मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक १३|
स्तबक १३ - अध्याय ४

कथा कल्पतरू - स्तबक १३ - अध्याय ४

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

मग ह्नणे जन्मेजयो ॥ मुने तूं सर्वज्ञ ऋषिरावो ॥ कथिला राजनीतिप्रभावो ॥ अबंचकत्वें ॥१॥

तरी आतां पुढील नीती ॥ मज सांगें बरव्यारीती ॥ तंव मुनि ह्नणे भूपती ॥ ऐकें सावधान ॥२॥

धर्म ह्नणे गंगात्मजा ॥ प्रजापाळण करोनि वोजा ॥ धर्मकीर्ति पावे राजा ॥ तो प्रकार सांगिजे ॥३॥

आणि कोणाजवळी बरवा ॥ स्वयें व्यवहार करावा ॥ पूर्वोक्तगुणांचा मेळावा ॥ कैंचा येके ठायीं ॥४॥

भीष्म ह्नणे गा अवधारीं ॥ प्रगल्भ शुचि ब्राह्मण चारी ॥ बळी शस्त्रपाणी क्षत्री ॥ आठ पुरुष ॥५॥

शुचि वैश्य एकवीस ॥ शूद्र तीनी परियेस ॥ यांसीं व्यवहार विशेष ॥ करावा रायें ॥६॥

पन्नासवर्षीचा प्रगल्भ शुद्ध ॥ श्रुतिस्मृतिविशारद ॥ समदर्शी पुरातन प्रबुद्ध ॥ ऐसा पुराणिक कीजे ॥७॥

अथवा वयवृद्ध नसोनी ॥ निपुण शास्त्रविद्या पुराणीं ॥ कळाकुशळ पृच्छा प्रश्नीं ॥ तो पूज्य पुराणिक ॥८॥

मग येणें व्यवहारें बरव्या ॥ रायें प्रजा पाळाव्या ॥ इया कुशळता जाणाव्या ॥ राजधर्मी ॥९॥

अधर्मे पाळितां राज्यभय ॥ अकीर्ति स्वर्गहानी होय ॥ सामात्य राजा नरकीं जाय ॥ अधर्मे करोनी ॥१०॥

यथोक्तदंडें भूपती ॥ इहलोकीं पावे कीर्ती ॥ स्वर्गलोकींही होय गती ॥ तदनंदरें ॥११॥

यथोक्तवादी दूत जाणिजे ॥ तो आपत्तिकाळींही रक्षिजे ॥ त्यासी मारिलिया पाविजे ॥ अनंत नर्क ॥१२॥

कुळीण शीळसंपन्न द्युतिमंत ॥ वाग्मी सत्यवादी प्रिय वदत ॥ इहीं सप्तगुणीं युक्त ॥ करावा दूत रायें ॥ ॥१३॥

ऐसाचि दारवंटेकरी ॥ आणि व्यापारकुपुरांतरीं ॥ रायें करावा बरव्यापरी ॥ परीक्षोनी ॥१४॥

धर्मशास्त्रीं तत्वज्ञ ॥ संधिविग्रहीं मतिमान ॥ स्म्रुतिमंत शीलसंपन्न ॥ पराक्रमयुक्त ॥१५॥

जाणे आयुधें यंत्रतत्व ॥ साहे शीतोष्ण अचलत्व ॥ पररंध्रज्ञान गुणयुक्तत्व ॥ तो सेनापती करावा ॥१६॥

तंव धर्म ह्नणे कवणिये स्थळीं ॥ रहावें सकुटुंब भूपाळी ॥ भीष्म सांगे तिये वेळीं ॥ दुर्ग करोनि वसावें ॥१७॥

ते षट्प्रकारें दुर्ग ॥ धनदुर्ग महीदुर्ग ॥ गिरिदुर्ग मनुष्यदुर्ग ॥ वृक्षदुर्ग वनदुर्गादी ॥१८॥

तये दुर्गामाजी नगर ॥ रायें वसवावें सुंदर ॥ तेथ पौंळी कोट आवार ॥ खंदकादि करावे ॥१९॥

गजाश्वरथ असावे समस्त ॥ ब्रह्मघोषें अनुनादित ॥ समाजोत्सवसंपन्न पूजित ॥ दैवतादिकें ॥२०॥

अमात्य आणि सैन्यें सकळें ॥ वश करोनियां भूपाळें ॥ ऐशा नगरीं सहकुळें ॥ असावें जाण ॥२१॥

तेथ भांडागार आयुधें ॥ यंत्रें तृणकाष्ठें विविधें ॥ लोहलाक्षा श्रृंग औषधें ॥ असावी वृद्धी ॥२२॥

सर्वबीजें सर्वमूळें ॥ सर्वरस सर्व फळें ॥ नानापदार्थ जातिकुळें ॥ रायें संग्रहावीं ॥२३॥

आराम उदकस्थानें ॥ राष्ट्री तळीटाकीं राखणे ॥ तथा निरोधही करणें ॥ दुष्टजनांचा ॥२४॥

भक्तांवरी कृपा कीजे ॥ वैरियांसी निग्रहिजे ॥ यज्ञदान आचरिजे ॥ पाहूनि प्रजा ॥२५॥

दीन अनाथ जाणावा ॥ तया योगक्षेम द्यावा ॥ तापसां आश्रमियां सर्वा ॥ संतुष्ट कीजे ॥२६॥

अतःपर धर्मा जाण ॥ तुज राजयुक्ति सांगेन ॥ जेणें स्मृतिकीर्ति सहगुण ॥ होती रायासी ॥२७॥

एकग्राम दशग्राम ॥ वीसग्राम शतग्राम ॥ सहस्त्रग्राम यांचे उत्तम ॥ पृथक् अधिकारी करावे ॥२८॥

ग्रामाचे गुणदोष आघवे ॥ दशग्रामिकें पहावे ॥ परस्परें सांगावे ॥ उत्तरोत्तरांसी ॥२९॥

एकाग्राम्यें धान्यादि भोज्यें ॥ दशग्राम्यासि द्यावीं ओजें ॥ तेणें वीसग्रामिया दीजे ॥ उत्तरोत्तर ॥३०॥

प्रधानें जनपदाचें सम्यक ॥ हिरण्य धान्य वृत्यादिक ॥ पाहोनि सौम्यदृष्टी देख ॥ निवेदावें रायासी ॥३१॥

पापिष्ठ द्रोही जाणोनी ॥ लोक रक्षावे त्यां पासोनी ॥ क्रयविक्रय खर्चादाय पाहोनी ॥ बांधावा कर ॥३२॥

राजा आणि प्रजा दोनी ॥ सुखी करावे प्रधानीं ॥ परि हे उभयकार्यकरणीं ॥ असे दुर्लभ ॥३३॥

श्लोकः ॥

नरपतिहितकर्ता द्वेषतां याति लोके जनपदहितकर्ता त्यज्यते पार्थिवेन ॥

इति महति विरोधे वर्तमाने समाने नृपतिजनपदाना दुर्लभः कार्यकर्ता ॥१॥

अतितृष्णा न कीजे ॥ वत्स पाळोनि गाय दोहिजे ॥ ऐसें राज्य प्रतिपाळिजे ॥ तो पावे सुख थोर ॥३४॥

जैं आपत्तिकाळ पावे ॥ तैं लोकांतें ऐसें ह्नणावे ॥ कीं मज साह्य होवोनि रक्षावें ॥ स्त्रीपुत्रांसह ॥३५॥

ऐसी करुणा भाकोन ॥ मागावें प्रसादे करुन ॥ बलात्कार कीं अपमान ॥ करुचि नये ॥३६॥

जैसे भ्रमर पुष्पातें ॥ कां वत्स गौमातेतें ॥ न पीडोनि स्वकार्यातें ॥ साधिताती ॥३७॥

तैसें कार्य साधावें ॥ अतितीक्ष्णोपाय न करावे ॥ यथाविभागें कर घ्यावे ॥ यथाकाळीं ॥३८॥

राजा नियमें न राहे साचा ॥ तरी लोकांचिये पापाचा ॥ चतुर्थाश भागाचा ॥ होय विभागी ॥३९॥

प्राज्ञ धनिक आणि शूर ॥ भोगी धार्मिक विद्यापर ॥ सत्यवादी सुष्ठोत्तर ॥ बुद्धिमंत तपस्वी ॥४०॥

याचें करितां संरक्षण ॥ देवोनि दानमान धनधान्य ॥ उत्तरोत्तर संपूर्ण ॥ होय राज्यवृद्धी ॥४१॥

वनस्पती सफलित वृक्ष ॥ यांचा छेद न कीजे प्रत्यक्ष ॥ नूतन वृक्ष लक्षानुलक्ष ॥ ठेवावे नेमोनी ॥४२॥

आपुलेयां पासोनी ॥ पारिके रक्षावे ॥ निर्वाणी ॥ तथा पारिकेया पासोनी ॥ रक्षावे आपुले ॥४३॥

आणि आपणातें स्वभावें ॥ सकळांपासोनी रक्षावें ॥ आत्ममूळचि आघवें ॥ असे राज्य ॥४४॥

पापिया जाणोनि भूपती ॥ लोक पापेंचि आचरती ॥ देवपितर पूजा न घेती ॥ तेणें नरक रायासी ॥४५॥

ह्नणोनि सर्वही उपायें ॥ स्वधर्मनिष्ठ असावें रायें ॥ त्या धर्माचें मूळ पाहें ॥ ब्राह्मणाची ॥४६॥

रायाचेचि प्रमादें सीत ॥ उष्णवृष्ट्यादि विपरीत ॥ अतिवृष्टी उत्पात ॥ अरिष्टें होती ॥४७॥

कृत त्रेत द्वापार कली ॥ चारी युगें राजमूळीं ॥ जरी मिथ्याभिशाप घाली ॥ आणि दंडी राजा ॥४८॥

तरी तयांच्या अश्रुपातीं ॥ रायाचे पुत्रपौत्र जळती ॥ कृतपापाची निवृत्तीं ॥ नाही भोगेंविण ॥४९॥

रायाचे पुरुष दूत ॥ जरी अन्यायें वर्तती राज्यांत ॥ तरी तें बैसे पाप समस्त ॥ राजमस्तकीं ॥५०॥

जो यथार्थ मान देउनी ॥ मंत्रिया योजी मंत्रस्थानीं ॥ तो चिरकाळ भोगी नृपमणी ॥ सकळपृथ्वीतें ॥५१॥

सर्वप्रकारें धर्म राखावा ॥ धर्म इहलोकीं बरवा ॥ स्वदेशीं परदेशीं जाणावा ॥ येईल कामीं ॥५२॥

ऐसी हे राजनीती भली ॥ उतथ्यें मांधातया कथिली ॥ तेचि धर्मा तुज निरुपिली ॥ ह्नणे भीष्म ॥५३॥

जो रावो गुणवंतातें ॥ सांडोनि मुख्य प्रधानातें ॥ प्रशंसी हीना मृढातें ॥ तो व्यसनीं पडेची ॥५४॥

जो राजा अवधारीं ॥ ब्राह्मणार्थ युद्ध करी ॥ तो अनंतदक्षिणा निर्धारी ॥ यज्ञ तयाचा ॥५५॥

त्वचारोम जितुके तुटती ॥ तितुके श्रेष्ठलोक पावती ॥ जितुके रक्तबिंदु पडती ॥ तितुका पापक्षय ॥५६॥

रणमरणाहून परियेसीं ॥ धर्म नाहीं क्षत्रियासीं ॥ शय्यामरण तो विशेषीं ॥ तया अधर्म ॥५७॥

तंव धर्म ह्नणे भीष्माप्रती ॥ जे संग्रामी धारातीर्थी ॥ सन्मुख घाई प्राण त्यजिती ॥ ते पावती गती कवण ॥५८॥

मग भीष्म बोले प्रबुद्ध ॥ अगा धर्मा ऐकें सावध ॥ इंद्रा अंबरिषाचा संवाद ॥ इये अर्थी ॥५९॥

अंबरिषें आपुला प्रधान ॥ सुदेव नामें शक्रासमान ॥ आपणाहूनि उत्तम जाणोन ॥ पुसिलें इंद्राप्रती ॥६०॥

तंव इंद्र तयासि बोलिला ॥ सुदेवें पूर्वी युद्धयज्ञ भला ॥ साध्वर्यु यथोक्त केला ॥ सऋत्विज सघृत ॥६१॥

सपात्र आणि सदक्षिण ॥ तेणें पुण्यें मत्समान ॥ आणि उत्कृष्ट जाहला जाण ॥ तुजहूनियां ॥६२॥

अश्व अध्वर्यु ऋत्विज कुंजर ॥ वीरमांसें द्रव्यें समग्र ॥ आज्य तेंचि होय रुधिर ॥ ऐसा सांग रणयज्ञ ॥६३॥

ह्नणोनियां ऐशा रीतीं ॥ जे योद्धे संग्रामीं पडती ॥ त्यांचा शोक वीरें चित्तीं ॥ न करावा धीरें ॥६४॥

त्यातें सहस्त्रावधीं जाण ॥ अप्सरा वरिती येऊन ॥ नाहीं स्त्रान आशौच अन्न ॥ उदकादि क्रिया ॥६५॥

रणीं बाळक वृद्ध स्त्री ॥ मी तवदास ऐसी करुणा करी ॥ पळे दांतीं तृण धरी ॥ त्यातें क्षत्रियें न मारावें ॥६६॥

इंद्र ह्नणे मीही देख ॥ युद्धीं मारोनि नमुचीप्रमुख ॥ पावलों इंद्रपद सम्यक ॥ युद्धयज्ञेंची ॥६७॥

भीष्म ह्नणे धर्मरायासी ॥ ऐसें कथिलें अंबऋषीसी ॥ आणिक कथा परियेसीं ॥ एतदर्थी ॥६८॥

कोणे एके समयांतीं ॥ प्रतर्दन जनकचक्रवर्ती ॥ या दोहांचा निर्घातीं ॥ मांडला संग्राम ॥६९॥

जनकरायें तिये वेळे ॥ वीरांसि देवोनि दिव्य डोळे ॥ स्वर्गनर्क दाखविले ॥ उपदेशद्वारें ॥७०॥

पळे त्यासी ऐसे कठिण ॥ नरक होतील दारुण ॥ मेलिया प्राप्त सुलक्षण ॥ होय स्वर्गभोग ॥७१॥

मग ते धैर्य धरोनि झुंजले ॥ संग्रामीं जयातें पावले ॥ ह्नणोनि युद्धीं राहिजे भलें ॥ धैर्य धरोनी ॥७२॥

सुदिनमुहूर्त पाहिजे ॥ तद्दिनीं यात्राप्रयाण कीजे ॥ तरी विजयातें लाहिजे ॥ भर्वसेनी ॥७३॥

दशाधिप शताधिप ॥ मिळोनियां सहस्त्राधिप ॥ सर्दार वजीरां समीप ॥ विचार करावा ॥७४॥

अनेकवाद्यें वाजवून ॥ शंखदुंदुभी निशाण ॥ नानाविध शब्द करोन ॥ संग्राम कीजे ॥७५॥

विश्वासोनियां मारावें ॥ वैरियांतें पराभवावें ॥ परि निश्चित नसावें ॥ जाणत्यानें ॥७६॥

जैसा अग्नि ढोलरांत ॥ तैसा वैरी असतो जागृत ॥ सामात्य रायें निश्चित ॥ नसावें ह्नणोनी ॥७७॥

समयीं उपेक्षिलीया वैरी ॥ प्रयत्नें अपकार करी ॥ ह्नणोनि प्राप्तकाळांतरी ॥ करावा उपावो ॥७८॥

मंत्रतंत्र औषधें वोजें ॥ भेदादिक प्रकार कीजे ॥ मागुता अंकुर न उपजे ॥ करावें ऐसें ॥७९॥

बळशत्रूतें जाणावें ॥ तरी तया प्रणिपातावें ॥ सदा सावध असावे ॥ मायिकप्रपंच करोनी ॥८०॥

परि समय न टाळावा ॥ असाध्य वैरीही जिंकावा ॥ ब्रह्मदंड प्रयुंजावा ॥ सर्वोपायें ॥८१॥

मुख्यासि विचारा करावें ॥ निर्लोभनिःशक दान द्यावें ॥ अंतर्बाह्य सम असावें ॥ ऐसा क्षात्रधर्म ॥८२॥

हें ऐकोनि धर्म पुसे ॥ धर्म अनंतप्रकार असे ॥ तरी सर्वधर्मीत विशेषें ॥ सांगा उत्तम कोण ॥८३॥

मग ह्नणे गंगाकुमरु ॥ मातापिता तिसरा गुरु ॥ यांचिये सेवेहूनि थोरु ॥ दुजा धर्म नाहीं ॥८४॥

पिता तोचि गार्हपत्य ॥ माता दक्षिणाग्नि सत्य ॥ गुरु आहवनीय यथार्थ ॥ त्रेताग्निहोत्र ऐसें ॥८५॥

जो हें सेवील पुत्रवर्य ॥ तया देववेद लोकत्रय ॥ सेविल्याचें पुण्य होय ॥ पंडुकुमरा ॥८६॥

इहलोकपरलोकीचे ॥ सकळही मनोरथ त्याचे ॥ पूर्ण होताति गा साचे ॥ पावे सर्व चिंतित ॥८७॥

जो या धर्माचा अवधारीं ॥ स्वयें प्रतिपाळ न करी ॥ तयाहूनि दुजा संसारीं ॥ पापी नसे ॥८८॥

ऐसे प्रजादिक जाण ॥ सर्वपदार्थ संग्रहण ॥ राजधर्मीचें वर्तन ॥ संक्षेपोक्ती ॥ ॥८९॥

आतां यानंतरें अपूर्व ॥ धर्मा सांगेल भीष्मदेव ॥ तोचि कथान्वय सर्व ॥ संकलोनी ॥९०॥

जन्मेजयरायाप्रती ॥ वैशंपायन वेदमूर्ती ॥ सांगेल तें ऐकिजे श्रोतीं ॥ ह्नणे कवि मधुकर ॥९१॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ त्रयोदशस्तबक मनोहरु ॥ प्रजाधर्मप्रतिपाळप्रकारु ॥ चतुर्थाध्यायीं कथियेला ॥९२॥

॥ श्रीजगदीश्वरार्पणमस्तु ॥ ॥ ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP