कोठे वैकुंठ कोठे गजपतिस बळे
नक्र वोढी तटाकी ॥
तेथे जो लागवेगेकरूनि पवनसा
धावला, पावला की ॥
तो स्वामी स्मर्तृ गामी निरवधिकरुना-
सिंधु बंधू प्रणामी ॥
लक्ष्मी वत्से ललामी स्मरुनि निजमना-
मानि गायिन नामी ॥१॥
कैसा तोयचरे गजेंद्र धरिला
तो ही तया माधवे ॥
कैसा सोडविला करुनि करुना
भक्तैकह्रद्बांधवे ॥
हे आम्ही परिसू परीक्षदवनी-
नाथे असे बोलता ॥
जाला श्रीशुक बोलता परिसता
राजा सुखे डोलता ॥२॥
उंच योजनशते शत साजे
लांबरूंदहि तसाच विराजे ॥
तो त्रिकूटशिखरी वरि तुंगे
स्वर्णलोहरजतात्मक श्रृंगे ॥३॥
श्रृंगभिधानक विशाळ धरून भाला ।
तेणेकरूनि गिरि तो गिरितो नभाला ॥
जोपा झरे- जल-तृणे करितो मृगांची ।
जो पाझरे निजतटाकटांत सांची ॥४॥
जयावरी होय निगा नगांची ।
सदैव विश्रांति खगामृगांची ॥
जागे जयाचे उदरी दरींचे ।
विलास तेथे सुरसुंदरीचे ॥५॥
नदीनद तयावरी सजल जे तयांचे तटी ।
पटीरनिकटी वटी जटिल तांदलांचे पुटी ॥
कटी धरुन गोमटी हरिवधूटिका लेकरे ।
फले भरुनि तन्मुए करिति सन्मुखे ही करे ॥६॥
उद्यान येक ऋतुपाख्य तया त्रिकुटी ।
केले स्वतंत्र वरुणे निजकेलिसाठी ॥
नाना फुली विकसता सकळांस भासे ।
हे या मिसेकरुनि चैत्ररथास हांसे ॥७॥
चिगुरले फुलले फळले तसे ।
तरुच भूषण ते वन लेतसे ॥
सकळिका कळिकांस विकासवी ।
मधु सुवासनिवास विकासवी ॥८॥
लतेतळी रूंद निरूंद कालवे ।
गळोनि तेथे मकरंद कालवे ॥
परागही सांद्र तयांत रंगती ।
फुलांसवे भृंगतती तरंगती ॥९॥
रुचति मधुर जैसी चाम्गली तूपकेले ।
सुरुचिर रुचितैसी लागली तूपकेळे ॥
शिवति गगन तैशा नारिकेळी रसाळे ।
सहित फळकदंबे सांद्र केळी रसाळे ॥१०॥
उपरि सकंटक साचे परंतु सांचे जयांत सुरसांचे ।
घोस तसे फणसांचे षण्मासांचे तसेच वरिसांचे ॥११॥
विख्यात नामे लवलीलता जे ।
फलावलीने लवली विराजे ॥
चंद्रोदयी घोस तिचे फुलांचे ।
होती विसावे अलिनीकुलांचे ॥१२॥
दालिंबे स्वादु लिंबे कुरबकबदरी-
वृक्ष सीताफळांचे ।
जेथे, जंबूफळांचे समुदय पिकले
घोसही श्रीफळांचे ॥
वेळाचे वेल वाचे न वदवति जसे
ते तसे वेळवांचे ।
शाखी वायू जयांचे विवर रव करी
जोड जे पावयांचे ॥१३॥
तया वनी एक तटाक तोये
तुडुंबले तामरसानपाये ॥
निरंतरामंद मरंद वाहे
तपांतही यास्तव रिक्त नोहे ॥१४॥
वीतां मरंद उदरंभर बंभरांचे
जे होय मंदिरहि सुंदर इंदिरेचे ॥
ते पद्म जेथिल सहस्त्र दला धरीते ।
प्रत्यक्ष सूर्य-किरणास विसाववीते ॥१५॥
तया वनसरोवरी उमलतां सरोजे रजे ।
मिळोनि मिरवे दळी सलिल मौक्तिकाकार जे ॥
तयास सम आणिके कवण माणिके मोकळी ।
असोत जरि पोवळी दिसति कोवळी कोवळी ॥१६॥
मधुपांची खिल्लारे सरोवरामाजि कुमुदकल्हारे ।
इंदुविकासविलासे होती सकळा समान सोल्लासे ॥१७॥
अमृतही पयही म्हणवीतसे ।
मधुर सारसते जल गातसे ॥
मधुर सारस यास्तव गातसे ।
उभय होय तसी रुचि वीतसे ॥१८॥
राजहंसा तया तोयी राजहंस विसावती ।
चक्रे ही चक्रवाकांची चक्राकार विराजती ॥१९॥
ऐसे तटाक वरुणोपवनांत जेथे ।
पूर्वोक्त पर्वतवनस्थ गजेंद्र तेथे ॥
येतो कुटूंबसमवेत तृषार्त जाला ।
मार्तंडचंडकिरणी अति तप्त केला ॥२०॥
सखे मामे भाचे चुलतपुतणे आणि चुलते ।
सखेही सांगाते सळमिसळ जाले सकळ ते ॥
स्त्रियाही जावांयी तनुज निज सायीत दडती ।
सतीचे बोलावे कळतिल गजेंद्रास पुडती ॥२१॥
जो काननी विचरला चरला तृणाते ।
धुंडीतसे तृषित चिल्लर थिल्लराते ॥
तो श्रीगजेंद्र जललोभ मनी धरोनि ।
दानांबुपान करवी मधुपांकरोनी ॥२२॥
फिरत फिरत ऐसा येत होता पुढारी ।
त्व वन वरुणाचे लक्ष जाले निडारी ॥
त्वरित शिरुनि तेथे उंच वाहेस वाहे ।
तृषित गज तटाकी तुंबळे अंबु पाहे ॥२३॥
तटाकाचे तोयी हळुच उतराया चतुर तो ।
पुढारी दो पायी तनुभर उपायी उतरतो ॥
जलाते आरंभी स्वकरविवरामाजि भरितो ।
मुखापासी नेतो गजवर पितो तै वरपतो ॥२४॥
धाला जलेकरुनि सिंपितसे कपोळी ।
दानोदकावरिल भृंगकुळे उडाली ॥
आले सर्व निजकुलोद्भव ते तिहीशी ।
क्रीडा करू उतरला गज निम्न देशी ॥२५॥
वोढी सनाळ कमलांस तटी झुगारी ।
हस्तींद्र शैवललतेस उरे विदारी ॥
माथां निमग्न करितां उदकी उदेले ।
दानांबुतैलज तवंग सवंग जाले ॥२६॥
ऐसा करी जलविहार करी तटाकी ।
बाहेर सत्वर मदांध निघेच ना की ॥
नक्रे तया अवचितेंचि धरोनि पायी ।
आकर्षिले करुनि शक्ति अगाध तोयी ॥२७॥
गजबजोनि घनध्वनिभैरवे ।
गरजला गजराज घनारवे ॥
निजबले पद वोढुनि झाडि तो ।
प्रबळ नक्र मिठीस न सोडी तो ॥२८॥
जे ग्रस्त ते पद सुटू गज युक्ति दावी ।
नक्रावरी पद दुजे उचलोनि रोवी ॥
तै कटकौघ रुपतांच तळांतरंगी ।
माथा करी चपळ तोयतरंगसंगी ॥२९॥
सोंडेने सुसरीस वोढुनि जळा-
बाहेर काढू तटी ॥
पाषाणावरि आपटूनि रगडू
पाहे धरी सेपुटी ॥
तेथे कंटक टोंचले सिरकले
पानीय नासापुटी ॥
श्वासोच्छवास न होयसा गवसला
हस्ती तशा संकटी ॥३०॥
गजेंद्राचे बंधू कवळनि गजेंद्रा निजकरी ।
कडे काढू वोढू सकळ सिणलेही बहुपरी ॥
तया नाटोपेसे करुनि सुसरीने बळतसे ।
दिले झोले नेला गजवर जळी जेविं न दिसे ॥३१॥
कांहीसा उफळे जळी गज बळे
काही तळा लागतो ॥
हा बाहेर निघोनि येइल असा
लागेचना लाग तो ॥
वर्षांची शतके दहा ढकलली
तीरम्थ होते करी ॥
जे ते ही सुसरीस तो निरखिता
गेले क्षणाभीतरी ॥३२॥
विचारी तै हस्ती दृढ मज जयांचे भरवसे ।
तसेही गेले की विषम समयी सोडुनि कसे? ॥
असो आपदबंधू यदुपति कृपेचा जलनिधि ।
स्मरू बाहू, पाहू धणि वरि उभा राहिल कधी ॥३३॥
परविदारविलासविशारदे ।
क्रकचदारुण नक्र तशा रदे ॥
चगळीतो गिळितो घन वेदना ।
न वदवे मज ये मधुसूदना ॥३४॥
श्रुतिपुटी नयनी नयनांतरी ।
मज करी जल हे भरले तरी ॥
भरतसे वरिचेवरी नावरे ।
जलचरे धरिले हरि धांव रे ॥३५॥
पुच्छकंटककठोरसुरीने ।
घोर धाय रचिले सुसरीने ॥
तेवि तीसही करी करवाळी ।
श्रीहरी मज करी कुरवाळी ॥३६॥
वोणवा करुनि घांस गिळीसा ।
वोणवा गिळीसि गोपविलासा ॥
जो मदीयविपदग्नि उभा रे ।
तोतसा गिळी तसा न उभारे ॥३७॥
ज्यांत काळिय विषौघ उदेले ।
तोय ते पिउनि गोप निजेले ॥
ते हरी तव कृपारस सेखी ।
वाचले त्रिजग ही परिसे की ॥३८॥
नाच काळियफणांवरि टांचे ।
की जसान मणि ते पिल टोंचे ॥
तद्वधू तुज असे विनवीसे ।
नाचलास यदुराज विलासे ॥३९॥
माधवा मृदुरवे भरलीने ।
मोहिले जग तुवा मुरलीने ॥
ते उगाचि अधरी न धरावी ।
एक वेळ मज ते विकरावी ॥४०॥
चोज काय भुवनत्रयपोटी ।
वाहसी नगतसा नग बोटी ॥
ते असो अणुसमान मनाया ।
वागवी निजपदी यदुराया ॥४१॥
हे रजोयुत इला न शिवावे ।
हेम मानुनि तुवा निजभावे ॥
द्रौपदी पटशतावृत केली ।
बा तुझी अतुल किर्ति उदेली ॥४२॥
पद
प्राणविसाव्या रामा येसील कधी निरखति जै तुज डोळे ॥ विश्राति तयि ॥ध्रु०॥
कोणी रामरघूत्तमराघव वदता ऐसी वाणी ॥
गमते मजला आला कार्मुकपाणी ॥
निरखु तुजला ह्रदयि धरुनि सिराणी ॥
धावे उगला ॥१॥
निटिल तटीवरि ठेउनि बाहे भरल्या नेत्रनिडारे ॥
मी वाट तुझी पाहातसे अविचारे ॥
ये राघवजी; तुजविण असुनिहि सारे ॥ हा जीव न जी ॥२॥
रघुपतिपंडित भज अखंडित असता नुसता रुससी ॥
या कोपभरे किति मान वरवत अससी हे सांग खरे ॥
भावे धरिता दिससी हे काय बरे ॥
प्राणविसाव्या रामा ॥३॥
देवेंद्र जे रिचविलाच वलाहकाते ।
तै गोकुळावरि तुवा धरिले नगाते ॥
केले सुखी सकळ गोकुळगोप पाही ।
भक्तैकबांधव हरी तुजवीण नाही ॥४३॥
पोहे पसाभर करी तुज दे सुदामा ।
पोहे तयास्तव तया सदनी सुदामा ॥
तो नांदला सम जया सुरराज काही ।
भक्तैकबांधव हरी तुजवीण नाही ॥४४॥
वाचावया विजयवीर उपाय केला ।
भीष्मासमीप पणही तृणतेस नेला ॥
सारथ्य सांग रचिलेच रथी तुवाही ।
भक्तैकबांधव हरी तुजवीण नाही ॥४५॥
नाटोपतां मगधराज वृकोदराने ।
पाहून खूण समजूनि तुझ्या कराने ॥
केली पदी मग धरूनि विदीर्ण देही ।
भक्तैकबांधव हरी तुजवीण नाही ॥४६॥
जागा तुवा करविला मुचुकुंद तो की ।
काळासही करुनि भस्म निजावलोकी ॥
राहे सुखी तुज विलोकुनि मुक्तिगेही ।
भक्तैकबांधव हरी तुजवीण नाही ॥४७॥
पद
घोर हे उपेक्षा माझी आदरिली काय मुकुंदा ॥ध्रृ०॥
धांवलासि सजणा स्मरता संकटी प्रल्हादासाठी ॥
पावलासि पांचाळीते नेसविल्या अशुककोटी ॥
न दिसे ते तांतडि मोठी करुणा ये ना कां पोटी ॥
करुणावरुणालय हे गोविंदा ॥१॥
इंदिराकळवा इंद्रे वर्षता घनघनधारा ॥
गोवर्धन उचलुनि केला त्वां गोकुळलोका थारा ॥
रजनीनायककुलहीरा ॥
रजनीदिन मी यदुवीरा ॥
भजनी तव तत्पर टाकुनि धंदा ॥२॥
जेवढी अगण्ये दुरिते म्या केली प्रतिफळ घटिका ॥
तेवढीहि जरि भोगविसी तरि कैसी मात्मज सुटिका ॥
कमलासन मन्मथजनका ॥
कमलानन यादवतिलका ॥
विमला परिपलित नृप मुचुकुंदा ॥३॥
वंचनाचि अवघी मजसी करिसी तू सुरवरवरदा ॥
कांचनांबरा हरि आता येरे बा नवकुंदरदा ॥
दीनोद्धारक या बिरदा ॥ राखी गतिविजितद्विरदा ॥
रघुनायकपंडितचित्सुखकंदा ॥४॥
नाहीस काय मजमाजि जगन्निवसा ।
हा मान तो तुज अलिप्तपणे तमासा ॥
येणेपरि परिसता अति दीनवाणी ।
भक्तापुढे प्रगट होय रथांगपाणी ॥४८॥
लक्ष्मीते ह्रदयी धरी तिजसवे
श्रीवत्सहीश्रीहरी ॥
हस्ती कंबुसुदर्शनांबुजगदा
हे आयुधे स्वीकरी ॥
शोभे विष्ठुर थावरी निवसला
सोनेसळा नेसला ॥
आला नीरधराभिराम निकटी हस्तींद्र उल्हासला ॥४९॥
माथां दिव्यिं करीरनीरनिटळी
कस्तूरि विस्तारली ।
कंठी कौस्तुभकांति शाङ्र्गलतिका
अंसस्थली थारली ॥
सांगाती चतुराननादि बिरुदे ।
गाती असा भासला ।
आला भक्तजनैकबांधव हरी ।
हस्तीन्द्र उल्हासला ॥५०॥
कर्णी कांचनकुंडले तळपती
तेजे कपोलांकणी ।
केयूरे भुजपारिजात फुलले
माजी क्वणत्किंकिणी ॥
पायी नूतन नूपुरे कलरवे
भासे सवे बोलिला ॥
आला भक्तजनैकबांधव हरी
हस्तींद्र उल्लासला ॥५१॥
पद
श्रीहरि धणिवरी देखिला ॥ मनि रेखिला ॥
सखा लेखिला माझा भक्तिरसे केला अखिला राजि राखिला आजि यादवराजा ॥धृ०॥
पुनवेचा चांद विराजतो ।
तर्हि लाजतो मुख दर्पण तैसा कुंडलमणिगणि साजतो करुनि साज तो । यदुराज तो ऐसा ॥१॥
गीतगमकगति सुंदरि कंबुकंधरि त्रिवळी धरिताहे हार उरी सरसोदरी शशिसोदरी तीस आदरि पाहे ॥२॥
सरळ भरि भुजालता । सविशा लता फुलता तिनगानी कल्पतरूसम शोभता कर लाभता लोभतावरदानी ॥३॥
उदरी जगत्रय थारले नवल थोरले त्रिवळीस्तव भासे । नाभिसरोज विकासले । ज्याते पोसले विधिलेकरू हांसे ॥४॥
कास कसुनि सोनेसळा बाप नेसला । तेणे गुल्फपावेतो मुदा मुनिजनि सेविला । ह्रदयी ठेविला पद झेपावतो ॥५॥
सुमसम कोवळे पावले । भक्ता पावले । ज्याच्या निजनखचंद्रे संतचकोर भले । भले सुख पावले । रघुनाथ कवींद्रे ॥६॥
तो पूजिला गजवरे वरि वारिजाते ।
देवे करी उचलिला करपारिजाते ॥
चक्रेकरूनि खळनक्र विदारिजेला ।
आत्मानुरक्त निजभक्त विमुक्त केला ॥५२॥
इंद्रद्युम्नाभिधानद्रविडकुलमणी
पांड्यराजा हरीते ।
ध्यातां मौनस्थ होता तव घटजमुनी
क्रुद्ध बोले तयाते ॥
माझे आतिथ्य कैसे न करुनि धरिले
ध्यान हे काय मस्ती ।
यासाठी शाप घेयी विचरसिल वनी
मस्त होसील हस्ती ॥५३॥
राजेंद्रे नम्रभावे उपरि विनविता
बोलिजेते ऋषीने ।
हूहूगंधर्व काही चुकत तंव तया
शापिले देवलाने ॥
तो जाला नक्र तोयी धरिल तुज तदा
मुक्ति दोघां तुम्हांते ।
शौरी देयील ऐसे कलशभव वदे
जाइ हो स्वस्थळाते ॥५४॥
तो हा श्री गजराज यासि दिधली
देवे सरूपस्थिती ।
नक्राते शिवतांच होय मग तो
गंधर्व दिव्याकृति ॥
स्वामीचे गुण गाय पाय नयनी
पाहे धरी अंतरी ।
पावे उत्तम लोक, पाहुनि तया
आश्चर्य केले खुरी ॥५५॥
तै समुदाय सुमनाचे
हरिवरि वरिसाव करि सुमनाचे ॥
भेरीसख कराया ।
विलंब कैचा असेल नृपराया ॥५६॥
गजवर निजरूपे धन्य केला मुकुंदे ।
स्ववसतिसहि नेला चित्सदानंदकंदे ॥
इतर गज पळाले साधिले काय तेही ।
सुलभलभ तयांला श्रीहरी होत नाही ॥५७॥
श्रीमद्भागवतांतरंगचतुरा-
ध्यायी महाकौतुके ।
राजेंद्रास गजेंद्रमोक्ष पहिले
जो बोलिजेला शुके ॥
जो गाता अवधारिता सुखकरी
ते मुक्ति नांदे करी ।
तो शोभे रघुनाथपंडित निज-
व्याहारकाव्यांतरी ॥५८॥
॥समाप्त॥