मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
५४६१ ते ५४७०

बोधपर अभंग - ५४६१ ते ५४७०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५४६१॥
हरिकृपा होय तरीच बंधनें । तुटतील जाण पूर्व पुण्यें ॥१॥
हरिकृपा होय तरी संतती । अखंड भजती विठ्ठलासी ॥२॥
हरिकृपा होय तरीच मानसीं । आठव भक्तीसी प्राणियांच्या ॥३॥
तुका ह्मणे हरिकृपेविण कांहीं । केलें तें सर्वही वायां जाय ॥४॥

॥५४६२॥
हरिकृपा होय ऐसाचि उपाय । करी त्याची माय धन्य झाली ॥१॥
हरिकृपा होय तरीच सार्थक । जन्म निरार्थक नोहे त्याचा ॥२॥
हरिकृपा होय देहभाव जाय । आत्मलाभ होय स्वत:सिद्ध ॥३॥
तुका म्हणे हित संतसंगाविण । हरिकृपा होणें नाहीं नाहीं ॥४॥

॥५४६३॥
हरिवीण वाणी जळो हे पापिणी । रजकसौंदणीं अशुद्ध ते ॥१॥
हरिविण मन जैसा होय श्वान । होमशाळे जाण अशुद्धते ॥२॥
हरिविण काया प्रेतरुप वांया । शिवूं नये तया अशुद्धते ॥३॥
तुका म्हणे हरिपायां जे लागले । तेचि वंद्य झाले तिही लोकीं ॥४॥

॥५४६४॥
कलियुगीं शत मानाचे प्रमाण । आयुष्यवर्धन पुढें नाहीं ॥१॥
मातापितयाच्या रेतरक्तापोटीं । निपजली सृष्टी जीवमात्र ॥२॥
तयाचा विचार करोनी त्या मनीं । आलों मी कोटोनी जाणें कोठें ॥३॥
तुका म्हणे देहीं विवेक न केला । तोचि नागविला आत्महिता ॥४॥

॥५४६५॥
साधुसी न कळे खळाचें अंतर । कपटी जिव्हार सर्वकाळ ॥१॥
पतिव्रता नेणे शिंदळीचें मन । वरपंगी जाण बोल तिचे ॥२॥
बकाचिया ध्याना काय जाणे मासा । क्षुद्र वाघ जैसा मक्षिकेसी ॥३॥
तुका ह्मणे खर्‍या खोटयाची संगती । न घडो श्रीपती दयाळुवा ॥४॥

॥५४६६॥
धन्य पुत्र माये पोटीं । निपजले रत्नकोटी ॥१॥
हरीरुप अंगें झाला । ज्ञानस्वरुप शोभला ॥२॥
कोटी ब्रह्मांडांचा धणी । प्रकाशक स्वयें मानी ॥३॥
तिळभरी अहंकार । नाहीं नये वृत्तीवर ॥४॥
तुका ह्मणे पूर्णपणें । जनीं वनीं तो आपण ॥५॥

॥५४६७॥
हा विजयी नारायण । याचें करी जो चिंतन ॥१॥
तया न विसंबे देव । दीनरक्षक माधव ॥२॥
न पाहेचि कुळ याती । भाविकासी धरी हातीं ॥३॥
तो हा विठ्ठल चिद्धन । तुका ह्मणे सनातन ॥४॥

॥५४६८॥
कागा काय पयमान । राजहंस रुची जाणे ॥१॥
सेवा पतीची शिंदळी । जाणे पतिव्रता बाळी ॥२॥
भक्त अभक्त हे जाण । भक्ता प्रिय नारायण ॥३॥
तुका ह्मणे तयेवरी । जगीं वर्तती अंतरीं ॥४॥

॥५४६९॥
वृक्ष उन्मळे छेदितां । घाव मुळासी पडतां ॥१॥
अग्राकडोनियां नाश । केंवि होय त्या वृक्षास ॥२॥
मुळी किंचित राहिली । वृक्षवृद्धी पुन्हा झाली ॥३॥
तेंवि मीपणाचें मूळ । ज्ञानें होतसे निर्मूळ ॥४॥
तुका म्हणे घ्यावें चित्तीं । नि:संगती शस्त्र हातीं ॥५॥

॥५४७०॥
सार्वभौम राजे युगायुगीं झाले । तयां आठविलें कोणें सांगा ॥१॥
माझ्या विठ्ठलाचे अनंत अपार । गुण अवतार वर्णिताती ॥२॥
वेद शास्त्रें सर्व हरीलागीं ध्याती । सोडविता अंतीं दुजा नाहीं ॥३॥
तुका ह्मणे काय मानवाची स्तुती । सज्ञानें ते अंतें करुं नये ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 04, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP