२॥
घोडें काय थोडें वागवितें ओझें । भावेंविण तैसें पाठांतर ॥३॥
तुका ह्मणे धरा निष्ठावंत भाव । जरी पंढरीराव पाहिजे तो ॥४॥

॥४९००॥
नका दंतकथा येथें सांगों कोणी । कोरडे ते मानी बोल कोण ॥१॥
अनुभव येथें व्हावा शिष्टाचार । न चलती चार आह्मांपुढें ॥२॥
निवडी वेगळें क्षीर आणि पाणी । राजहंस दोन्ही वेगळालीं ॥३॥
तुका ह्मणे येथें पाहिजे जातीचें । येरा गाबाळाचें काय काम ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 02, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP