आम्हातुम्हांस भववारिधिमाजि तारू ।
जे वाचिता परिसिता मग होय तारू ॥
जे दासबोधरचना घडली जयाला ।
वंदू निरंतर तया गुरुराजयाला ॥१॥
वैराग्यभाग्य भरले असता अनन्या ।
आल्या जयाप्रति चतुर्विध मुक्तिकन्या ॥
चौथी तयांत वरिली उरल्या न पाहे ।
तो आमचा गुरु समर्थ समर्थ आहे ॥२॥
श्रीरामदासगुरु शांतिवधूस अंगी ।
अंगीकरूनि मिरवे स्वसुखातरंगी ॥
रंगी उभा कर उभारुनि वंदनाचे ।
नाचे मुखी गुण वदे रघुनंदनाचे ॥३॥
खेळावयास हनुमंत गडी जयाचे ।
जो या महीवरि वतंस जितेंद्रियाचा ॥
ज्याची पदे प्रणमितात कवींद्र राजे ।
श्रीरामदास गुरु तो अमुचा विराजे ॥४॥
जो डोंगरी गिरिदरी फिरता न भागे ।
ज्याची पवित्र घन कीर्ति जनी विभागे ॥
जो तत्त्वबोधकविता करिता न मोजी ।
तो रामदास गुरुवर्य नमो नमो जी ॥५॥
शोभे शतद्वय समास समासभारी ।
जो दासबोध निजबोधसुखा उभारी ॥
त्या सेवटी दशक जोडित जो विसावा ।
श्री रामदास गुरु तो अमुचा विसावा ॥६॥
चिदबोधसेज अरुवार नव्या फुलांची ।
सायुज्यमुक्ति ललना असता जयाची ॥
तो रामदास अकळत्र असे गणावे ।
अज्ञान होत जन काय तया म्हणावे ॥७॥
जो लेखणीसहित कागद दौति वाहे ।
तो दंड सद्गुण उदंड जयांत आहे ॥
हस्ती तयासि मिरवी फिरवी विनोदे ।
श्रीरामदास गुरु तो नमिला प्रमोदे ॥८॥
जो भर्जरी सरस पाटलवर्ण चेले ।
शोभे जयास लघुसे निटळी अवाळे ॥
बोले समर्थ रघुवीर समर्थ ऐसे ।
तो मी स्तवीन निजसद्गुरु वाग्विलासे ॥९॥
जेणे प्रशिष्य निज शिष्य अनेक केले ।
देता प्रसाद कफनी कफ नीट जाले ॥
लोकाभिरम गुण बोलत राम कर्ता ।
साष्टांग वंदन करीन तया समर्था ॥१०॥
श्रीरामदासगुरुवर्णनरूप पद्ये ।
वृत्ते वसंततिलका सुजनैकह्रद्ये ॥
संख्या करूनि दशकावरि एकतेने ।
केली अपूर्व रघुनायकपंडिताने ॥११॥