मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पदे १ ते १०

व्यंकटेशाचीं पदें - पदे १ ते १०

मध्वमुनीश्वरांची कविता


पद १ लें
जय जय तिमया कोनेरी । तुझा वागा सोनेरी ॥१॥
मुगुटालंकृत मस्तकीं । शंख चक्र हस्तकीं ॥२॥
मकराकृति कुंडलें । श्रवणीं तेज दंडलें ॥३॥
प्रसन्न इंदुवदन । सुंदर हरिकदन ॥४॥
कुंकुम केक्शर अळवट । भाळीं शोभे मळवट ॥५॥
कंठीं तुळसीच्या माळा । हृदयीं कमळजा बाळा ॥६॥
कांसे पिवळें सवस्त्र । शस्त्र छुरीका कटिसूत्र ॥७॥
उदरीं त्रिवळी सुंदर । भुवनत्रय मंदिर ॥८॥
जानू जंघा सोज्वळ । चरणीं गंगेचें जळ ॥९॥
पायीं बिरुदें साज्ती । सुस्वर रुणुझुणु वाजती ॥१०॥
गरुडस्तंभाजवळी । मूर्ति शोभे सावळी ॥११॥
मध्वमुनीश्वर आवडी । कथा करितो साबडी ॥१२॥
मुक्तमंडपीं राहातो । अखंड कौतुक पाहातो ॥१३॥

पद २ रें
व्यंकटेशपर्वतीं । गरुडवहन मिरवती ॥१॥
छत्रचामर मोर्छल । वीणा दर्पण सोज्वळ ॥२॥
माही मोर्तब संपूर्ण । सूर्यापान सुपर्ण ॥३॥
घंटा जगट काहाळा । वाजंत्र्यांचा सोहळा ॥४॥
गरुड टके पताका । वैष्णव मिरविती पादुका ॥५॥
कोट दीप दीपिका । गज रथ तुरंग सीबिका ॥६॥
चंद्रजोतीचे भडके । नळे हवयाचे कडके ॥७॥
गगनीं तुटती ह्या तारा । जय जय त्रिमल अवतारा ॥८॥
नाचती दिव्य अप्सरा । गाती मधुर सुस्वरा ॥९॥
देव आले निजधामा । पूजा करितो ब्रह्मा ॥१०॥
श्रीभूदूर्गा भारती । करिती मंगल आरती ॥११॥
मध्वमुनीश्वरवरदायी । खेळे क्षीराब्धिशायी ॥१२॥

पद ३ रें
जय जय व्यंकट रमणा रे । सखया संकटहरणा रे ॥१॥
पाहातां श्रीभूवैकुंठ । प्रेमें दाटतसे कंठ ॥२॥
गोपुरावरी कळस । झळकती रात्रंदिवस ॥३॥
वनीं वृक्ढ घनदाट । पक्षी करिती बोभाट ॥४॥
गाई व्याघ्र वनचरें । वसती सोडुनिया वैर ॥५॥
मध्वमुनीश्वर कृपाळ । करितो कालयुगीं सांभाळ ॥६॥

पद ४ थें
त्रिभुवनेश्वर त्रिमलनायका । विनवी त्रिंबक तें गुज आयका । त्रिविधतापनिवारणचंदना । त्वरित तोडि गुणत्रयबंधना ॥१॥
मुख कसें तरि दाखविसी जगीं । चरणिंची बिरुदावळि ते बगी ॥ सबळ म्यां तुज आणियलें उणें । पतितपावन तूं कवण्या गुणें ॥२॥
तम विलोकुनि सूर्य जिवें पळें । द्विरद देखुनि सिंह भयें सळे ॥ शलभ पक्षिबळें वणवा विझे । कवण मूर्ख तुझ्या बिरुदा रिझे ॥३॥
बहुत उद्धरिले निजदास गे । मज झणीं करिसील उदार गे ॥ गिरिवरील महोत्सव येकदां । जिवलगे मज दाविसि गे कदा ॥४॥
जधिं पडेल तुला अनुकूळ गे । मज तधीं मग धाडिसि मूळ गे ॥ तरि तुझ्या घरिं काय असें उणें । विसर हा पडला कवण्या गुणें ॥५॥
बहुत खंति तुझी मज वाटते । कठिण दूर दिगंतर वाटते ॥ पतितपावन नाम तुं आठवी । गरुडवाहन सत्वर पाठवी ॥६॥
गिरिवरील महोत्सव दाखवी । चरनतीर्थं मनोहर चाखवी ॥ जननिये अपराध तुं नाठवी । उदरवाढ करूनिहि सांठवी ॥७॥
अति अमंगळ बालक घाण तें । जननिला चरणद्वय हाणतें ॥ पार तयावर ती बहु माउली । शिरिं करी तळहातिंची साउली ॥८॥
निसुर सांडिन कोंकरु श्रीधरा । विसरसी झनिं मध्वमुनीश्वरा । लिखित म्यां लिहिलें अपुल्या करीं । उचित होईल जें तुज तें करी ॥९॥

पद ५ वें
मोहनरंगया देवा व्यंकटाधीशा ॥ध्रु०॥
अलमेलमंगानंगा रंगा संसारभंगा । कस्तुरीरंगा कृष्णा संकटनाशा ॥१॥
फुल्लारविंदनेत्रा कल्हारदळगात्रा । आह्लादकरवेषा शेषाद्रीवासा ॥२॥
नवनीरदाभा नीरजनाभा नवरत्नशोभा । कोनेरी तिमया श्रीभूदुर्गाविलासा ॥३॥
अच्छेद्या अभेद्या श्रीमध्वनाथवेद्या । वेदांतप्रतिपाद्या अविद्यानिरासा ॥४॥

पद ६ वें
गोविंदराया येरे येरे ॥ध्रु०॥
अंबरीषकार्यास्तव घेसी दशावतार फेरे । जलचर वनचर रूप त्यागुनी उरलें दर्शन दे रे ॥१॥
पंकजवदना व्यंकटरमणा संकटीं दर्शन दे रे । किंकर मी भवपंकीं बुडालों वैकुंठाप्रति ने रे ॥२॥
दुर्जन मारुनि अर्जुनसारथि होउनि धरिसी दोरे । तुरंग जेव्हां नाचति तेव्हां म्हणसी होरे होरे ॥३॥
भक्तवत्सल म्हणउनि देवा शबरीचीं खासी बोरें । गवळ्याघरिचीं वत्सें राखिसि मिळवुनि लहान पोरें ॥४॥
दीनदयालय मां परिपालय कालियशासन शौरे । मध्वमुनीश्वर म्हणतो चुकवी चौर्‍ह्यांसीचे फेरे ॥५॥

पद ७ वें
देवा संकटनाशन व्यंकटेशा । स्वामी कोनीरी तिमया चिन्मय अलमेलमंगा रंगा वैकुंठवासा ॥ध्रु०॥
भवपद्म भवादिभिवंदित पादसरोरुह कोटिकंदर्पसुंदरवेषा पीत निर्मळ कौशेयवासा ॥१॥
देव पूर्ण कृपार्णव रुक्मिणीरंजन निर्गुण रूप निरंजन विष्णो पांडवसंकटनाशा तांडव कृष्णा ॥२॥
देवा बद्धविलक्षण सिद्धविचक्षण मध्वमुनीश्वररक्षरणदक्षा क्षीराब्धिमध्यविलासा जय श्रीनिवासा ॥३॥

पद ८ वें
पुष्करणीच्या तीरीं लक्ष्मीसहित हरि । धरिला वैष्णववीरीं । तो स्वामी शिरावरी । असतां मजला काय उणें हो तिमया मैलगिरी ॥१॥
दुस्तर भवसिंधू ज्यानें केला बिंदू । त्याचें पाय वंदूं । तो म्हणवी दीनबंधु । अभिनव गिरिवर अंकुर लाहे आनंदाचा कंदु ॥२॥
परिसे माझ्या चित्ता । सांडुनि सर्वही वित्ता । धरणें साधुवृत्ता लाहासी त्रिभुवनसत्ता । मध्वमुनीश्वर म्हणतो हाणी कळिकाळासी लत्ता ॥३॥

पद ९ वें
शेषाचलवासा । तूं स्वामी दयालय माझा । पालय निजदासा । तोडुनि भवफांसा । देवा तुझा अगाध महिमा । कळला वेदव्यासा ॥१॥
गरुडावाहन शोभे । देखुन मानस लोभे । ब्रह्मादीक उभे । त्यावर पडती तोबे । देवद्रोही म्हणविती त्यांवरि । चक्र तुझें तें क्षोभे ॥२॥
आतां करणें हेंचि । दैन्यदशा ते कैंची । कळिकाळाला पेची । त्याच्या वदना ठेंचि । मध्वमुनीश्वर तुझ्या द्वारीं । उष्टीं सितें वेची ॥३॥

पद १० वें
जिवलगा गोविंदराया रे ॥ध्रु०॥
पसरुनि बाह्या भेटोनिया ने निजठाया रे । श्रीनिवासा मजलागीं दे मति तवगुण गाया रे ॥१॥
मानवी हे काया आणियली सायासें जाया रे । शेषाचल न पाहातां जाइल सेवटीं वाया रे ॥२॥
निवारुनि माया दाखवि तूं आपुल्या पायां रे । मध्वनाथावर धरि सीतळ सुखकर छाया रे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP