मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक १३|
स्तबक १३ - अध्याय २७

कथा कल्पतरू - स्तबक १३ - अध्याय २७

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

मुनीसि ह्नणे राव भारत ॥ सांगा अग्रकथा वृत्तांत ॥ मग वैशंपायन ह्नणत ॥ ऐकें जन्मेजया ॥ ॥१॥

युधिष्ठिरें पुसिलें भीष्मा ॥ ह्नणे सांगा गाईचा महिमा ॥ तंव भीष्म ह्नणे धर्मा ॥ ऐकें इतिहास ॥२॥

च्यवननहुषसंवाद परियेस ॥ च्यवन महाऋषी तापस ॥ गंगायमुनेचा मध्यप्रदेश ॥ तेथें तप करीतसे ॥३॥

बारावरुषें पुरलींती ॥ तेथील जळचरें जळांतीं ॥ मुनीसवें खेळती ॥ निर्भयपणें ॥४॥

असो कवणीएके वेळीं ॥ तेथें पारधी येवोनि कोळी ॥ त्यांही मत्स्य धराया जाळीं ॥ पसरिलीं चहूंकडे ॥५॥

तंव मत्स्यांसवें तेथ ॥ च्यवनही धरवला जात ॥ बाहेर काढिला तंव द्विजनाथ ॥ देखिला ढीवरीं ॥६॥

मग ते दुखवले चित्तीं ॥ च्यवनाच्या पांयीं लागती ॥ अन्यायी ह्नणोनि विनविती ॥ च्यवन पाहे मत्स्यांतें ॥७॥

कितीएक मेलेती ॥ कितीएक चरफडती ॥ देखोनि च्यवन काकुळती ॥ आला बहुत ॥ ॥८॥

मग तो ह्नणे आपणा ॥ मी मत्स्यांचा सहचर जाणा ॥ तरी मत्स्यासवें मरणा ॥ निर्मित असें ॥९॥

ऐसें ऐकोनि ढीवर ॥ ह्नणती अनर्थ दिसतो थोर ॥ मग सांगों गेले शीघ्र ॥ नहुषनृपासी ॥१०॥

सांगीतला च्यवनवृत्तांत ॥ ऐकोनि राव प्रधानांसहित ॥ आला गंगातीरीं त्वरित ॥ तंव ऋषीश्वर देखिला ॥११॥

मग नमस्कारोनि पूजिला ॥ ह्नणे गुरो गृहासि चला ॥ ऐकोनि च्यवन बोलिला ॥ रायाप्रती ॥१२॥

अगा मी मत्स्यांत सांपडलों ॥ तरी कोळियां आधीन जाहलों ॥ ह्नणोनि देशील माझें मोल ॥ तरी होईल सुटका ॥१३॥

संतोषोनि नृपनंदन ॥ ह्नणे तुझें मोल देईन ॥ सहस्त्रयेक स्वर्णधन ॥ सोनटके ॥१४॥

यावरी च्यवन ह्नणे पाहें ॥ हें माझें मोल न होय ॥ मनीं विचारावें रायें ॥ तंव रावो बोलिला ॥१५॥

कीं लक्ष टके देईन ॥ येरु ह्नणे हेंही नव्हे जाण ॥ तुज सांगतील ब्राह्मण ॥ पृच्छा करितां ॥१६॥

राव ह्नणे आपण ॥ सर्व तुजसाठीं देईन ॥ ब्राह्मण ह्नणती हा तपोधन ॥ महायोगी ॥१७॥

यावरी राव दुःखी होवोनी ॥ अंग टाकिता जाहला मेदिनीं ॥ सर्वत्र कोल्हाळ जनीं ॥ केला हाहाःकार ॥१८॥

इतुक्यामध्यें वनांतून ॥ एक अवचितां आला ब्राह्मण ॥ गवीजात नांवें सुजाण ॥ नहुषाजवळी ॥१९॥

नहुषासि ह्नणे तो गवीजात ॥ ऐकें राया सावचित्त ॥ मी सांगतो निभ्रांत ॥ मोल च्यवनाचें ॥२०॥

तेणें राव संतोषला ॥ सावधानें ऐकता जाहला ॥ तंव गवीजात बोलिला ॥ नाहीं मोल ब्राह्मणाचें ॥२१॥

देतां न पुरे त्रिभुवनही ॥ परि मोल द्यावें येकी गाई ॥ गौ आणि ब्राह्मण पाहीं ॥ दोनी समान ॥२२॥

सकळां जाहला जयजयकार ॥ संतोषला नृपवर ॥ च्यवनासि ह्नणे निर्धार ॥ जाहला मोलाचा ॥२३॥

मग कोळियांकारणें ॥ गाय दीधली नृपनंदनें ॥ ते दीधली च्यवनाकारणें ॥ मागुती ढीवरीं ॥२४॥

तंव च्यवनप्रसादें तत्काळीं ॥ ते मत्स्य आणि कोळी ॥ विमानीं बैसोनि स्वर्मडळीं ॥ गेले देखा ॥२५॥

रायासि आशीर्वाद देउनी ॥ च्यवन गवीजात गेले स्वस्थानीं ॥ ऐसा गोमहिमा ऋषिमुनी ॥ बोलती धर्मराया ॥२६॥

तुवां पुसिला हा वृत्तांत ॥ तो कथिला संकलित ॥ मग संतोषें कुंतीसुत ॥ पुसता जाहला ॥२७॥

जमदग्नी ब्राह्मणोत्तम ॥ तयाच्या कुळीं क्षात्रधर्म ॥ कैसा जाहला परशुराम ॥ हा संदेह फेडिजे ॥२८॥

भीष्म ह्नणे कुंतीसुता ॥ इयेअर्थी सांगों आतां ॥ इतिहास संवादकथा ॥ च्यवनकुशिकाची ॥२९॥

एकदा हा ऋषि च्यवन ॥ सामर्थ्यपरीक्षेलागुन ॥ कराया कुशिककुळ दहन ॥ पूर्ववैरे छिद्र पाहे ॥३०॥

कोणे एके समयांतरीं ॥ च्यवन गेला कुशिकाघरीं ॥ रायासि ह्नणे मी द्वारीं ॥ अतीत आलों तूमच्या ॥३१॥

राव राणी संतोषलीं ॥ पूजोनि भीतरीं नेतीं जाहलीं ॥ सेवेसि रात्री जागिन्नलीं ॥ तंव भानु उदेला ॥३२॥

उत्तम भोजनादि सारोनी ॥ मागुती शयन केलें मुनी ॥ ह्नणे संवाहन करा चरणीं ॥ निद्राभंग न कीजे ॥३३॥

मग दोघीं तयेवेळे ॥ चरणसंवाहन मांडिलें ॥ मनी भय असे धरिलें ॥ भंगेल निद्रा ह्नणवोनी ॥३४॥

असो मुनी कानवडला ॥ एकेचि कानीं त्या वेळां ॥ एकवीसदिवस निजेला ॥ तंवपरियंत ॥३५॥

दोघें अन्नोदक टाकोनी ॥ सेवा करिती निश्चळमनीं ॥ प्राप्तसमयीं च्यवनमुनी ॥ दुजे कानीं जाहला ॥३६॥

ऐसाही बहुतदिवस निजेला ॥ मग उठोनि चालिला ॥ उन्मत्तगतीं धाविन्नला ॥ भलतीकडे ॥३७॥

तंव उभयतां राजाराणी ॥ त्याचे पाठीं चाललीं दोनी ॥ तेव्हां अदृश्य जाहला मुनी ॥ रायें शोक मांडिला ॥३८॥

परि नदेखती ब्राह्मणासी ॥ मग परतोनि आलीं घरासी ॥ तंव शयनस्थळीं ऋषी ॥ देखिला पूर्ववत ॥३९॥

रावराणी मागुतीं ॥ चरणसंवाहना करिती ॥ येरु उठोनि शीघ्रगती ॥ रायासि ह्नणे ॥४०॥

कीं न्हाणावें मजलागोनी ॥ ऐकतां उठलीं रावराणी ॥ अभ्यंगसामुग्री करोनी ॥ बाजवटीं बैसविला ॥४१॥

तंव मुनी अदृश्य जाहला ॥ उष्णोदक जाहलें शीतळा ॥ वाट पाहती कोठें गेला ॥ पुनः देखतीं जाहली ॥४२॥

परमसुखी होवोनि दोनी ॥ न्हाणितीं जाहली च्यवनमुनी ॥ ऐसें छिद्र पाहे प्रयत्नीं ॥ परि अणुमात्र दिसेना ॥४३॥

क्रोधी न होती रावराणी ॥ मग अकस्मात ह्नणे मुनी ॥ झडकरी एक रथ आणीं ॥ जाऊं अरण्यांत ॥४४॥

तेव्हां रायें रथ आणिला ॥ देखोनियां मुनि बोलिला ॥ कीं रथ ओढीं भूपाळा ॥ पत्नीसह ॥४५॥

घोडे न जुंपावे येथें ॥ तें मानलें उभयांतें ॥ मग जुंपोनि तयांतें ॥ रथीं मुनी बैसला ॥४६॥

उभयां हटें चालविलें ॥ सकळ नागरिकीं देखिलें ॥ हाहाकारीं प्रवर्तलें ॥ कां पां जुंपिले उभयांसी ॥४७॥

लोकांचा अपवाद ऐकोन ॥ तयां निवारी नृपनंदन ॥ तंव चाबुकें मारी च्यवन ॥ रायाराणीसी ॥४८॥

क्षणीं चालाचाला ह्नणत ॥ ऐसी कदर्थना करित ॥ त्वरें आला वनाआंत ॥ परि अचळें दोघेंही ॥४९॥

शापभयें अविकृत ॥ लोक स्तविती समस्त ॥ ह्नणती कौतुक अत्यंत ॥ इये तपश्चर्येचें ॥५०॥

दोघें रथीं जुंपोन ॥ धैर्य पाहतसे च्यवन ॥ मग संतोषला ब्राह्मण ॥ वनामध्यें ॥५१॥

ह्नणे तुह्मी सुकुमारें अत्यंत ॥ कष्टलीती ओढितां रथ ॥ आतां वर मागा मनोरथ ॥ पूर्ण करीन ॥५२॥

यावरी ह्नणे नृपमणी ॥ तुमचेनि कृपेंकरुनी ॥ किमपि नाहीं जाहले मुनी ॥ क्लेश आह्मां ॥५३॥

कृपाळुत्वें ऋषि ह्नणत ॥ मी राहतों या वनांत ॥ तुह्मीं जावें नगरांत ॥ काहीं चिंता न करावी ॥५४॥

आमुचीया दर्शनासी ॥ नित्य यावें परियेसीं ॥ प्रसन्न करोनी मनासी ॥ जावें आतां ॥५५॥

मग दोघें गेलीं नगरीं ॥ भोजन केलें स्वमंदिरीं ॥ निद्रा केली विभावरीं ॥ तंव भानु उदेला ॥५६॥

मागुती राव वनाआंत ॥ चालिला ऋषिदर्शनार्थ ॥ तेथें रावराणियें अत्यंत ॥ अपूर्व देखिलें ॥५७॥

एक श्रीनगर विस्तारें ॥ उपरमाडिया धवलारें ॥ जाणों इंद्रपद दुसरें ॥ नानाउपवनें शोभती ॥५८॥

वृक्षवल्ली मृगपक्षिजाती ॥ रम्यसरोवरें शोभती ॥ नृत्यांगना नृत्य करिती ॥ गाती किन्नरगंधर्व ॥५९॥

तेथें भद्रासनीं बैसला ॥ ऐसा च्यवनमुनी देखिला ॥ रायाराणिये उपजला ॥ चित्तीं भ्रम ॥६०॥

ह्नणती स्वप्न कीं यथार्थ ॥ हें नकळेचि निभ्रांत ॥ ऐसें बोलती तंव तेथ ॥ काहींच न देखती ॥६१॥

अरण्यपर्वत देखता जाहला ॥ स्त्रीयुक्त आश्चर्य पावला ॥ तंव गीतवेदध्वनी ऐकिला ॥ उभयतीं देखा ॥६२॥

राव ह्नणे राणियेसी ॥ पाहें तपसामर्थ्यासी ॥ रथीं जुपिलें आह्मासी ॥ या महानुभावें ॥६३॥

तेणेंचि हें वनीं वहिलेम ॥ नगर सुंदर असे रचिले ॥ क्षणें दाविलें क्षणें मोडिलें ॥ अदृश्य क्षणें ॥६४॥

याची करणी परियेसीं ॥ न घडेचि ब्रह्मादिकांसी ॥ आपुलें राज्य असे यासी ॥ तृणप्राय ॥६५॥

हे तपश्चर्या बरवी अती ॥ जेणें इंद्रादि सेवक होती ॥ ऐसें बोलतां कांतेप्रती ॥ देखिलें च्यवनें ॥६६॥

मग रावो बोलाविला ॥ आशीर्वादें संतोषविला ॥ जवळी बैसवोनि आश्वासिला ॥ ह्नणे धन्य धैर्यवंत ॥६७॥

तूं क्रोधदोषरहित ॥ वर मागें मनोगत ॥ ऐकोनि राजा विनवित ॥ मुनीप्रती ॥६८॥

तूं मम गृहीं राहिलासी ॥ हाचि परमवर आह्मासी ॥ परम भाग्यें जोडलासी ॥ आह्मां प्राकृतां ॥६९॥

आतां पुसतों नवलपरी ॥ कांपां आलासि मममंदिरीं ॥ आणि एकवीसदिवस वरी ॥ एके कानीं निजलासि कां ॥७०॥

एकदा उगाचि चालिलासी ॥ स्त्रानीं अदृश्य जाहलासी ॥ रथीं जुंपिलें आह्मांसी ॥ कांपां सांग ॥७१॥

मग च्यवन करी उच्चार ॥ देवलोकामाजी थोर ॥ म्यां ऐकिला समाचार ॥ भावीस्थितीचा ॥७२॥

कीं ब्रह्मक्षत्रेंएकतः ॥ कुळसंकर होईल निरुता ॥ तुज पौत्र होईल सर्वथा ॥ तो परम बळवंत ॥७३॥

तो मारील ब्राह्मणातें ॥ ह्नणोनि कुशिकवंशबीजातें ॥ छिद्र पाहोनियां येथें ॥ जाळावया प्रवर्तलों ॥७४॥

मग मी तुझिये घरीं ॥ राहोनि छिद्र निहारीं ॥ नानाछळें परोपरी ॥ अंतर तुझें पाहिलें ॥७५॥

परि तुझे अढळधैर्ये ॥ रथीं जुंपोनि चालिलों पाहें ॥ आणि दाखविलें पाहें ॥ सामर्थ्य तपश्चर्येचें ॥७६॥

तूं कसवटीं उतरलासी ॥ ब्राह्मण्यतपें मानलासी ॥ तरी चिंतिलें लाहसी ॥ निश्चयपणें ॥७७॥

तिसरे जन्मीं परिकर ॥ तुज होईल विश्वामित्र ॥ आणि तुझे वंशीं निर्धार ॥ असेल भार्गवकृपा ॥७८॥

कृपेपासाव होईल पौत्र ॥ तो तापसब्राह्मण थोर ॥ तेणें पालटा क्षात्रधर्मी विप्र ॥ होईल आमुचे कुळांत ॥७९॥

तोचि जाहला अविनाश ॥ हा द्वितीयस्तबकीं पूर्ण इतिहास ॥ परि कांहींकांहीं विशेष ॥ कथिला इये स्तबकीं ॥८०॥

धर्म ह्नणे जी पितामहा ॥ मी थोर पावलों मोहा ॥ कांहीं समजेचिना पहा ॥ केला कुळबंधुनाश ॥८१॥

त्यांचे पुत्रस्त्रिया काय करिती ॥ मज कोणते नरक होती ॥ तरी पुढें कठीण गती ॥ दिसत असे ॥८२॥

यावरी भीष्म ह्नणे धर्मासी ॥ कांपां मोहातें पावलासी ॥ नरकगती चुकावयासी ॥ ऐकें दानरहस्य ॥८३॥

दानें पाविजे पुण्ययश ॥ आणि उत्तमलोक विशेष ॥ पाविजती परियेस ॥ तीं दानें सांगतों ॥८४॥

गृहदान शय्यादान ॥ वस्त्रभूषण यानदान ॥ अन्नदान गोदान ॥ इत्यादि समस्तें ॥८५॥

येणें होय स्वर्गप्राप्ती ॥ उदकदानें अखंडतृप्ती ॥ भूमिदानें पृथ्वीपती ॥ पण प्राप्त होय ॥८६॥

गोप्रदानें गोलोकी ॥ जितुके रोम तितुकीं ॥ वरुषें वसिजे आईकीं ॥ स्वर्गभुवनीं ॥८७॥

अभ्यंगदानें निरोगी होय ॥ स्वर्णदानें वसुलोकीं जाय ॥ पुष्पमाळादानें लाहे ॥ अत्यंत सुख ॥८८॥

कन्यादान भूमिदान ॥ करितां पावे इंद्रभुवन ॥ गंधप्रदानें होय जाण ॥ सुरभी नर ॥८९॥

जो राजा सोपस्करीं ॥ उचित शय्या दान करी ॥ तो पावे सुंदर नारी ॥ भोगांगनां समवेत ॥९०॥

इत्यादि दानें असती ॥ धर्मा तुज सांगों किती ॥ सकळ मनोरथ पूर्ण होती ॥ करितां सर्वदानें ॥९१॥

हें दानरहस्य जाण ॥ द्रौपदीसहवर्तमान ॥ सुखी जाहले ऐकोन ॥ धर्मादि समस्त ॥९२॥

यावरी युधिष्ठिर बोले ॥ कीं सर्वदानरहस्य कथिलें ॥ परि त्यांत उत्तम बोलिलें ॥ कोणतें सांग ॥९३॥

जें दान दीधलिया ॥ इहपरलोकीं दातया ॥ उपतिष्ठतें स्वामिया ॥ तें सांगे मज ॥९४॥

मग ह्नणे गंगानंदन ॥ दानामाजी उत्तमदान ॥ जें भयपीडानिवारण ॥ हेंचि श्रेष्ठ बोलिजे ॥९५॥

आणि व्यसनीं पडिलिया प्रयत्नें ॥ शरणागतासि संरक्षिणें ॥ याउपरी दान देणें ॥ पात्रविशेषीं ॥९६॥

हिरण्यभूमिगोदान ॥ पात्रविशेषीं देणें जाण ॥ सत्पात्रीं कीजे समर्पण ॥ तेणें पापां बोहरी ॥९७॥

आणिक जिया वस्तुजाती ॥ आपणासी आवडती ॥ त्यांचिये भोक्तेयाप्रती ॥ त्यात्या द्याव्या ॥९८॥

कोणे पात्रें आशा धरोनी ॥ मागीतलें यांचा करोनी ॥ त्या न देयी अहंकार मानी ॥ तो प्रत्यवायी होतसे ॥९९॥

जे कोणासि न मागती प्राणी ॥ देवमनुष्याची आशा सांडोनी ॥ निस्पृह आणि९ सात्विक गुणी ॥ वेदाध्यायी धैर्यवंत ॥१००॥

त्यांसी सर्वसामुग्रि दासी ॥ द्याविया दास गाई ह्मैशी ॥ धान्य वस्त्र रस विशेषीं ॥ उपकरणयुक्तें गृहें ॥१॥

तेणें दातया भाग्य अती ॥ कां जे ब्राह्मण तेथें वर्तती ॥ स्वधर्मानुष्ठान आचरती ॥ त्या गृहामाजी ॥२॥

तें पुण्य दातयासि देख ॥ होय अनंत सुखदायक ॥ इहपरलोकीं सम्यक ॥ होय संतोष दातया ॥३॥

जेवीं अग्निहोत्रादिक ॥ विप्रकर्म आवश्यक ॥ तेवीं दातेयासी देख ॥ पात्रविचारण ॥४॥

हें तरी आवश्यक पाहीं ॥ जया कोपलोभ नाहीं ॥ सर्वासि बरें थोडें सही ॥ यथार्थ बोले ॥५॥

अल्पलाभें संतोषी थोर ॥ अध्ययनी स्वाचारतत्पर ॥ त्यासी पूजापुरःसर ॥ दान कीजे ॥६॥

अन्नदानें वस्त्रदानें ॥ तथा पूर्वोक्तें सर्वदानें ॥ तया देवोनि संतोषविणें ॥ प्राप्तकाळीं ॥७॥

इहलोकीं परलोकीं अती ॥ सूर्यासम मानपात्र होती ॥ आणि ऐसियां न पूजिती ॥ मग ते पाहती सकोप ॥८॥

ज्या रायाकडे पाहती ॥ तया रायाचे सर्वार्थी ॥ इहलोक परलोक जाती ॥ होय विनश्यती समूळ ॥९॥

हीं दानपात्रें विशेषीं ॥ ब्राह्मण क्षत्रिय वैश्यासी ॥ शूद्रेंही ऐसिया ब्राह्मणांसी ॥ सेवा कीजे ॥११०॥

भीष्म ह्नणे मातापिता ॥ भ्राता स्वदेहही तथा ॥ मज प्रिय नाहीं सर्वथा ॥ तैसा ब्राह्मण प्रिय ॥११॥

तंव ह्नणे कुंतीनंदन ॥ समानविद्य दोनी ब्राह्मण ॥ शांतस्वभाव आचरण ॥ दोघांचेंही ॥ ॥१२॥

त्या दोघांत दातया देतां ॥ थोर पुण्य कोठें ताता ॥ तंव भीष्म ह्नणे कुंतीसुता ॥ ऐकें विशेष ॥१३॥

मागितलेया दीधलें ॥ ते तंव पुण्यचि असे बोलिले ॥ परि न मागत्या अर्पिलें ॥ तें अनंतपुण्य ॥१४॥

प्रत्य हीं दानें अपारें ॥ बळिवर्द रत्नें छत्रें ॥ पादरशा वस्त्रें पात्रें ॥ रायें करावीं ॥१५॥

सघृत षड्रसअन्नें ॥ अश्वगजयुक्तें वाहनें ॥ शय्यागृहें इत्यादि दानें ॥ रायें करावीं ॥१६॥

ब्राह्मणा नसेल तें द्यावें ॥ असेल तें रक्षण करावें ॥ हेचि धर्म स्वभावें ॥ नृपवराचे ॥ ॥१७॥

सुशील विद्यावंत ब्राह्मण ॥ दुर्बळ आणि अनुपपन्न ॥ ज्याचें कुटुंब कष्टायमान ॥ अन्नवस्त्रावेगळें ॥१८॥

भूमिदान दीधल्या तया ॥ उत्तमफळ होय राया ॥ आतां हें विस्तारुनियां ॥ सांगत असें ॥१९॥

सकळ पदार्थ पृथ्वीपासोन ॥ यास्तव पृथ्वीदानासमान ॥ दुजें नाहीं अधिक दान ॥ भुवनत्रयीं ॥१२०॥

तें भूमिदान निभ्रांत ॥ दातयाचे समस्त ॥ पूर्ण करी मनोरथ ॥ येथ संदेह नाहीं ॥२१॥

तिये भूमीचीं रजें जितुकीं ॥ दिव्यसहस्त्रवरुषें तितुकीं ॥ भोग भोगूनि स्वर्गलोकीं ॥ पावे ब्रह्मभुवन ॥२२॥

आणि जितुके धान्यकण ॥ तेणें प्रमाणेंकरुन ॥ पुण्य होय वर्धमान ॥ दातयाचें ॥२३॥

भूमिदाता मातापितयांचीं ॥ दहादहाकुळें उभयांचीं ॥ एकविसावा स्वयेंची ॥ उद्धरे जाण ॥२४॥

जैसें धान्य कणीं वाढे ॥ तैसें पुण्य वाढे वेगाढें ॥ अप्सरा नाचती तयापुढें ॥ स्वर्गलोकीं ॥२५॥

शंखनिधी भद्रासन ॥ चामर छत्र शोभायमान ॥ दिव्यवस्त्रें दिव्यान्न ॥ पावे स्वर्गसुख ॥२६॥

तंव पुसिलें धर्मरायें ॥ कोणे दानें शीघ्रसिद्धि होय ॥ मग ह्नणे गांगेय ॥ ऐकें धर्मा ॥२७॥

ऐसेंचि पूर्वी भलें ॥ म्यां नारदा होतें पुसिलें ॥ तेणें मज सांगीतलें ॥ कीं मोठें अन्नदान ॥२८॥

जेणें अन्नें करोनि स्थिती ॥ प्राणिमात्र प्राण धरिती ॥ अन्नापासाव रेतोत्पत्ती ॥ यास्तव रक्तादि धातु ॥२९॥

वीर्ये पुरुषादिकां उत्पत्ती ॥ ह्नणोनि जीं नानापापें असती ॥ तीं पापें न बाधिती ॥ अन्नदान केलिया ॥१३०॥

अन्नदाता पुत्रपौत्रीं आघवें ॥ धनधान्य स्वर्गादि पावे ॥ ऐसें अन्नदान जाणावें ॥ श्रेष्ठ सर्वात ॥३१॥

तत्प्रमाणें विशेषें ॥ मी अन्नदान करीतसें ॥ तंव धर्म ह्नणे कैसें ॥ कोणे नक्षत्रीं कोण दान ॥३२॥

भीष्म ह्नणे तिये वेळे ॥ एकदा नारद द्वारकेसि आले ॥ तेव्हां देवकीयें पुसिलें ॥ कीं सांगा नक्षत्रदान ॥३३॥

उपरी देवकीये प्रती ॥ नारद सांगती वित्पत्ती ॥ ते ऐकें गा भूपती ॥ सावधानें ॥३४॥

कृत्तिकानक्षत्रीं घृतशर्करा ॥ प्रचुर पायस सुपात्रा ॥ दानदाता अवधारा ॥ पावे श्रेष्ठलोक ॥३५॥

रोहिणीनक्षत्रीं गृहस्थ ॥ जो अन्नदान असे करित ॥ घृतशर्करा दुग्धयुक्त ॥ तो अनंत सुख पावे ॥३६॥

मृगशीर्षी सवत्सधेनु वोजे ॥ आरद्रेसि चित्रान्न दीजे ॥ तरी क्षुरधारपर्वतीं जाइजे ॥ तेथें सुख अपार ॥३७॥

पुनर्वस्वीं नानान्न पाहें ॥ दान देतां यशस्वी होय ॥ पुष्यीं सुवर्ण दे तो जाय ॥ स्वर्गलोकीं ॥३८॥

आश्लेषीं रुपें वृषभ देती ॥ ते विमानवाहनें पावती ॥ मघानक्षत्रीं वोपिती ॥ तिळें भरित रांजण ॥३९॥

ते पुत्रपौत्रादि युक्त ॥ होती इये लोकीं समर्थ ॥ स्वर्गलोकींही तद्वत ॥ होती सुखी परम ॥१४०॥

पूर्वाफाल्गुनी पूर्वदिनीं ॥ उपवासविधी करुनी ॥ नानाभक्ष्ये दे शर्करा मिळवुनी ॥ तरी सौभाग्य पावे ॥४१॥

घृतदुग्धयुक्त साटीओदन ॥ सुपात्रीं देतां स्वर्गभुवन ॥ पावे उत्तरेसि देतां दान ॥ तें अनंतफळ होय ॥४२॥

हस्तनक्षत्रीं पूर्वदिनीं जाण ॥ उपोषणं करी हस्तिरथदान ॥ तो अनेक सुखें भोगून ॥ अंतीं स्वर्ग पावे ॥४३॥

चित्रानक्षत्रीं बळिवर्ददान ॥ तथा पवित्र दे अन्न ॥ तो अप्सरलोकीं नंदनवन ॥ पावोनि क्रीडा करी ॥४४॥

स्वातींच्या ठायी विशेष ॥ जे वस्तु प्रिय आपणास ॥ ते देतां इहलोकीं यश ॥ आणि परत्र सुख पावे ॥४५।

गाई धान्य विशाखे ॥ देतां देवपितरवर्ग संतोषे ॥ स्वयेंही परलोकीं सुखें ॥ संतोष पावे ॥४६॥

अनुराधांपूर्वी उपवास करिती ॥ उत्तरीयसहित वस्त्रें देती ॥ ते शंभरवरुषें वसती ॥ स्वर्गलोकीं ॥४७॥

ज्येष्ठीं शाकादान करिती ॥ ते चिंतिली वृद्धी पावती ॥ मूळनक्षत्रीं मूळदानें अती ॥ पितर होती संतृप्त ॥४८॥

पूर्वाषाढे आधीं उपोषण ॥ करुनि देती पात्रदान ॥ ते उत्तमकुळीं उपजोन ॥ गाईधन पावती ॥४९॥

उत्तराषाढीं उदक निर्मळ ॥ सुगंध आणि सुशीतळ ॥ इत्यादि देतां सकळ ॥ मनोरथ पूर्ण होती ॥१५०॥

आतां नक्षत्रीं अभिजित ॥ तैं दान द्यावें घृतमधुयुक्त ॥ तेणें स्वर्गगती निभ्रांत ॥ होय दातया ॥५१॥

श्रवणनक्षत्रामाझारी ॥ वस्त्रभूषणें परोपरी ॥ दे तो श्वेतविमानीं झडकरी ॥ बैसोनि स्वर्गी पावतो ॥५२॥

धनिष्ठाशततारके सुगंध अगर ॥ चंदनकस्तूरी कर्पूर ॥ दे तो पावे निर्धार ॥ अप्सरलोकीं ॥५३॥

पूर्वाभाद्रपदीं चंवळिया देती ॥ ते धनधान्यें सुखी होती ॥ उत्तराभाद्रपदीं पितरां तर्पिती ॥ ते पावती अन्न बहु ॥५४॥

रेवतीं कांस्य गाई दुभती ॥ देती ते सर्वकाम पावती ॥ इहलोकीं सुखी होती ॥ आणि परलोकींही ॥५५॥

अश्विनीनक्षत्रीं सत्य ॥ धेनु देती अश्वसहित ॥ ते वाजीगजरथ ॥ पावती जाण ॥५६॥

तिळधेनु दे भरणीये ॥ तेणें कीर्ती महती होय ॥ आणि जन्मांतरीं लाहे ॥ थोर समृद्धी ॥५७॥

हें देवकीसी भलें ॥ नारदें सांगीतलें वहिलें ॥ आतां गोदान थोर बोलिलें ॥ सकळांमाजी ॥५८॥

समस्तांची उपकारक ॥ तिचेनि दानें पुत्रपौत्र देख ॥ पशुलक्ष्मी स्वर्गादिसुख ॥ प्राप्त होय ॥५९॥

तथा जेणेंकरुन ॥ स्नानसंध्या अनुष्ठान ॥ वेदोक्तकर्माचें साधन ॥ साध्य होय ॥१६०॥

दाता आणि प्रतिग्राहक ॥ दोघेही पावती पुण्य देख ॥ तेणें स्वर्गादि सकळ लोक ॥ प्राप्त होती ॥६१॥

पुढें गोदान आणि पात्र ॥ भीष्म सांगेल पवित्र ॥ तें श्रोती ऐकिजे सादर ॥ ह्नणे मधुकरकवी ॥६२॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ त्रयोदशस्तबक मनोहरु ॥ नक्षत्रदानादिप्रकारु ॥ सप्तविंशाध्यायीं कथियेला ॥१६३॥ ॥ शुभंभवत ॥


References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP