श्री परशुराम माहात्म्य - अध्याय १९

श्री परशुराम माहात्म्य वाचल्याने अपत्यसुख प्राप्त होते शिवाय शत्रूंपासून संरक्षण मिळते.


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीशिवमानसप्रियाय नमः ॥

जय वैकुंठपते श्रीरंगा सच्चिदानंदा कोमल अंगा मायातीता अभंगा लक्ष्मीरंगा तुज नमो ॥१॥

जलधी शयना जलजभूषणा जलज नयना जलदवर्णा जलधी तनया मनरंजना जलजांघ्रे तुज नमो ॥२॥

तूं निर्विकल्प निरंजन स्वयें जालासी भ्रुगूनंदन अपार करुनि रणकंदन दुष्टजन संहारिले ॥३॥

भीष्म सांगती कथार्थ बाणें शोषिला सरितानाथ पाळ पंजर मुक्तपंथ महादैत्य पाठविला ॥४॥

परी दिव्य गिरीमाजी पडला भूमंडळीं विस्तारला श्रीपुण्यक्षेत्र त्याकाळा प्रगटलें तयानें ॥५॥

जें समुद्र गर्भीचें स्थान अगाध महिमा असंपूर्ण सप्तद्वीपा वेगळें जाण परशुराम क्षेत्रतें ॥६॥

जें महात्म्य मुक्तिपुरीं वाराणसी पुण्यनगरी तेवीं पश्चम सागरातिरीं क्षेत्रदिव्य अनुपम ॥७॥

गोदावरी पश्चिम दिशे पुण्य गंगा वैतरणी असे स्नान करितां पापनासे भार्गवें स्वयें आणिली ॥८॥

धर्मराज करी प्रश्न कैसें वैतरणीचें जन्मस्थान ते कथा मुळीं हून मजकारणें सांगावी ॥९॥

गंगात्मज ह्मणे आतां सावध ऐके पांडूसुता पुण्यभूमी प्रगट होतां विचारी चित्तीं भार्गव ॥१०॥

पाळ पंजर दैत्य मथिला तयानें क्षेत्र भूमंडळा नारी नरांतें अवलीळा उद्धरावया कारणें ॥११॥

तरी वैतरणी सिंधू संगम येथें असावा निःसीम मनीं योजूनि परशुराम गेला त्वरें कैलासा ॥१२॥

पाहोनियां शिवस्थान मांडिलें तेथें आराधन मनुष्य भाव कल्पून मोहनार्थ असुराच्या ॥१३॥

पूर्ण काम लक्ष्मीपती अनंत ब्रह्मांडें ज्याचिया सती निर्लिप्त स्वतंत्र अद्वैत ह्मणती तया आराधन कोणाचें ॥१४॥

परी नमो शिवा शंकरा गंगाजटीं मुगुटधरा ॥ अर्ध नारी नटेश्‍वरा वैष्णवाग्रजा नमोस्तुते ॥१५॥

विश्‍वेश्वरा विरुपाक्षा सच्चिदानंदा कर्माध्यक्षा अविद्यातीता सर्वसाक्षा मोहकारी नमोस्तुते ॥१६॥

जय पंच वदना दशभूजा पिनाक पाणी वृषभध्वजा भालचंद्र गौरतेजा ॥ भूतराजा नमोस्तुते ॥१७॥

जय जया स्वर्ग निवाशिनी महागंगे तूं वैतरणी सर्वपाप प्रशमनी मोक्षदानी नमोस्तुते ॥१८॥

विष्णुपादोदकी गगनी ब्रह्मकमंडलू धारिणी मग ईश्‍वर जटा निवाशिनी सर्ववंदिनी नमोस्तुते ॥१९॥

तूं हिमाचळीं हेमवर्णी मंदहास्य मंदाकिनी इच्छित फळदायिनी दरिद्र भंजनी नमोस्तुते ॥२०॥

महापातकें दोष घोर आचरती जे नारीनर तात्काळ होय उद्धार स्नान मात्रें करुनियां ॥२१॥

एवं रेणुकेचा सुत तपश्चर्या आराधित मुखीं स्तुतीतें करित शिव आणि गंगेची ॥२२॥

आश्चिर्योनी विरंची नंदन संतोषोनि वदे वचन ह्मणें संतुष्टलों वरदान माग जेकां कल्पिलें ॥२३॥

राम वदे विनयवचनीं त्रेतद्वापार युगें दोन्हीं ॥ लोटतां कली मध्यें प्राणी ग्राहीक होती पापाचे ॥२४॥

तया कलियुगा माझारीं महापातकें वर्तती थोरी भ्रतार वंचूनिया नारी रत होती परपुरुषा ॥२५॥

द्वेष कल्पूनि मनांत पुत्र करिती पितृघात धर्म मार्ग अव्हेरित सन्मार्ग लोप करितीते ॥२६॥

माता पितया न मानीती स्त्रियेचें प्रीय अत्यंत करिती मद्यमां सरत होती न मानिती कोणी कोणा ॥२७॥

अव्हेरिती शास्त्रवचना आवडे तैसें वर्तती मना पापें आचरती नाना नित्य यातना भोगिती ॥२८॥

देवनिंदा पितृनिंदा वेदगुरु सिद्ध निंदा साधू सद्भक्ती कवी निंदा विष्णू निंदा वर्तेल॥२९॥

ब्राह्मण आचरती पाखांड धर्म आराध्य दैवत्य न जाणून अंध परंपरा पडती दारुण होईल अन्यथा वेदार्थ ॥३०॥

गोब्रह्म पितृहत्या अगम्यागमन गर्भहत्या यज्ञमिषें पशुहत्या स्त्रीहत्या सुरापानी ॥३१॥

स्त्रियेच्या कैवारें पुत्र आपुले पितयासीं करी वैर ह्मणती आमुचा दावेदार कासया जिवंत राहिला ॥३२॥

आपुली वस्तु पिता मागे त्यावरी नेत्र वटारी रागें ह्मणे तुझे वाचें काय लागे जायी वेगें येथूनियां ॥३३॥

पिता सांगे धर्मार्थ गोष्टी त्यावरी फिरवी क्रोधदृष्टी श्‍वशुराच्या अपवित्र गोष्टी पाहतां मनीं संतोषे ॥३४॥

पिता असतां न बोले वचन मेल्या घाली संतर्पण करुनि स्वादिष्ट पक्वान्नं अप्त सोयिरे पाचारी ॥३५॥

ऐसे पुत्र जे कां दुर्जन कदां न पाहावें तयाचें वदन यद्यपी जाहला स्पर्श जाण सचैल स्नान करावें ॥३६॥

एवं नाना पापें आचरती ते नर दरिद्री नरकीं पडती त्यांतें पावन व्हावया क्षितीं वैतरणी द्यावी दयाळा ॥३७॥

मी ब्राह्मण तपो निधी दान देई वैतरणी नदी पापें हरती जे त्रिशुद्धी उद्धार करिती जगाचा ॥३८॥

ऐसें वचन ऐकता कर्पूरगौर ह्मणे अचिंत्य शक्ती श्रीधर पाताळीं असती तीर्थवर तेथें तीं यावाया दुर्घट पैं ॥३९॥

सरस्वती गंगा यमुना गुप्त वाहती पाताळ भुवना ऐकतां उगमा लागीं जाणा संधान केलें भार्गवें ॥४०॥

अद्भुत वीर भार्गव सगुण धनुष्या योजिला प्रंचड बाण ब्रह्म कटाह तात्काळ भेदून तेत्रय प्रवाह काढिले ॥४१॥

तिन्हीं उगम संगमानीं एकत्र होऊनि वाहती तिन्ही यालागी महापुराणीं महात्म्य असे ॥४२॥

परम पदातें जावया ही वैतरणी असे मर्त्या पृथ्वीमाजी धर्मराया ह्मणोनि वैतरणी बोलिजे ॥४३॥

या त्रिगंगा त्रिशक्ती गंगा यमुना सरस्वती परशुराम क्षेत्रीं वाहती प्राणी उद्धरती स्नान मात्रें ॥४४॥

वैतरणी गंगा महा अद्भुत तेथें असे शिळातीर्थ अगम्या गम्य पाप हरत मोक्ष पावती पितृसह ॥४५॥

जन्मा आलियाचे स्वार्थ पुत्र होय उत्तिर्णार्थ जो सामवारीं श्राद्ध करीत पिंड देत पितृगणा ॥४६॥

वैतरणी तटीं श्राद्ध करी त्याचे पितृ सुरेश्‍वरीं विमानीं होऊनि निर्धारी स्वर्गीं जाती पुण्यवंत ॥४७॥

या तटाकीं स्नान करुन भारत भागवत पुराण आदि काव्य रामायण भार्गव चरित्र दिव्य येथें ॥४८॥

जे पठण श्रवण नियमें सकाम अथवा निष्कामें त्याचें पुण्य अनंत जाणे प्राप्त होय निःसंशयें ॥४९॥

द्वादशी व्यतिपात वैधृती देवालयीं शनी रात्रीं सर्वकाळीं जगत्पती भक्तिभावें आराधावे ॥५०॥

सेवी गौतमीसी हस्तीं प्रयागीं माघ स्नान समस्तीं तें फळ आहे अत्यंती वैतरणी स्नानमात्रें ॥५१॥

कपिला षष्ठी अर्धोदय जाण महोदय गज छायादि ग्रहण केलें सहस्त्र गोदान तें पुण्य वैतरणीये ॥५२॥

कीं पृथ्वी यानि तीर्थानी स्वर्ग पाताळ भुवनीं स्नान करिती वैतरणी इतुकें पुण्य प्राप्त होय ॥५३॥

कीं मखायुत गोयुत चांद्रायण त्रयशत वैतरणी फळ पावत स्नानमात्रें करुनियां ॥५४॥

कीं मथुरा आणि द्वारावती अयोध्या वाराणसी कांती अवंतिका मायापुरी सप्ती करितां मोक्षफळ पावतसे ॥५५॥

कीं द्विज राज राज्य करीत क्षेत्र उडु राजपीठ प्रख्यात तयाचें पुण्य अपरिमीत तेंही फळ येथें असे ॥५६॥

इतुके पुण्याची प्राप्ती अमावास्या ग्रहण सोमवती वैतरणीचें फळ पावती स्नान दानें करुनियां ॥५७॥

चालूनि आपुले चरणीं जो यात्रा करी वैतरणी तदी कोट गोदानी दान दिधलें ब्राह्मणा ॥५८॥

सुवर्ण युक्त गोपीचंदन दानाचें जें महापुण्य तें येथें होय अगण्य वैतरणीत टाकीं ॥५९॥

नारी नरा ऐशा रिती अंतीं विमानीं प्राप्ती दुःख दारिद्र विनश्यंती मुक्त होती संसारा ॥६०॥

तृत्पी होय पितृगणा नराप्राप्ती देवांगना आपुले जवळी ईश जाणा ठाव देत तयातें ॥६१॥

करुनि वैतरणी स्नान श्री एकवीरेचें घ्यावें दर्शन तेथें करावें पितृतर्पण ते नर धन्य त्रिजगतीं ॥६२॥

सर्व तीर्थें अवधारी ते एक वीरा परमेश्‍वरी नारी नर दर्शन करी न येती पुनः गर्भवासा ॥६३॥

अश्‍वमेध सहस्त्रानि मेरु तुल्य हेम दानीं त्यांहूनि अधिक जननी दर्शनाचें महात्म्य ॥६४॥

मीही राहें वैतरणी तटी ॥ भक्तांच्या दर्शनासाठीं जे ध्याती त्‍हृदय पुढीं त्यांसी प्रत्यक्ष मी ॥६५॥

ऐसें वैतरणी महात्म्य उत्पत्ती वाचिती जे सप्रेम भक्ती तयां सर्व भोग मुक्ती पाविजे मत्प्रसादें ॥६६॥

सूत ह्मणती शौनकास धर्मराव पुसे भीष्मास तैसें सांगतों तुह्मास ऐकचित्तें ऐकिजे ॥६७॥

स्वस्तिश्री परशुरामविजय कल्पतरु वर्णितां महात्म्य अपारु ऐकतां निःपाप होती नरु एकुणिसावा अध्याय गोड हा ॥१९॥श्रीराधा दामोदरार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 23, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP