मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय एकोणतीसावा|
श्लोक २९ वा

एकनाथी भागवत - श्लोक २९ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


अप्युद्धव त्वया ब्रह्म, सखे समवधारितम् ।

अपि ते विगतो मोहः, शोकश्वासौ मनोभवः ॥२९॥

उद्धवा तुझें देखोनि प्रेम । गुह्य ज्ञान अतिउत्तम ।

तुज म्यां निरुपिलें परब्रह्म । साङग सुगम अतिशुद्ध ॥४७०॥

हें ज्ञानाचें सोलींव ज्ञान । हें वेदांचें विसावतें स्थान ।

हेचि अविद्येची बोळवण । समाधान जिवशिवां ॥७१॥

ऐसें हें जें गुह्यज्ञान । मनबुद्धिवाचेसी अगम्य जाण ।

तें म्यां तुज केलें निरुपण । श्रद्धा संपूर्ण देखोनि ॥७२॥

जेवीं सखा सख्याप्रती । आपुली वोपी निजसंपत्ती ।

तेवीं म्यां हे ब्रह्मस्थिती । तुझ्या हातीं वोपिली ॥७३॥

जैसें दिधलें श्रवणाच्या हातीं । तैसें प्रविष्ट जाहलें तुझिया चित्तीं ।

कीं माझारीं पडली कांहीं गुंती । विकल्पवस्ती विक्षेप ॥७४॥

म्यां निरुपिलें सार परम । तें तुज कळलें परब्रह्म ।

नसेल, तरी हाचि उपक्रम । पुढती सुगम सांगेन ॥७५॥

चैतन्य ठसावोनि चित्तीं । जेथ आकळिली ब्रह्मस्थिती ।

तेथ मोहममतेची वस्ती । समूळ निश्चितीं नसावी ॥७६॥

आकळलें ब्रह्मज्ञान । त्याची हेचि वोळखण ।

संकल्पविकल्पविंदान । पुढती जाण उपजेना ॥७७॥

उपजेना मीतूंपण । उपजेना ध्येय ध्याता ध्यान ।

नुपजे त्यासी कर्मठपण । ब्रह्म परिपूर्ण जाणितल्या ॥७८॥

जेणें जाणितलें ब्रह्मज्ञान । त्यासी बाधीना कर्मबंधन ।

कर्माचें जें कर्माचरण । तें जाण आपण मायिक ॥७९॥

जेवीं छाया चळे पुरुषाचेनी । परी तियेचा लोभ पुरुष न मानी ।

तेवीं काया चाळी ब्रह्मज्ञानी । देहाभिमानी तो नव्हे ॥४८०॥

जेवीं सूर्यापुढें आंधार । अर्ध क्षण न धरी धीर ।

तेवीं ब्रह्मज्ञानी कमादर । अणुमात्र उरेना ॥८१॥

कर्माचें जें कर्मबंधन । तो मनोजन्य संकल्प जाण ।

जेथें मनाचें मोडे मनपण । तेथें कर्माचरण निर्बीज ॥८२॥

वस्तु नित्य निर्विकल्प । तेथें नाहीं संकल्पविकल्प ।

हें परब्रह्माचें निजस्वरुप । हेंचि रुप स्वानुभवासी ॥८३॥

ऐसें ब्रह्म पावल्या स्वयमेवो । मी एक उद्धव होतों पहा हो ।

त्या उद्धवपणासी नाहीं ठावो । मा शोकमोहो तेथ कैंचा ॥८४॥

उद्धवपणाचिये वस्ती । शोकमोहांची उत्पत्ती ।

तें उद्धवपण नाठवे चित्तीं । जरी ब्रह्मप्राप्ति तुज जाहली ॥८५॥

ऐसें ऐकतां देवाचें वचन । उडालें उद्धवाचें उद्धवपण ।

जाहला स्वानंदीं निमग्न । बोलतेपण बुडालें ॥८६॥

पावतां आपुली निजात्मता । उडाली उद्धवत्वाची अवस्था ॥

बुडाली स्वदेह अहंता । निजनिमग्नता स्वानंदीं ॥८७॥

तेथें देवें पुशिला जो प्रश्न । त्याचें कोण दे प्रतिवचन ।

कृष्णेंसहित उद्धवपण । गिळोनि परिपूर्ण वस्तु जाहला ॥८८॥

देखोनि उद्धवाची अवस्था । हा ब्रह्म पावला निजात्मता ।

हें कळों सरलें श्रीकृष्णनाथा । हृदयस्था काय न कळे ॥८९॥

शिष्य साचार अनुभव लाहे । तेणें सद्गुरु सुखाचा मेरु होये ।

जेवीं तानयाचे धणीं माये । सुखावली राहे स्वानंदें ॥४९०॥

सेवक विभांडितां परचक्र । तेणें रायासी संतोष थोर ।

गुढी उभारुनि साचार । करी निजगजर स्वानंदें ॥९१॥

तानयाचे लळे पुरविणें । हे व्यालीची वेदना व्याली जाणे ।

कां शिष्यासी स्वानुभव देणें । हें स्वयें जाणे सद्गुरु ॥९२॥

निजपुत्रें लाधल्या निधान । पिता संतोषे आपण ।

तेवीं उद्धवाचेनि अनुभवें जाण । स्वयें श्रीकृष्ण संतोषे ॥९३॥

कृष्ण सुखें सुखरुप नित्यतां । तोही शिष्यानुभवें सर्वथा ।

लाहे सुखाची परमावस्था । हे गुरुगम्यता अगम्य ॥९४॥

शिष्यासी बोध करितां । गुरुसि नसती सुखावस्था ।

तरी उपदेशपरंपरता । नव्हती तत्त्वतां इये लोकीं ॥९५॥

गुरु सांगे जैं उबगलेसाठीं । तैं ते शिष्यासी बोधेना गोष्टी ।

मा निजानुभवाची भेटी । केवीं निजदृष्टीं देखेल ॥९६॥

जेवीं बाळासी लेणें लेववितां । तें नेणें परी सुखावे माता ।

तेवीं शिष्यासी अनुभव होतां । सुखावे तत्त्वतां सद्गुरुरावो ॥९७॥

तैसा उद्धवाचा ब्रह्मभावो । देखोनि सुखावे कृष्णदेवो ।

माझा उद्धव जाहला निःसंदेहो । यासी ब्रह्मानुभवो आकळिला ॥९८॥

उद्धवाची ब्रह्मनिष्ठता । अनुभवा आली निजात्मता ।

हें कळों सरलें श्रीकृष्णनाथा । परोपदेशार्था शिकवीत ॥९९॥

तूं पावल्या ब्रह्मज्ञान । तेथ शिष्योपदेशलक्षण ।

पात्रशुद्धीचें कारण । तेही वोळखण हरि सांगे ॥५००॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP