मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५४७१ ते ५४८०

बोधपर अभंग - ५४७१ ते ५४८०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५४७१॥
हानी मृत्यु लाभ तिन्ही । कोणी नाणिती प्रार्थुनी ॥१॥
येती आपुलाले वेळे । आदळती तेव्हा कळे ॥२॥
नाहीं परिहार यांचा । भोग अचुक दैवाचा ॥३॥
तुका ह्मणे हरिहरां । न चुकेचि यांचा फेरा ॥४॥

॥५४७२॥
मायाभोंवरा चुकवी । एक हरीची परत्री ॥१॥
हरीविण तरुं जाती । ते तों अधिक बुडती ॥२॥
पुण्यवंत कोणी होय । तोचि धरी रामपाय ॥३॥
तुका म्हणे ते तरती । नामरुप ते धरती ॥४॥

॥५४७३॥
नामरुप नाहीं सोपें । मिळे गुरुचिया कृपें ॥१॥
गुरुकृपा महा भारी । होय असत्या बोहरी ॥२॥
त्याग असत्या कठीण । जगीं न सोडिती जाण ॥३॥
तुका म्हणे विषापरी । आहे गुरुकृपा खरी ॥४॥

॥५४७४॥
जन्ममृत्युभय नाहीं कवणासी । निर्भय मानसीं विचरती ॥१॥
पुत्र वित्त दारा केला भरवंसा । पडियेला फांसा अविद्येचा ॥२॥
सर्व सुख हेंचि विषय मानिलें । हरीस ठेविलें गुंडाळुनि ॥३॥
तुका म्हणे पूर्व दोष नावरती । तया रघुपती कैसा जोडे ॥४॥

॥५४७५॥
सर्वाचि अंतरें जाणतो श्रीहरी । तयापुढें चोरी केंवि घडे ॥१॥
मनबुद्धि जाती धुंडाया पदार्थ । विठ्ठल समर्थ उभा तेथें ॥२॥
परद्वार केलें एकांतीं ब्रह्मांडीं । मानियेलें मनीं तिजें नाहीं ॥३॥
तुका म्हणे साक्षी अनंत ब्रह्मांडीं । तस्कराचे पिंडीं कैसा होय ॥४॥

॥५४७६॥
हरिचिया गुणा नाहीं पारावार । ध्यानीं उभावर आठवितो ॥१॥
ब्रह्मा विष्णु देव इंद्रादि सकळ । व्यापारी गोपाळ न सोडिती ॥२॥
हरिपायांविण विश्रांतीचें घर । त्रैलोक्यीं साचार दुजें नाहीं ॥३॥
तुका म्हणे सर्व साराचेंही सार । पूर्ण सुखकर हरी असे ॥४॥

॥५४७७॥
पोसोनियां पिंड नाहीं कामा आला । अंतीं वांया गेला हरिविण ॥१॥
दुध घृत लोणी पायस पक्वान्नें । धन वस्त्र धान्य दिलीं जया ॥२॥
प्रयाणसमयीं वासना गुंतली । घरींच राहिलीं दारापुत्रीं ॥३॥
तुका म्हणे स्थूळ सुक्षम हे दुष्ट । नागविले स्पष्ट आत्मलाभा ॥४॥

॥५४७८॥
अचिंत्या अपारा लाविती जे गुण । जाणावे अज्ञान शिरोमणी ॥१॥
माझ्या विठ्ठलाची माया घडी मोडी । अनंत ब्रह्मांडीं हरीं साक्ष ॥२॥
देवाजिची सत्ता घेऊनियां चाले । टाकीत पाउलें माया देवी ॥३॥
तुका म्हणे हरी करुनी अकर्ता । जानकीचा भर्ता रामचंद्र ॥४॥

॥५४७९॥
पहा भाग्य रावणाचें । त्याला देणें शंकराचें ॥१॥
ऐशींहजार ज्याच्या कांता । मंदोदरी पतिव्रता ॥२॥
तेहतीस कोटी देव । बंदींत घातले सर्व ॥३॥
ब्रह्मा पातडा तो वाची । बहु जबरदस्ती त्याची ॥४॥
चंद्रसूर्य मशाल धरी । दिवटी सलामच्या वेळीं ॥५॥
यम ज्याची माकन आरी । पायीं चुकल्या रावण मारी ॥६॥
अग्नि ज्याचा रजक झाला । धुतो पागोटीं हा शेला ॥७॥
दारीं दिनकर कर जोडी । धाकें वायु घर झाडी ॥८॥
खंडेराव ज्याचा न्हावी । नित्य नेम आरसा दावी ॥९॥
गणपती थोर देव । गाढव वळायासी धांवे ॥१०॥
कुंभवीर । साठ सहस्त्र काठी कोर ॥१२॥
जो कां लांब नव्वद गांव । कुंभकर्ण ज्याचें नांव ॥१३॥
भोंवता समुद्राचा फेर । मध्यें सोन्याचें नगर ॥१४॥
तुका म्हणे ऐसा मस्त । रघुविरें केला दस्त ॥१५॥

॥५४८०॥
नामरुप माया बोलावया ठाव । भागा आला भाव तयावरी ॥१॥
शींव वाटे परी न खंडे पृथवी । शहाणे ते जिवीं समजती ॥२॥
पोटा आला तिच्या लोळे मढयावरी । पारखी न करी खंती कांहीं ॥३॥
तुका ह्मणे भक्तिसाठीं हरिहर । अरुपींचे क्षर विभाग हे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 04, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP