श्री परशुराम माहात्म्य - अध्याय ११

श्री परशुराम माहात्म्य वाचल्याने अपत्यसुख प्राप्त होते शिवाय शत्रूंपासून संरक्षण मिळते.


जय जया विष्णु परमा आवतार धारी परशुरामा तदंतरीं देव अपुले कामा अवमाऽग्यंतरी ध्याती ॥१॥

अग्न्यंतरी परशुराम अवलोकिती पूर्ण काम माझा कृपाळू पुरुषोत्तम नमोन मोतयासीं ॥२॥

शौनक ह्मणती कथामृता श्रोत्यांसी न होय तृप्तता सविस्तर सांगे हे सूता आणीक काय चरित्र असे ॥३॥

ऐकोनी सूत ऋषीप्रत सांगती तें चरित्रांमृत अत्यादरें स्वस्थचित्त करोनी ऐकावें ॥४॥

मुक्ति पुरी अयोध्येंत राजा असे सत्यव्रत तयाचें नाम दशरथ अति प्रबळ दिग्विजयी ॥५॥

त्याचे चार पुत्र प्रख्यात रामलक्ष्मण शत्रुघ्न भरत श्रीराम ब्रह्म साक्षात रघुकुळीं प्रगटले ॥६॥

मेघश्याम अतिसुंदर आजान बाहू सुकुमार दर्शनीय अंघ्नी मनोहर ॥ जैसा सूर्य उदयींचा ॥७॥

लज्जित जालासे मदन श्रीराम मूर्ती पाहून लक्ष्मी अति मोहायमान अपूर्व ह्मणे हेंचि रुप ॥८॥

ह्मणोनि प्रगटली जनक गृहासीं श्रीराम चिंतन करी मानसीं ऐसी कन्या पाहोनि विवाहासी स्वयंवर मांडला ॥९॥

नाना देशींचे ते राजे । येवोनी सभा विराजे धनुष्यपण देखोनि जे नृप निराश बैसती ॥१०॥

धनुष्य मांडिलें सभा भीतरीं सहस्त्र घंटा लाविल्यावरी पूर्वीं ठेविता जाला त्रिपुरारी जड असे तें अत्यंत ॥११॥

शतावधी ते मल्लांनीं सभेसी ठेविलें आणोनी बाण लावावया उचलोनीं कोणी नसे समर्थ ॥१२॥

येवोनि तेथें श्रीराम दाशरथी पूर्ण काम त्याणीं धरितां जालें दुभग्न नादित जाल्या दशदिशा ॥१३॥

ते काळीं आनंद सकळां गज शुंडींची ती माळा पडली दाशरथी रामाचे गळां तेव्हां वाद्य घोष अपार ॥१४॥

श्रीराम सुमुहुर्त मंगल करिते जाले लोक अखिल येवोनि विवाह विधी सकळ दशरथानी केला ॥१५॥

आंदणें घेवोनि दशरथ सहित श्रीराम सीतानाथ निघाले सहस्त्रावधी रथ वाद्यघोषें अयोध्येसी ॥१६॥

मार्गी बोले दशरथ पुत्र होऊनी मनोरथ पूर्ण करिता जाला रमानाथ तस्मात्‌ भक्त वत्सल एकहरी ॥१७॥

इतुकें चिंतीते अवसरीं मार्गीं आले अरिष्टापरी दशरथ जाला थरारी ह्मणे प्रलयानी उद्भवला कीं ॥१८॥

दशदिशीं उठल्या वावटळी क्षत्रिय सैन्यीं पळापळी ह्मणती भार्गवाग्नी अनंत बळी निर्बीज करिती क्षत्रियांचें ॥१९॥

आले परशुराम ह्मणतो मूर्छना आली दशरथा हस्त ठेवी आपुले माथां दैव आमुचें ह्मणे ॥२०॥

रघुवीर रामपुढें येऊन सकळांसी देती आश्‍वासन पित्यासी करुनी वंदन अभय आपणा ह्मणतसे ॥२१॥

आपुले पुत्राची अमृतवाणी मेघ गंभीर ती श्रवणीं श्रवण करोनी धन्यमनीं स्वस्थ चित्त जाहला ॥२२॥

परशुराम जामदग्नी क्रोधें बोलती दणदणी तेणें कंपायमान जाली क्षोणी रसातळीं जाऊं पाहे ॥२३॥

अरे माझें असे रामनाम गृहिता झालासी तूं कोण तरी द्यावें द्वंद्वयोधन माझीया सन्मुखीं ॥२४॥

रघुकुळ वीरा क्षत्रियवरा मी दुष्ट क्षत्रियांत करवरा माझ्या धनुषीं लावावें शरा तरी देईन जीवदान ॥२५॥

जनक गृहीं जीर्ण धनुष मोडोनी मिरवितां पौरुष तेणेंचि वर्णिती बहुभाष काय अश्चर्य असे ॥२६॥

हें अनुपम पौरुष लक्षण ऐसें कोठें न देखिलें जाण तें तूंचि करशी निर्गुण परंतु भिक्षुक वर्णिती ॥२७॥

अद्भुत वैष्णव हे शरासन आमुचें करावें ग्रहण एवं बोलतो रघुनंदन घेते जाले तत्क्षणीं ॥२८॥

घेतांचि परशुराम धनुष्य तटस्थ जाहले भार्गव सशिष्य अश्चर्य वाटलें सैन्यास राजा दशरथ आनंदला ॥२९॥

सूत ह्मणे शौनकास अवतारत्वें श्रिनिवास ॥ आपुले ठायीं भेदास दाखवूनी मोह करीतसे ॥३०॥

अद्वैत एक हरी जेथें प्रगटले दुष्टारी तेथें ह्मणती अवतारी हे लोक सकळ ॥३१॥

हयग्रीव परशुराम रामादी त्रीयुगीं जे अवतरले अनादी तेथें छेद हरन शोक मोहादी हे सर्व दैत्य मोहन जाणावें ॥३२॥

ज्ञानामध्यें अज्ञानांत दोन स्थिती ही जीवांत जे ईश चरण जाणत ती ज्ञानाची स्थिती ॥३३॥

तदन्य असे अज्ञान स्थिती मध्यम तया मनुष्य ह्मणती सर्वज्ञ सर्वोत्तम एक लक्ष्मीपती नित्यानंद ईश्‍वर ॥३४॥

आतां श्रीशाची करणी त्याचे कृपे वांचोनि कोणी काय जाणती हे प्राणी अज्ञान सुखात्मक ॥३५॥

असो श्रीभार्गव राममुनी आपण आपल्यासी नमोनी पावले आनंदाश्रम वनीं आवतार अदृश्य ठेविला ॥३६॥

तें अवलोकूनी लोक ह्मणत आपुले दाशरथी रामाप्रत भार्गव वीर नमीत अंतक केवळ क्षत्रियांचा ॥३७॥

श्री सीताराम जय ह्मणूनी आनंदित जाली अवनी हर्षे अत्यंत दशरथ सैन्यीं वाद्यें वाजवूनी गृहीं आले ॥३८॥

नारदादी श्रीराम स्तवन देवही प्रार्थिती चरणीं लागून रावणादिकांचें करुनी नाशन देव ब्राह्मण रक्षावे ॥३९॥

गोब्राह्मण कैवारी अवतरले दशरथा घरीं पितराज्ञे तें सत्य करी वारी पापदुःख सर्वांचें ॥४०॥

ब्रह्मण्य देवा श्रीरामा देवदेवा पूर्ण कामा निरती शयानंद धामा चैतन्यघन स्वयंज्योती ॥४१॥

पूर्वीं मत्सादि वपू करुन दर्शन दिधलें भक्तांलागून तो तूं महेंद्र पर्वतीं राहून येथें ही प्रगटलासी ॥४२॥

तेव्हां तूं कोठें प्रगट होशील न जाणों अह्मीं किंचिज्ञ शील ऐसें जें अखंड ज्ञानानंद शील ॥ तुह्मांसीं प्रणाम असो ॥४३॥

हांस्य करोनी श्रीराम दिग्विजय करिते जाले आपण रावणादि दस्यु वधून विभीषणादि रक्षिले ॥४४॥

हनुमंतासीं दिधलें वरदान जो युवराज मुख्यप्राण आवतारुनी तोषविले श्रीराम सीतापती ॥४५॥

जेव्हां बैसले राज्य सिंहासनीं तेव्हां संतुष्ट अत्यंत क्षोणी पतीसहीत जैसी तरुणी तेवीं त्रिभुवनीं मंगल ॥४६॥

अयोध्या नाम अद्भुतनगरी मध्यें रत्‍नमय सभाभीतरीं दिव्य सिंहासनावरी राजाधिराज शोभती ॥४७॥

पट्टाभिषिक्त श्रीराम वामांगीं जानकीचें ध्यान व्यजन घेवोनी भरतशत्रुघ्न सेवन करिती भक्तिभावें ॥४८॥

लक्ष्मण कंबर बांधून पृष्ठी घेऊनि धनुष्य तूण चवरीवारी कौशल्यें करुन पुढें हनुमंत हस्त जोडोनी उभा ॥४९॥

बिभीषण आणि अंगद श्‍वेत छत्रें धरोनि आनंद पुढें वसिष्ट पुराण संवाद अत्यादरें करिताती ॥५०॥

वाल्मिक नारद तुंबर सनकादिक शंकर रामचरणीं होऊनि तत्पर स्तविती क्षणक्षणीं ॥५१॥

येऊनी तुच्छ करुनी स्वर्ग गंधर्वगाती अपूर्व राग दिव्य अप्सरा अतिवेग नाचती थैथया ॥५२॥

ज्या श्रीराम राज्यांत साधू मोक्ष सुद्धां न इच्छित सर्व लोकांचे मनोरथ पूर्ण होती सर्वदां ॥५३॥

सहस्त्रावधी भालदार नदर करावी दीनावर ऐसी गर्जना चोपदार वारंवार करिताती ॥५४॥

श्रीसीताराम भूपती बैसले वरद सिंहासनाप्रती तेथें ऋषी येवोनी स्तविती वंदिती अत्यादरें ॥५५॥

हे दशरथ तनया देवदेवा विश्‍वकाया अनंत शक्ती नित्य विजया प्रकृतीशा अनादी ॥५६॥

सत्वतनू शुत्धसत्वा विश्‍वपाळका वासुदेवा निरुपाधी नित्याभिनवा परमात्मा चिद्धन तूं ॥५७॥

रज तमादिक गुण तुझेपासूनी उत्पन्न तद भीमानी ब्रह्मरुद्राविष्ट होऊन उद्भवादि करशी ॥५८॥

इंद्र अग्नी यम वरुण निऋती वायु सोमेशान येथें आविष्ट होऊन सर्व करिता तूंचि एक ॥५९॥

ब्रह्मादिकांचे प्रलयीं एक तुह्मीं ते समयीं राहतां चिदानंदमयीं प्रकृती पुरुष सप्रेम ॥६०॥

ते तुह्मीं नारायण नानारुपें अवतीर्ण होऊनी करितां स्वभक्त रक्षण एवं सीतापते नमो तुज ॥६१॥

अखिल स्तविती श्रीरामास ऋषी सांगती इतिहास ऐकोनि हांसती त्दृषीकेश अष्टैश्‍वर्यें राज्य करिती ॥६२॥

एवं श्रीराम चतुर्दश भुवनास त्रयोदश सहस्त्र वर्षास राज्य केलें पृथ्वीस स्वकीर्ती विस्तारिंली ॥६३॥

रामराज्याचा महिमा तया नसे अन्य उपमा जेथें सर्व लोक पूर्ण कामा वैकुंठ पद पावले ॥६४॥

हें चरित्र ब्रह्मदेवानीं सांगीतलें ऋषीं लागोनी तें वाल्मीकासी नारदानीं सारांश कथियेला ॥६५॥

तें वाल्मीकानी सविस्तर कविलें गायत्री अक्षरावर चतुर्विशती हजार यथार्थ अमृतापरी ॥६६॥

रोमहर्षणीं शौनकास अमृता सारिखे कथेस कर्णद्वारें प्राशनास देती सज्जनांसी ॥६७॥

श्रीपरशुराम अवतार घेवोनि केलें कर्म अपार भक्तांसि दिधले इच्छित वर अद्यापीहि ते देती ॥६८॥

देव द्विज मनुष्योत्तम सेविती जे विद्याकाम प्रत्यक्ष गुरु परशुराम महेंद्र पर्वतीं ॥६९॥

अपार विद्या तयासी प्राप्त होतील सतूछिष्यासी सौभाग्य धन पुत्र स्त्रियांसी सेवितां शीघ्र पावेल ॥७०॥

पिता माता गुरु बंधू आप्त सोयरे मित्र साधू आमुचा सर्व हाचि शोधू मृत्यू सोडविता एक हरी ॥७१॥

लक्ष्मी सारिखी सुंदरी जाली पायांची किंकरी शंकरादि लोटांगण शीरीं घालिती पदीं ईश्‍वराच्या ॥७२॥

जयाचे चरणापासोनि गंगा त्रिलोकींचे करी पापभंगा अभीष्टपावेस्नान संगा ईश महात्म्य ऐसें असे ॥७३॥

स्वस्ती श्रीपरशुराम विजय कल्पतरु वर्णितां महात्म्य अपारु ऐकतां निःपाप होती नरु एकादशोध्याय गोड हा ॥११॥

श्रीक्षत्रियांतक परशुरामार्पणमस्तु॥ इति प्रथमोंकः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 23, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP