मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पद ११ ते २०

श्रीरामाचीं पदें - पद ११ ते २०

भारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला


११ पद
माझं अचडें बचडें छकदें वो ॥ध्रु०॥
करकमलानें उचलुनी परवडी । दशरथ चुंबी मुखदें वो ॥१॥
आंगणीं रांगत मंजुळ बोलत । शिव पदकीचें ठिकदें वो ॥२॥
मध्वमुनीश्वर स्वामीस म्हणतो । माझें सोन्याचें तें तुकडें वो ॥३॥

१२ पद रामाची बाळलीला
ब्रह्मविशोक तूं रोदन सांडी । बाळा पद्मनाभा कौतुक मांडी ॥ धन्य सुईन ते नाळ जे खांडी रे । राघोबा आवडी माझी वेडी ॥ हेचि कौसल्येची असोसी फेडी रे ॥१॥
तुज मोगरेल लावुनी न्हाणी । वर घालितें उन्होणि पाणी । देतें आशीर्वाद पंकजपाणी ॥रे राघोबा॥२॥
तुझे रूपाचें स्वरूप ध्यावें । तुज अनंगासी न्हाणुनी भावें । घुगर्‍या वाटुनी ठेविलें नांव ॥रे राघोबा॥३॥
शेषशयनावरी शोभे उंसी । ब्रह्मा जन्मला तुझिये कुसीं । त्या तुझें बाळांत्यानें जावळ पुसी ॥रे राघोबा॥४॥
दोन्ही चुरचुरां चोखिसी मुष्टी । तुज उधाळुनी पाजितें घुटी । गरळा न गिळितां हाणे वोष्टपुष्टीं ॥रे राघोबा॥५॥
तुझी संध्याकाळीं उतरितां दिठी । जिवाशिवासी पडते मिठी । नीज पाळण्यांत टाळिया पिटी ॥रे राघोबा॥६॥
क्षीरसागरीं रमसी अहर्निशीं । दुग्ध कपिलेचें सिंपीभरि पिशी । निज साउलीस देखुनि भिसी ॥रे राघोबा॥७॥
ब्रह्म त्रिभुवनव्यापक तूंचि । तुझीं चंद्रसूर्यास न कळे उंची । त्या तुज लेववितें पेहरण कुंची ॥रे राघोबा॥८॥
नखें आरक्त माणिकाची सात । वदनीं झळकती हिरकण्या दांत । ध्यातो मध्वनात हृदयाआंत ॥रे राघोबा॥९॥
तुझ्या वदना भाळला इंदु । काजळ लेववुनी भाळीं लावी बिंदु । झणीं दिठी लागे करुणासिंधु ॥रे राघोबा॥१०॥
देतें कालवुनी साकरेची फेणी । जावळ विंचरुनी घालितें वेणी । परोपरीचीं लेववितें लेणीं ॥रे राघोबा॥११॥
जरीटोपीस पिंपळपान । वरी मोतियाची जाली जाण । बाळया लेववितें टोंचुनि कान ॥रे राघोबा॥१२॥
जीवती वाघनखें रुळती माळे । चरणीं वाजती वांकी वाळे । भिंती धरुनी फेगडे चाले ॥रे राघोबा ॥१३॥
करीं बिंदलीं मनगट्या । माजी कडदोर्‍यासी बांधितें पेट्या । विश्वजनकासी म्हणतें बेट्या ॥रे राघोबा॥१४॥
गोड बोबडें मंजुळ बोले । रूप पाहतां निवती डोळे । ध्येय योगियांचें बाजवरी लोळे ॥रे राघोबा॥१५॥
बोल बोलसी मंजुळवाणे । तुझें हांसण राजसवाणें । तुझ्या कडदोर्‍याची देतसे वाणा ॥रे राघोबा॥१६॥
करितां अवगुण मारीन छड्या । जन्मुनि देवांच्या तोडिल्या बेड्या । त्या तुज सर्वज्ञास म्हणतें वेड्या ॥रे राघोबा॥१७॥
जरीफडकीं पांघरवून । निज कडेवरी तुज घेऊन । घेतें प्रातःकाळीं अंगणांत ऊन ॥रे राघोबा॥१८॥
जाणे मध्वनाथ अनुभवसुखा । वेद वाणितां होतसे मुका । त्या तुझ्या सोगाईचा घेतसे मुका ॥रे राघोबा ॥१९॥

१३ पद
राजीवनेत्रारे । रामा राजीवनेत्रारे ॥ध्रु०॥
मंदस्मितमुखपंकज राजसा । कोमलगात्रारे ॥१॥
दशशतरतिपति मोहनरूपा । सज्जनमित्रारे ॥२॥
मध्वमुनीश्वर गाइ चरित्रा । पावनमंत्रारे ॥३॥

१४ पद
येथें बैस कावकावायेथें बैस चींवचींव ॥ राळा खाउनी पाणी पीउनि भुरकर उडून जाईल जीव ॥ध्रु०॥
सद्गुरुचरणामृत सेवी । धणीवरी बोधामृत जेवी । भावें शरण जाउनी त्यांच्या चरणांवरि मस्तक ठेवी ॥१॥
येथें नाहीं ऊन हींव । चित्तवृत्ति तेथें नीव । दारोदारीं उष्ट्यासाठीं व्यर्थची मुखीं भाकिसी कीव ॥२॥
कल्पवृक्ष सदाशिव । त्याच्या मोक्षफळा शीव । मध्वमुनीश्वर दाखवितो निरवधि आनंदाची शीव ॥३॥

१५ पद
लवती सालया वाजवी तूं टाळया । सरोवरीं पाणी पीती मोरे प्रातःकाळीं या ॥ध्रु०॥
पिंजर्‍यांत आलियां पराधीन जालियां । दूधभात जेऊनीयां देती ढेंकर धालीयां ॥१॥
सोहं सोहं बोलती सोलींव दाणा सोलिती । परमहंस शुकादिक दोहीं पक्षीं डोलती ॥२॥
मध्वनाथीं खेलती मुक्ताफळें झेलिती । चकोर चक्रवाकें बदकें उदकावरी लोळती ॥३॥

१६ पद
रत्नजडित सिंहासनीं । राम देखिला नयनीं ॥१॥
पाहतां श्रीरामाचें मुख । उनें समाधीचें सुख ॥२॥
नलगे आणिक साधन । रामनामें समाधान ॥३॥
मध्वनाथाच्या दर्शनें । भवबंधन निरसणें ॥४॥

१७ पद
जय जय रघुकुळभूप ॥ध्रु०॥
तव भजनीं जे विन्मुख त्यांना । बुडवी भवजलकूप ॥१॥
ज्या तुजसाठीं विरजा होमीं । जाळिती यति तिळतूप ॥२॥
सनकादिक तुज पूजिती हृदयीं । जाळुनि मीपणधूप ॥३॥
मध्वमुनींश्वर म्हणतो माझें । दैवत तें चिद्रूप ॥४॥

१८ पद
जानकीजीवनराम ॥ध्रु०॥
दशरथनंदन दशमुखकंदन । दशशतमुखनुतनाम ॥१॥
सज्जनरंजन दुर्जनगंजन । पूरितनिजजनकाम ॥२॥
नटवर नागर करुणासागर । मदनमनोहर वाम ॥३॥
कनकधनुर्धर दीनजनोद्धर । सुंदर जलधरशाम ॥४॥
तोषितत्रिंबक दूषितचुंबक । सुललितचंपकदाम ॥५॥
मध्वमुनीश्वरवरदपरात्पर । श्रमहरसुखकरधाम ॥६॥

१९ पद
सावळा सकुमार ज्याचें राजस लावण्य । सूर्यवंशीं भूषण हृदयीं विलसे कारुण्य ॥ जटामुगुटमंडित शरीरीं वैराग्य तारुण्य । जानकेसमवेत ज्यानें सेविलें आरण्य ॥१॥
जनस्थानीं गंगातटीं बसउनी पंचवटी । मुनिजनदुःखदायक ऐसे राक्षस निवटी ॥ कोदंड घेउनि लागे हरिणाचे पाठीं । येक्याबानें मारिला तो जानकीच्यासाठीं ॥२॥
ज्याच्या नामस्मरणें जदजीव उद्धरती । तो हा वश केला जिहीं धन्य ते भावार्थी ॥ दक्षिणभागीं लक्ष्मण उभा मध्यें दाशरथीं । मध्वनाथ तिघांजणा वोवाळी आरती ॥३॥

२० पद
सगुणस्वरूप ज्याचें लावण्य अमूप । रत्नजडित सिंहासनीं अयोध्येचा भूप ॥ वामभागीं जगन्माता जानकी सुखरूप । कपिकटकाचा नायक हनुमंत समीप ॥१॥
भरतशत्रुघ्न बंधु उहा पार्श्वभागीं । छत्रचामरें वीजना वारिती रामलागीं ॥ सुग्रीवादिक वानरसेना राघवीं अनुरागी । ऐसें ध्यान उमटतें साधकाच्या अंगीं ॥२॥
शतकोटीचें बीज तो हा कौसल्येचा ताना । ब्रह्मादिक देव ज्याला आणिताती ध्याना ॥ सनकादिक योगियांला देतो जो वरदाना । मध्वनाथीं निजदासां प्रसन्न तो जाणा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP