आनंदलहरी - गुरुस्वरुपाची अगम्यता

' आनंदलहरी ’ या छोट्याशा काव्यात नाथांनी गुरूभक्तीला बद्धता नाही, तो जन्ममरणरहित असतो याचें सुंदर व समर्पक वर्णन केले आहे.


मस्तकीं लागतां तयाचा करु । न मोडतां सुष्टीचा वेव्हारु । सर्व जालें शून्याकारु । तेजें अंबर दाटलें ॥२८॥

तया तेजाचा पारु । नेणती ब्रह्मा हरि हरु । वेद राहिले मौन्याकारु । श्रुतीसी विचारु पडिलासे ॥२९॥

तयातें काय वाणावें । कवणा उपमेतें आणावें । त्यावीण दुजें देखावें । तरी सांगावें साक्षित्वें ॥१३०॥

जो निर्गुण निराकार । निरुपम्य निराधार । परब्रह्म निर्विकार । विश्वंभर अव्यक्त ॥३१॥

अखंडतेजें सदोदित । उत्पत्तिप्रळया विरहित । व्यापुनी सर्वांसी आलिप्त । त्यावीण रिता ठाव नाहीं ॥३२॥

जो कां वस्तु परात्पर । सगुण निर्गुणाचें उदर । वेदां नकळे जयाचा पार । शब्दाचा विचार खुंटला ॥३३॥

मनें जयातें देखिजे । तयातें शब्दें वानिजे । जेथें मनें मनपणा मुकिजे । तो शब्दें बोलिजे कवणे परी ॥३४॥

मन सकळांतें चाळितें । तेथें ठाव नाहीं मनातें । यावरी कैंचे इंद्रियातें । देखतां स्वरुपातें पावतील ॥३५॥

जरी म्हणाल स्वरुप निराकार । तरी कोठूनि जाला विस्तार । या शब्दाचा विचार । श्रोतीं सादर परिसावा ॥३६॥

जरी उपसाहित्यें सांगावें । तरी साहित्य कवणातें द्यावें । त्याचिया समता दुजें देखावें । तरी बोलावें साहित्य ॥३७॥

परी बोलतों अल्पमती । भावें परिसावें सज्जन श्रोतीं । रविकिरणापुढें काडवाती । तैसें मतीं बोलतों ॥३८॥

जैसें पाहतां वटबिजासी । सूक्ष्मत्वें नये दृष्टीसी । निराकार असतां तयासी । तेथें द्रुमासी ठाव कैंचा ॥३९॥

बिजामाजीं असतां अंकुर । बिजीं होता बीजाकार । सूक्ष्मत्वें निघाला बाहेर । मग अपार वाढला ॥१४०॥

त्वचा काष्ठें फळें पत्रें । बिजीं होतें बीजाकारें । तोचि महावृक्ष विस्तारे । मग पसरे स्वइच्छा ॥४१॥

नाहीं ह्नणतां विस्तारला । आहे ह्नणों तरी नाहीं देखिला । बीजामाजीं होता संचला । तोचि विस्तारला सगुणत्वें ॥४२॥

तैसें निर्गुण स्वरुपा माझारीं । अनंतब्रह्माडांची भरोवरी । स्वरुपाकार असतां अंतरीं । तेंचि बाहेरीं निघालें ॥४३॥

बीजें व्यापिलें वृक्षासी । तैसें निर्गुणें व्यापिलें सगुणासी । शब्दें आणिलें भिन्नपणासी । जैसें कनकासी अळंकारनामें ॥४४॥

माया स्वरुपीं तदंश होती । ते इच्छेगुणें आणिलें व्यक्ती । सर्व गुणातें जाली प्रसवती । करी मूर्ती त्रिगुणाची ॥४५॥

करी नाना रचनेतें । परी भिन्नत्व नाहीं स्वरुपातें । स्वरुपें व्यापिलें सर्वातें । जैसें अलंकारातें सुवर्ण ॥४६॥

ऐसा स्वरुपाचा विस्तारु । होऊनि उरला अपारु । तया स्वरुपाचा विस्तारु । ब्रह्मादिहरिहरु वेडावले ॥४७॥

त्यातें मौन्येंचि पाहिजे । रसनेवीण गोडी घेइजे । भाग्येंवीण सुख भोगिजे । पद पाविजे गुरुखुणें ॥४८॥

आतां बोलणें खुंटलें । शब्दाचें चातुर्यं राहिलें । दृष्टीचें देखणें उरलें । तेंहि निमालें शेवटी ॥४९॥

सदगुरुचे निजदास । तेचि पावती ये खुणेस । परिसतां कानडे येरास । जैसे पक्षियासी नारेळ ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP