मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पदे १ ते २

दत्तात्रेयाचीं पदें - पदे १ ते २

मध्वमुनीश्वरांची कविता


पद १ लें
दत्तात्रय चतुराक्षर मंत्र संत सख्यापाशीं । शरण रिघोनी जरि घे तरि तुज नित्य घडे काशी ॥ध्रु०॥
दर्पण दावितां संत समर्थ किं ते त्वं पद । दगड पुजावे नलगे कांहीं सहज सुखानंद ॥ दरवाजे नव बंद करावे हा मिथ्या वाद । दमशम केल्या दर्शन देतो स्वामी अभेद ॥१॥
तारक विश्वकदंबा पाहातां मग कैचि अहंता । ताठा सरला जाणीव झाली सहज जाली लीनता ॥ तामस गुण हा सहज निघाला मना आली समता । तांडव करणें नलगे कांहीं अवघी गुरुसत्ता ॥२॥
तृणपाणी सर्वांभूतीं भरला एकचि पवित्र । त्रिलोकीचें मंडण स्वामी केवळ सत्पात्र ॥ त्रिगुणरहित निरंतर ध्यान परम पवित्र । त्रिपदा जप गायत्री करणें वेदाचें अत्र ॥३॥
यंत्र भूमंडळ उभारिलें हे जोडा दार माये । एकचि असतां द्विविधा झाली साम्यातें काय ॥ येणें जाणें नलगे कांहीं अपाय उपाय । एकचि मध्वनाथ वंदी सद्गुरुचे पाये ॥४॥

पद २ रें
दत्तराज महाराज बैसले औदुंबर तळवटिं । हातीं कमंडलु दंड कडासान बैसले कृष्णातटीं ॥ध्रु०॥
स्वामीचा महिमा नेणवे नकळे ब्रह्मादिकां । याति संन्यासी येऊनि वंदिति स्वामीच्या पादुका ॥ अनुसयेउदरिं जन्मले दत्त दिगंबर देखा । त्रिमूर्ति आवतार दत्त हा आहे जना ठाउका ॥ भोळ्या भाविकांसि वळला भजनाचा सखा । हक्ति करितां मुक्ति देतो वैकुंठीच्या सुखा ॥ भावाचा हुकेला येऊनि राहिला संगमतटीं ॥हातीं०॥१॥
नरहरिनामें प्रल्हादादिक तरले । भक्तजन नक्रगजेंद्रादिक उद्धरिले करितां नामस्मरण ॥ घडूं नये तें घडूनि आलें कृपावळी परिपूर्ण । विधवा स्त्रियेसी केली सुवासीन नमितां भावें कल्याणें ॥ ऐसी महिमा ऐकुनि तेथें रजक आला धावुनी । कर जोडुनियां करितों विनंती स्वामिपदांलागुनी ॥ त्यासी स्वामिनें राज्या देऊन पावन केला शेवटीं ॥हातीं०॥२॥
माघमासीं यात्रा येती स्वामीच्या दर्शना । स्नानदानधर्म आवडीनें करिती प्रदक्षिणा ॥ कोणी वाचिती पुस्तक कोणी करिती आराधना । कोणी बांधिती पूजा कोणी करिती समाराधना ॥ नका करू अवमान सद्गति देईल हाच शेवटीं । मध्वनाथ म्हणे याच्या पायीं घालावी मिठी ॥हातीं०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP