आनंदलहरी - सद्‍गुरुकृपा

' आनंदलहरी ’ या छोट्याशा काव्यात नाथांनी गुरूभक्तीला बद्धता नाही, तो जन्ममरणरहित असतो याचें सुंदर व समर्पक वर्णन केले आहे.


स्वर्गनर्क दोन्ही बंध । हा अज्ञानाचा अनुवाद । सदगुरु कृपा जालिया बोध । जालें सर्व चैतन्य ॥१०॥

सगुण आणि निर्गुण । हें शब्दाचेंचि लाघव जाण । जेथ शब्दा पडिलें मौन । गुणागुण उरले कोठें ॥११॥

तुझी इच्छा जे मायाशक्ति । जाली अनंत ब्रह्मांडें रचिती । करी पंचभूतांची व्यक्ति । संतति जैसी वांझेची ॥१२॥

जैसा कल्पनेचा विस्तारु । हदयीं करितु अपारु । पाहतां न दिसे साचारु । तैसा विचारु मायेचा ॥१३॥

आहर्निशीं तुझ्या स्वरुपीं असती । तयांसी कळली मायेची स्थिती । सकळ मिथ्यात्वें देखती । अज्ञान भ्रांती तयां नाहीं ॥१४॥

बंधमुक्तीचा वळसा । तेचि अज्ञानाची दशा । निद्रिस्त वोसणाये जैसा । भ्रांतीचा फांसा पडिलासे ॥१५॥

ज्यातें तुझी कृपा झाली । त्याची भ्रांति निरसली । कल्पना विरोनि गेली । वृत्ती बुडाली तुझ्या रुपीं ॥१६॥

परिस लागलियां लोहातें । दूरी केलें काळीमेतें । श्रेष्ठत्व आणिलें नीचातें । परी अळंकाराते न मुके ॥१७॥

पूर्वकर्म जें घडलें । तेणें तें नांव पावलें । लोहोपणासी मुकलें । न मोडतां झालें सुवर्ण ॥१८॥

तैसें त्वां कृपावंतें । निरसिलें भ्रांति काळिमेतें । निरसूनि ज्ञानाअज्ञानातें । निजसुखातें मेळविलें ॥१९॥

वरी देहाचिये माथां । आहे कर्मरेखेची सत्ता । तें न चुकेगा गुरुनाथा । सुखदुःख भोगवी ॥२०॥

पूर्वी कर्म जें घडलें । तें अळंकारातें आटिलें । तें नांवपणासी मुकलें । केवळ जालें सुवर्ण ॥२१॥

जैसा वृक्ष छेदिलिया समूळ । आर्द्रता न तुटे तात्काळ । आंगीं असोनि अल्पकाळ । मग केवळ काष्ठ होय ॥२२॥

घालुनी आशेचा पाश । हिंडवी नाना देश । हिंपुटी करुनी देहास । संचित तैसें भोगवी ॥२३॥

पत्रें आणि पुष्पें फळ । सहित वाळला समूळ । अग्निसंगें केवळ । भस्म होय ॥२४॥

तैसी सदगुरुकृपा होय । तोडी विवेकाचेनि घायें । देहे वृक्ष पाडिला पाहे । अर्द्रता राहे संचिताची ॥२५॥

जैसा अनुभवें तो वाळतु । संचित क्रियमाणासहितु । वृक्षाची खुंटली मातु । पावलियां देहांतु शून्य होये ॥२६॥

भस्म जालिया नंतरें । वृक्षाचाही ठाव नुरे । तैसा देह अनुभवें विंरे । पुढें वोसरे जन्ममरण ॥२७॥

तैसें देह पावलिया लय । पूर्वकर्म सहजेंचि जाय । संचितासि नुरे ठाय । सहजें होय सुखरुप ॥२८॥

पूर्वकर्माचिये ऐशी परी । गुरुभक्त नेघे आपणावरी । राहोनि आनंदाभीतरीं । साक्षित्वें व्यवहारी वर्तत ॥२९॥

जैसें जळामाजीं पद्मपत्र । जळीं असोनि अलिप्त । तैसा मुक्त व्यवहारी वर्तत । सुखें भोगित स्वानंदें ॥३०॥

भवभ्रमातें निरसिलें । जन्ममरणातें चुकविलें । देहीं असतां मुक्त केलें । स्वरुपीं मेळविलें आपुलिया ॥३१॥

तुझिया स्वरुपाचा अनुभव । जाणती संत सज्जन प्रभव । निरसूनि देहाचा देहभाव । स्वानुभव भोगिती ॥३२॥

जो अमृताचे सागरीं । अहिर्निशीं क्रीडा करी । जन्ममरणाचें भय घरी । हें कैशापरी घडेल ॥३३॥

जेथ जन्ममरण जालें वावो । तेथें बद्धमुक्ता कैचा ठावो । जीव गिळूनि आपुला उगवो । विसरला पाहाहो दुजेपण ॥३४॥

ऐसी तुझे कृपेची करणी । भवभ्रम निरसिला ततक्षणीं । निद्रींस्त वोसणावे स्वप्नी । तया उठवूनी सावध केलें ॥३५॥

पुरुषोत्तम नाम पंचाक्षर । जो भावें भजे निरंतर । तेथें कैचें भवभय संचार । न चले व्यापार पंचभूतांचा ॥३६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP