मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग|
४८७१ ते ४८८०

बोधपर अभंग - ४८७१ ते ४८८०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥४८७१॥
सकळ पूजा स्तुति । करावी ते व्हावें याती ॥१॥
ह्मणऊनि वारा जन । संतपूजा नारायण ॥२॥
सेवावें तें वरी । दावी उमटूनि ढेंकरीं ॥३॥
तुका ह्मणे सुरा । दुधा ह्मणतां केवीं बरा ॥४॥

॥४८७२॥
धीर नव्हे मनें । काय तयापाशीं उणें ॥१॥
भार घातलियावरी । दासां नुपेक्षील हरी ॥२॥
याऐसी आटी । द्यावी द्रव्याचिये साटी ॥३॥
तुका ह्मणे पोटें । देवा बहु केलें खोटें ॥४॥

॥४८७३॥
द्रव्याचिया कोटी । नये गांडीची लंगोटी ॥१॥
अंतीं वोळवणेसाठीं । पांडुरंग धरा कंठीं ॥२॥
लोभाचीं लोभिकें । यांचें सन्निधान फिकें ॥३॥
तुका ह्मणे हितें । जग नव्हो पडो रितें ॥४॥

॥४८७४॥
जळो अगी पडो खाण । नारायण भोगिता ॥१॥
ऐसी ज्याची वदे वाणी । नारायणीं ते पावे ॥२॥
भोजनकाळीं करितां धंदा । ह्मणा गोविंदा पावलें ॥३॥
तुका ह्मणे न लगे मोल । देवा बोल आवडती ॥४॥

॥४८७५॥
मेला तरी जावो सुखें नरकासी । कळंकी याविशीं शिवों नयें ॥१॥
रजस्वला करी वेलासी आघात । अंतरे तों हित दुरी बरें ॥२॥
उगीं च कां आली नासवावीं फळें । विटाळ विटाळें कालवूनि ॥३॥
तुका ह्मणे लोणी घालोनि शेणांत । उपेगाची मात काय असे ॥४॥

॥४८७६॥
अतित्याई बुडे गंगे । पाप लागे त्याचें त्या ॥१॥
हें तो आपुलिया गुणें । असे जेणें योजिलें ॥२॥
अवचटें अग्नि जाळी । न सांभाळी दु:ख पावे ॥३॥
जैसें तैसें दावी आरसा । नकटया कैसा पालटे ॥४॥

॥४८७७॥
फळकट तो संसार । येथें सार भगवंत ॥१॥
ऐसें जागवितों मना । सरसें जना सहित ॥२॥
अवघें निरसूनि काम । घ्यावें नाम विठोबाचें ॥३॥
तुका म्हणे देवाविण । केला सीण तो मिथ्या ॥४॥

॥४८७८॥
एका एक साह्य करुं । अवघे धरुं सुपंथ ॥१॥
कोण जाणे कैसी परी । पुढें उरी ठेवितां ॥२॥
अवघे धन्य होऊं आतां । स्मरवितां स्मरण ॥३॥
तुका म्हणे अवघी जोडी । ते आवडी चरणाची ॥४॥

॥४८७९॥
आपुलें आपण जाणावें स्वहित । जेणें राहे चित्त समाधान ॥१॥
बहुरंगें माया असे विखरली । कुंटित चि चाली होतां बरी ॥२॥
पूजा ते अबोला चित्ताच्या प्रकारीं । भाव विश्वंभरीं समर्पावा ॥३॥
तुका म्हणे गेला फिटोनियां भेव । मग होतो देव मनाचा चि ॥४॥

॥४८८०॥
भल्याचें कारण सांगावें स्वहित । जैसी कळे नीत आपणासी ॥१॥
परी आम्ही असों एकाचिये हातीं । नाचवितो चित्तीं त्याचें तैसें ॥२॥
वाट सांग त्याच्या पुण्या नाहीं पार । होती उपकार अगणित ॥३॥
तुका ह्मणे तुह्मी बहू कृपावंत । आपुले उचित केलें संती ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 02, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP