नमोऽस्तु ते महायोगिन्, प्रपन्नमनुशाधि माम् ।
यथा त्वच्चरनाम्भोजे, रतिः स्यादनपायिनी ॥४०॥
न घडतें घडविसी आपण । नाथिलें दाविसी विंदान ।
जित्या मेल्या लावूनि लग्न । नांदविसी संपूर्ण निजमाया ॥१५॥
जे योगियांसी अतिदुस्तर । जिणें नाडिले स्त्रष्टा शंकर ।
ते माया तुझी किंकर । तूं परात्पर महायोगी ॥१६॥
त्या तुझ्या कृपेस्तव जाण । मी कृतकृत्य जाहलों आपण ।
न देखें भवभयादि दुःखभान । स्वानंदीं निमग्न सर्वदा ॥१७॥
दृश्य द्रष्टा दर्शन । नाहीं त्रिपुटी ना त्रिगुण ।
हारपलें मीतूंपण । स्वानंदपूर्ण निजबोधें ॥१८॥
निजबोधें स्वानंदपूर्ण । हेही बोल मायिक जाण ।
परादिवाचां पडिलें शून्य । यालागीं मौन वेदवादा ॥१९॥
कार्य कारन कर्तव्यता । मज उरली नाहीं सर्वथा ।
तरी कांहींएक श्रीकृष्णनाथा । तुज मी आतां मागेन ॥७२०॥
जेवीं कां बाळकाचा थाया । कळवळोनि पुरवी माया ।
तेवीं माझिया वचना यया । श्रीकृष्णराया अवधारीं ॥२१॥
हें अंतींचें माझें मागतेपण । देवें अवधारावें सावधान ।
वंदूनियां श्रीकृष्णचरण । अगम्य विंदान मागत ॥२२॥
मज थोर भ्रम होता चित्तीं । गोड असेल जीवन्मुक्ती ।
तेथ न देखें तुझी भक्ती । कोरडी मुक्ती मज न लगे ॥२३॥
सद्गुरुक्रुपावचनोक्तीं । शिष्य तत्काळ लाहे मुक्ती ।
ज्यांत सद्गुरुची नाहीं भक्ती । जळो ती मुक्ती मज न लगे ॥२४॥
यालागीं तुज शरण । मागुतेन मी आलों जाण ।
सायुज्याहीवरी पूर्ण । तुझें गुरुभजन मज देईं ॥२५॥
मागां बहुतीं केली भक्ती । म्हणसी त्यांसी म्यां दिधली मुक्ती ।
परी मुक्तीवरती भक्ती । नाहीं मजप्रती मागितली ॥२६॥
मागां जिंहीं जिंहीं केली भक्ती । त्यासीं त्वां ठकिलें देऊनि मुक्ती ।
तें ठकडेपण श्रीपती । न चले मजप्रती सर्वथा ॥२७॥
ज्यांची अहंकारशून्य वृत्ती । जाहले आत्माराम सहजगतीं ।
तेही अहेतुक भक्ती करिती । ऐशी स्वरुपस्थिती पैं तुझी ॥२८॥
(संमतश्लोक) -
आत्मारामाश्च मुनयो निर्ग्रन्था अप्युरुक्रमे ।
कुर्वन्त्यहैतुकीं भक्तिमित्थम्भूतगुणो हरिः ॥
तेथ त्यजोनियां तुझी गुरुभक्ती । मुक्ती मागणें हेचि भ्रान्ती ।
असो तुझी न लगे मुक्ती । माझी गुरुभक्ती मज देईं ॥२९॥
ज्यासी आकळली निजमुक्तता । म्हणसी त्यासी भक्ती नेदवे आतां ।
हे मजसी बोलों नको कथा । तुझी समर्थता मी जाणें ॥७३०॥
तूं न घडे तें घडविसी । न चळे तें चाळविसी ।
नव्हे तें तूं होय करिसी । नाहीं सामर्थ्याची मर्यादा ॥३१॥
अगम्य सामर्थ्याची गणना । बुडत्या तारुनि पाषाणां ।
त्यावरी तारिसी वानरसेना । सेतुबंधना श्रीरामा ॥३२॥
केवळ जे कां वनचर । पालेखाईर वानर ।
चारी मुक्ती त्यांच्या किंकर । त्यांसी सुरवर वंदिती स्वयें ॥३३॥
केवळ ज्या कां व्यभिचारिणी । शेखीं ज्या घुरटा गौळणी ।
मोक्ष लागे त्यांच्या चरणीं । ये ब्रह्मा लोटांगणीं चरणरजासी ॥३४॥
तूं परमात्मा परमेश्वर । हें नेणती गौळणी वानर ।
तरी तुझें त्यांसी भजनमात्र । फळलें साचार परब्रह्मत्वें ॥३५॥
ऐसें अगाध तुझें भजन । अगम्य भजनाचें महिमान ।
भक्तीअधीन तुझें देवपण । मा मोक्षासी कोण अधिकाई ॥३६॥
भक्तीच्या पोटीं जन्मली मुक्ती । वाढली मुक्ती भक्तीतें घाती ।
ऐसी जे कां मुक्ती मातृहंती । तिसी मी सर्वार्थीं नातळें ॥३७॥
फिटे मुक्तीचें दूषण । जेणें ते होय अतिपावन ।
तें मीं सांगेन विंदान । ऐक सावधान श्रीकृष्णा ॥३८॥
जोडल्याही मुक्तपण । मज द्यावें तुजें गुरुभजन ।
तेणें मुक्तीही होय पावन । म्हणोनि लोटांगण घातलें ॥३९॥
मस्तकीं धरिले श्रीचरण । उद्धव सर्वथा न सोडी जाण ।
तेणें टकच जाहला श्रीकृष्ण । त्यासी संपूर्ण तुष्टला ॥७४०॥
जाणोनि आपलें मुक्तपण । मी न सांडी तुझें निजभजन ।
ऐशी कृपा करीं पूर्ण । म्हणोनि श्रीचरण न सोडी ॥४१॥
मुक्तता मानल्या संपूर्ण । तैं राहों शके सद्गुरुभजन ।
हेंही बाधों न शके विघ्न । तैशी भक्ति निर्विघ्न मज सांग ॥४२॥
कोटिजन्में शिणतां जाण । म्हणसी नातुडे मुक्तपण ।
त्या मोक्षा नांव ठेविसी ’विघ्न’ । मूर्ख संपूर्ण मज म्हणसी ॥४३॥
जेणें सुटे तुझें सद्गुरुभजन । तें मी मानीं परम विघ्न ।
तुझे भक्तिवीण मुक्तपण । अलवणी मज जाण गोविंदा ॥४४॥
माझी न मोडे नित्यमुक्तता । अहेतुक चालवीं भक्तिपंथा ।
ऐसी कृपा करीं श्रीकृष्णनाथा । झणीं संकोचता मानिसी ॥४५॥
म्हणसी म्यां दिधली नित्यमुक्ती । ते माझी मजपाशीं सिद्ध होती ।
’दिधली’ म्हणणें हे मिथ्या वदंती । वाऊगी ख्याती दातृत्वाची ॥४६॥
माझी स्वतःसिद्ध नित्यमुक्तता । त्यावरी भक्ति मी मागें आतां ।
ते देशील तरी तूं साचार दाता । उदारता या नांव ॥४७॥
ते संतोषोनि भक्ति देतां । उल्हास न देखों तुझ्या चित्ता ।
थोर मांडली कृपणता । कृष्णनाथा मजलागीं ॥४८॥
जे सांडवी सद्गुरुभक्ती । आम्हां न लगे तुझिया जीवन्मुक्ती ।
मुक्ति म्हणणें हेही भ्रांती । ऐक श्रीपती सांगेन ॥४९॥
मुळीं मुख्यत्वें नाहीं बद्धता । तेथ कैंची काढिली मुक्तता ।
मिथ्या मुक्ति मी नातळे सर्वथा । माझी गुरुभक्तिता मज देईं ॥७५०॥
मागें ज्यांसी त्वां दिधली मुक्ति । ते ठकिले ठकिले याच रीतीं ।
तैसें चाळवूं नको श्रीपती । मोक्षावरील भक्ती मज देईं ॥५१॥
म्हणोनि घातलें लोटांगण । धांवोनि धरिले दोनी चरण ।
प्रेमें वोसंडला श्रीकृष्ण । उद्धवासी संपूर्ण तुष्टला ॥५२॥
मोक्षाहीवरील गुरुभक्ती । उद्धवें मागितली नाना युक्तीं ।
जे जे चालली उपपत्ती । तेणें सुखें श्रीपती सुखावला ॥५३॥
सुखें सुखावली श्रीकृष्णमूर्ती । डोलों लागला स्वानंदस्थितीं ।
तेणें संतोषें भक्तिमुक्ती । उद्धवाहातीं अर्पिली ॥५४॥
जगीं उद्धवाचें शुद्ध पुण्य । जगीं उद्धवचि धन्य धन्य ।
ज्यालागीं सर्वस्वें श्रीकृष्ण । मोक्षावरील गुरुभजन स्वानंदें देत ॥५५॥
गुरु ब्रह्म दोनी अभिन्न । हेंही सद्गुरु प्रबोधी पूर्ण ।
यालागीं मोक्षावरील गुरुभजन । नव्हे दूषण सच्छिष्या ॥५६॥
मागिलां निजभक्ताप्रती । स्वानंदें तुष्टला श्रीपती ।
तिहीं मागितली निजमुक्ती । त्यांसी हे स्थिती अतर्क्य ॥५७॥
उद्धवें थोर केली ख्याती । मुक्तीचे माथां वाइली भक्ती ।
अगम्य मागितली स्थिती । तेही श्रीपती अर्पित ॥५८॥
उद्धवा मुक्तीवरील जे भक्ती । ते मज अवतारांची अवतारशक्ती ।
येणें उत्पत्ति-स्थिति-प्रलय अंतीं । करुनि श्रीपती मी अलिप्त ॥५९॥
येणेंचि बळें मी तत्त्वतां । कर्में करुनि अकर्ता ।
भोग भोगोनि अभोक्ता । जाण सर्वथा येणेंचि योगें ॥७६०॥
हा योग न कळे ज्यासी । दुःखरुप संसार त्यासी ।
हा अखंड योग मजपाशीं । मीं संसारेंसीं सुखरुप ॥६१॥
हा योग सदाशिव जाणे । का म्यां जाणिजे नारायणें ।
इतरांचें जें जाणणें । तें अगम्यपणें रिघेना ॥६२॥
ऐसी श्रीकृष्ण सांगे गुह्य गोष्टी । ते स्थिति बाणली उद्धवाचे पोटीं ।
दोघां निजबोधें एकगांठी । भजनकसवटी कळों सरली ॥६३॥
मुक्तीसी भक्तीची हातवटी । ते उद्धवासी कळली गोष्टी ।
तो उल्हास न माये पोटीं । स्वानंदपुष्टीं कोंदला ॥६४॥
जेवीं बाळकाच्या थायाकारणें । माता लेववी निजभूषणें ।
तेवीं उद्धवालागीं श्रीकृष्णें । अवतारस्थिति देणें निश्चित ॥६५॥
मनाचें नाइकती कान । बुद्धीचें न देखती नयन ।
शेखीं गगनातेंही चोरुन । उद्धवासी श्रीकृष्ण निजस्थिति अर्पी ॥६६॥
जे ब्रह्मवेत्त्यांसी नकळे । जे वेदानुवादा नाकळे ।
ते स्थिति उद्धवासी गोपाळें । कृपाबळें अर्पिली ॥६७॥
पूर्वी श्रीकृष्णें पुसतां पहा हो । ’उद्धरलों’ म्हणे उद्धवो ।
आतां मागें भजनभावो । हा गूढाभिप्रावो हरि जाणे ॥६८॥
मुक्तीवरील मागतां भक्ती । श्रीकृष्णाची अवतारशक्ती ।
मायानियंतृत्वाची पूर्ण स्थिति । उद्धवाचे हातीं स्वयें आली ॥६९॥
जाणोनि मायेचें मिथ्यात्वपूर्ण । तिचें प्रेरण आणि आवरण ।
हें मायानियंतृत्वलक्षण । उद्धवासी श्रीकृष्ण स्वयें अर्पी ॥७७०॥
जसें बुद्धिबळाचे पोटीं । पूर्व कर्म नसतां गांठीं ।
राजा प्रधान पशु प्यादा उठी । निर्धारितां दृष्टीं काष्ठ एक ॥७१॥
एकचि काष्ठ दोंही भारीं । तेथ कोण कोणाचा वैरी ।
वैर नसतांही झुंजारी । मारामारी अचेतनां ॥७२॥
म्हणती हस्ती घोडा प्रधान मेला । तेथ काय त्यांचा प्राण गेला ।
प्यादा होता तो प्रधान जाहला । तो काय पावला गजान्तलक्ष्मी ॥७३॥
जीव नसतांही निर्धारीं । मारिलें म्हणती निजगजरीं ।
एका जीत एका हारी । तें ज्ञान सारीं नेणतीं ॥७४॥
सारीं निमाल्या पाठीं । कोण धर्मात्मा चढे वैकुंठीं ।
कोण पडे नरकसंकटीं । तेवीं बद्धमुक्तगोठी समूळ मिथ्या ॥७५॥
एवं बुद्धिबळाचिये परी । ज्याची निजदृष्टि संसारीं ।
तोचि अवतारांचा अवतारी । जाण तो निर्धारीं भगवंत ॥७६॥
समूळ मिथ्या जाणे वेदोक्ती । समूळ मिथ्या जाणे बंधमुक्ती ।
हें जाणोनि आचरे जो वेदविहितीं । तेचि निजभक्ती मुक्तीवरिल ॥७७॥
करुनि संसारनिवृत्ती । बहुत पावले नित्यमुक्ती ।
त्यांसि हे दुर्गमभक्ती । अतर्क्य स्थिती तर्केना ॥७८॥
ऐशी ज्यापाशीं माझी स्थिती । तोचि मोक्षावरील करी भक्ती ।
इतरांसी हे अतर्क्य गती । जाण निश्चितीं उद्धवा ॥७९॥
उद्धव पावला अगाध गती । त्यासी सर्वलोकोपकारार्थी ।
वांचवावया ब्रह्मशापाहातीं । उपाय श्रीपती स्वयें योजी ॥७८०॥
नारदासी ब्रह्मज्ञान । त्यासीही दक्षशापबंधन ।
एके ठायीं न राहे जाण । करी परिभ्रमण शापास्तव ॥८१॥
झालियाही ब्रह्मज्ञान । ब्रह्मशाप अतिदारुण ।
हें जाणोनियां श्रीकृष्ण । उद्धवा जाण दूरी दवडी ॥८२॥
उद्धव जन्मला यादववंशीं । यादव निमती ब्रह्मशापेंसीं ।
तेथ वांचवावया उद्धवासी । बदरिकाश्रमासी स्वयें धाडी ॥८३॥
ब्रह्मशापाचेनि आघातें । यादव निमती स्वगोत्रघातें ।
उद्धव वांचवावया तेथें । बदरिकाश्रमातें हरि प्रेरी ॥८४॥
उद्धवासी जें झालें ज्ञान । त्याहूनि बदरिकाश्रम पावन ।
हें सर्वथा न घडे जाण । ब्रह्मशापाभेण पळवीत ॥८५॥
उद्धवा ऐसें अनर्घ्य रत्न । ज्यासी बाणली स्थिति पूर्ण ।
त्यासी वांचवावया श्रीकृष्ण । पाठवी आपण बदरिकाश्रमा ॥८६॥