तें ब्रह्म होय केव्हा । मज सांग ह्या जीवाचें ।
जावुनी देहबुद्धी । कधी स्वानंदांत नाचे ॥धृ०॥
साधने करुनी शिणलें । परी आनंद तो न मिळे ।
पाहिजे सद्गुरुनाथा । बळ त्या तुझ्या कृपेचें । तें ब्रह्म० ॥१॥
देवुनी सत्य ज्ञान । जाळावें कर्म याचें ।
औदार्य सद्गुरु हें । दासास देणें तुमचें । तें ब्रह्म० ॥२॥
सागरीं गंगा मिळतां । सागर रुप नदीचें ।
तैसी ही जीववृत्ती । पदीं लीन झाली तुमचे ।तें ब्रह्म० ॥३॥
स्वानंद साम्राज्यीं । बसवा हो बाळ तुमचें ।
सद्गुरु माऊली ही । कौतुक करी वीराचें । तें ब्रह्म० ॥४॥