मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पदे १ ते १०

स्फुट पदें - पदे १ ते १०

मध्वमुनीश्वरांची कविता


पद १ लें
श्रीपांडुरंगपदपंकजपूजकानें । केली हरीस विनती प्रभु केशवानें ॥ श्रीव्यंकटेश्वर उपासक पुण्यधामा ॥ तो पत्रिका परिसवी द्विज कृष्णनामा ॥१॥
देवा गनेश करुणा बहु भाकियेली । ते पत्रिका गिरिवरी तिस ऐकवीली ॥ मागेतलें विमळ उत्तर पत्रिकेचें । आरंभिलें सकाळ सार्थक मैत्रिकीचें ॥२॥
देवा गणेश कथिलें गुज व्यंकटेशें । देईन दर्शन रघूत्तममूर्तिवेषें ॥ स्वप्नामधें कथिन मी लिखितार्थ त्याला । ऐसा निरूपम निरोप तयास जाला ॥३॥
श्रीमध्वनाथकविच्या घरिं रामचंद्रें । केली कृपा रघुविरें गुणरत्नसांद्रें ॥ श्रीलक्ष्मणासहित जानकीकांत आला । उत्साह मंगळतुरीं नगरांत जाला ॥४॥
कन्याप्रदानविधि व्यंकतराजभक्तिं । केला महोत्सव यथोचित तो स्वशक्ती ॥ सीतास्वय्म्वर मनोहर लग्न केलें । वैकुंठराजभुवना कुळ सर्व नेलें ॥५॥
श्रीमद्गणेशतनयेति मयाभिधानें । दिव्यांबरें कनकभूषण अन्नदानें श्रीव्यंकटेशभजनीं अति सावधानें ॥ ते पूजिली वधुवरें करुणानिधानें ॥६॥
श्रीरामचंद्रपदपंकजसेवकांसी । उत्साह थोर हृदयीं अति भाविकांसी ॥ कोदंडपाणि चिमणा भवदुःख नासी । तो भेटला सगुण पंचवटीनिवासी ॥७॥
श्रीमध्वनाथसदनीं प्रतिमा विराजे लावण्य देखुनि जिचें रतिनाथ लाजे ॥ पायीं सदैव बिरुदावळि दिव्य वाजे । भागीरथीपतितपावन कीर्ति गाजे ॥८॥
श्रीमध्वनाथ रघुनाथ उपासकानें । हे श्लोक पैं विरचिले अति भाविकानें ॥ जो चित्त घालुनि सदा परिसेल कानें । तो वंदिजे सुरवरीं निजमस्तकानें ॥९॥

पद २ रें
जाणुनी वक्ता वक्ताहो । जाला पंडित वक्ता हो ॥ अखंड निंदी भक्ता हो । नेणे जीवन्मुक्ता हो ॥१॥
ऐसा पंडित अभिमानी । आपली महिमा बहु वानी ॥ संतजनाला अपमानी । त्याचें लटकें तंव मानी ॥२॥
अव्हेरूनी भगवंता । जी जी करिती धनवंता ॥ निंदीत फिरती बहु संता । पाडील त्यंच्या यम दंता ॥३॥
विसरुनी बंधु शुक्राचा । विचार राशभचक्राचा ॥ न करी जय तो अकरांचा । स्वभाव सज्जनवक्रांचा ॥४॥
समीप असतां अरविंदा । दुर्दर नेणें मकरंदा ॥ काय म्हणूं त्या विषयांचा । अखंड चिखलाचा धंदा ॥५॥
पर्वत वन्हि धूमेसी । अखंड खटपट नेमेसी ॥ उपाधि इंधन भावेंसी । अंतीं बंधन जीवेंसी ॥६॥
ऐसा पंडित बहु निका । पढवी चिंतामणिटीका ॥ मिळवी दानावरि शिबिका । श्रीहरिभक्तीवीण फिका ॥७॥
आपली मिरवी चतुराई । कुटुंब पोसुनी उतराई ॥ मध्वनाथ वरदायी । जाणे पंडितजन घाई ॥८॥

पद ३ रें
लई लई लाकोटा । सांड चाळा तो खोटा ॥ बळकट खोऊन कासोटा । गे सोडूं नको आंगोठा ॥१॥
नांव तुझें मोठें गे । आतां जासील कोठें गे । मोडूं नको बोटें गे । खाल्लें फार पोते गे ॥२॥
चळें घेउनी काकीचे । मोतीं लेईं नाकींचे ॥ आईजीच्या लेकीचे । घर घेई येकीचे ॥३॥
तुझी माझी गडी गे । खाऊं नको रडी गे ॥ खेटूं नको दरडी गे । बांधीन तुझी नरडी गे ॥४॥
समजुन आपल्या ठायीं गे । खेळ मजसी डाई गे ॥ तरीच तुजला बाई गे । भाळल माझा भाई गे ॥५॥
उभी माझे सवती गे । बघूं नको भंवती गे ॥ पडलीस माझे हातीं गे । रमवीन मध्वनाथीं गे ॥६॥

पद ४ थें
घाला बाई पिंगा वो । सांडुनी धांगडधिंगा वो ॥ सांडुनी कामसंगा वो । रामरंगीं रंगा वो ॥१॥
अनुभव नाहीं निका हो । मान हालवूं नका हो ॥ रंग दिसतो फीका हो । पुढें आहे धका हो ॥२॥
माज बरवा मोडी वो । राजाराम जोडी वो ॥ प्रपंच अवघा सोदि वो । याची काय गोडी वो ॥३॥
होई मुक्तकेसी वो । माझा वेष घेसी वो ॥ चिद्रत्नाला लेसी वो । श्वेतद्वीपा येसी वो ॥४॥
मध्वनाथीं खेळ वो । पिंगा अवघा वीळ वो ॥ स्वरूपीं माझ्या मीळ वो । होसी घननीळ वो ॥५॥

पद ५ वें
समजुनी घाली फुगडी वो । कोठें न दिसे उघडी वो ॥ विषसुखाचा विघडि वो । द्वैतपसारा नुघडी वो ॥१॥
विधिनिषेध मांड्या झाकी वो । निर्हय पाऊल टाकी वो ॥ निजगुज आपलें राखी वो । होऊनी येकायेकी वो ॥२॥
तृष्णापल्लव खोवी वो । हा बहुता ठायीं गोवी वो ॥ मीपण बुंथी ठेवी वो । निजगुज आपुलें सेवी वो ॥३॥
गोष्टी ऐके निपुणाची । वेणी आवरी त्रिगुणाची ॥ भीड न धरी कवणाची । आण श्रीगुरुवचरणाची ॥४॥
फुगडी घालुनी निरुती वो जाउनी बैसे वरती वो ॥ बाई घेई रति वो । नाहीं तरी होई परती वो ॥५॥
मध्वनाथीं चतुराई । मिरउनी होई उतराई ॥ तेही नुरवी मग बाई । तूंच होसी जळशाई ॥६॥

पद ६ वें
कैकाय कैकाय बाई कोण कैंचा जाण । सद्गुरुक्रुपा होईल तेव्हां सर्व सुख बाणे ॥१॥
घेई खुळ खुळ बाई विनलें राजसवाणें । देऊन सुपल्या कुरकुल्या मेळविते दाणे ॥२॥
माझ्या रामाचे डोळे हरणी देखुनी डोले । माझ्या रामाईचें पोट गगनाहुनी मोठें ॥३॥
माझ्या रामाईचे बोल समुद्राहूनी खोल । गोडबोली गुलगुली आवा आहेसी सगुण । वरमाय होसील वोहंमाय होसिल सांगते शकुन । फिरत फिरत याच गांवा आलें जैं आज । भाग्याची तूं आहेस बाई ठेवलीस वळखून ॥४॥
जें जें रचल तें तें खचल होईल चकचूर । पुढील होईक भाकून जातें अवघें होईल भुर ॥  वरलीकडून आलें माझें घर आहे दूर ।  मध्वनाथस्वामी माझा धण्या भरपूर ॥५॥

पद ७ वें
काकीस वळखा काकीस ॥ध्रु०॥
उफराटा पिंपळ त्यावरी येका कावळीनें केला खोपा रे । उफराटें बोलणें जाणे तो शाहाणा आहाणा नव्हे हा सोपा रे ॥१॥
उफराट्या दृष्टीनें पहातां कैसा उफराटा चालतो वौश रे । कावळीचें अंडें फोडितां त्यांतुनि निघतो राजहंस रे ॥२॥
उफराट्या हंसानें मानस भक्षुनि मुक्ताफळावरि लोळे । उफराटा मध्वनाथ निजेला गगनीं झांकुनि डोळे रे ॥३॥

पद ८ वें
फटसौरी फजीतखोरी नको करूं चाळे । काजळकुंकु तेलफणी दांत करुनी काळे ॥ध्रु०॥
फळ नाहीं फूल नाहीं व्यर्थ जिणें बाळे । येणें वरपंगें कोण देखुनि तुला भाळे ॥१॥
टाकमटीका करुनी किती घालसील डोळे । भगली ते फुगवीसी उरावरील गोळे ॥२॥
येणें रंगें नागविले बहूत जन भोळे । वरल्या रानीं जासिल तेव्हां खासिल वर जरि टोले ॥३॥
ठाकू नको आपल्या ठाईं करूनि चांगभांग । जनापुढें पोटासाठीं नाचविसी अंग ॥४॥
सौरीयाच्या संगें तुझा फेटला नाहीं पांग । विनोदाचा सेवट गोड होईल कैसा सांग ॥५॥
उपजूं दे त्रास नको फिरो दारोदार । नसते चार सिकुन किती करिसी कारभार ॥६॥
भवसिंधु तरुनी कैसी जासी पैलपार । मध्वनाथ फजित करूनी सिकवी वारंवार ॥७॥

पद ९ वें
चांगभांग केला तो अवघा व्यर्थ गेला । ज्याचा हात धरला तो पहिला धगड मेला ॥१॥
आतां बसून काय दुजा कोण्ही पाहे । तरुणपणचें काजळकुंकु व्यर्थ जातें माये ॥२॥
शाहाणीस जाउनी भेटे निवडि खरेंखोटें । अवघ्यापरीस गाढवी तुझेंच आहे मोठें ॥३॥
आतां कोण तुला जगवितो तुझे कोड उगवीतो । जो तो मेला देखुनिया पुढें आपलें फुगवितो ॥४॥
येथें उदंड खेळे आले नाहीं कोण्ही ठेले । स्वजातीसी फिरोन पडुन काळें करून गेले ॥५॥
चाल माझ्या गांवा नको घेऊं धांवा । जेथिल तेथें नेऊन घालिन राखीन तुझ्या नांवा ॥६॥
मी निःसंग सौरी जालें निर्गुण रूपा आलें । लिंगदेह कापुनिया निजानंद व्यालें ॥७॥
ज्ञानांजन ल्यालें नाहीं कोण्हास भ्यालें । सद्गुरुसी शरण जाउनी शांतिरस प्यालें ॥८॥
सौरीसुर जाणा गेलें आपल्या राना । शुकादिक योगी जेथें जाउनि बसले ध्याना ॥९॥
पहिलेंपण गेलें द्वैतलुगडें नेलें । सद्गुरुकृपें मध्वनाथीं खालील वरतें केलें ॥१०॥

पद १० वें
टिपरी गे सये टिपरी । गे वडील जाणुनी सांगतें जीचे ती परि गे ॥ध्रु०॥
साधनदुर्ग मोडुनियां केलें तांस पाट । गौरी बोळउन येतां चुकलीस आपल्या घरची वाट ॥१॥
ऐक पोरी खिजूं नको शिकविते सुबुद्धि । रंगीत टिपरी देखुन तुझी गेली पहिली शुद्धी ॥२॥
ज्ञानगंगा सांडून गेलीस मायानदीच्या कांठीं । टाकमटीका देखुनी तुझ्या । लागले साजण पाठीं ॥३॥
तिहीं तुज चालविलें देखुन दुजा रंग । बोल आपल्यास लाउनि घेसिल सोडि त्याचा संग ॥४॥
इहलोकीं ऐसें कर्म करसील जें कीं । होईल तुझा बोभाट सावकाराचे लेकी ॥५॥
आपल्या घराबाहेर बाई घालूं नको पाय । शांतगौर बोळविल्या मग सौख्य काय ॥६॥
अनिवारा पोरीसवें घालुं नको वार । मध्वनाथें सोडिल्या मग कैची थार ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP