॥ॐ॥
॥श्री गणेशाय नमः॥
॥श्रीसत्याम्बादेवतायै नमः॥
॥श्रीगुरुभ्यो नमः॥
आमच्या हिंदू धर्मात विविध कारणांसाठी वेगवेगळी व्रतवैकल्ये सांगितलेली आहेत. ही व्रतवैकल्ये शुद्ध मनाने, पूर्ण श्रद्धेने व विधिपूर्वक केल्यास त्यांचे अपेक्षित फल मिळाल्याशिवाय रहात नाही.
श्रीसत्याम्बादेवीचे व्रतही या प्रकारे केल्यास व्रतकर्त्याचे सर्व मनोरथ निश्चितपणे पूर्ण होऊन त्याची प्राप्त संकटापासून मुक्तता होते व त्यास सुख, समाधान व आनंद यांची निश्चित प्राप्ती होते असा अनेक व्रतकर्त्यांचा रोकडा अनुभव आहे.
सत्याम्बादेवी कोण ?
आता प्रथम वाचकांना श्रीसत्याम्बा देवीची थोडक्यात माहिती सांगणे आवश्यक आहे.
श्रीसत्याम्बा म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून जगन्माता दुर्गा किंवा जगदम्बाच होय. महर्षी व्यासांनी लिहिलेल्या 'देवी भागवत' पुराणात हिच्या पराक्रमाचे वर्णन वाचावयास मिळते. ईशशक्ती ही निर्गुण निराकार असली तरी भक्तांवरील प्रेमाखातर तिला सगुण रुपात साकार व्हावे लागते व आपल्या भक्तांना दर्शन देऊन त्यांचे मनोरथ पूर्ण करावे लागतात. ही शक्ती सगुण रुपात साकार झाल्यानंतर तिच्या प्रसन्नतेसाठी तिचे भक्त तिला सहस्त्रावधि नावे देऊन आपले तिच्याविषयीचे प्रेम प्रकट करीत असतात. श्रीदुर्गादेवी म्हणजेच श्रीसत्याम्बा, हिलाही अनंत नामे आहेत, तिची अनंत रुपे आहेत. तिचे गुणही अनंत आहेत.
ही देवी दुर्गा, चामुण्डा, वाराही, लक्ष्मी, विमला, बहुला, नित्या, वनदुर्गा, मातंगी, कालरात्री, कुमारी, शिवदूती, मधुकैटभन्त्री, सावित्री, परमेश्वरी, कात्यायनी, ब्रह्मवादिनी अशा विविध नावांनी ओळखली व आळवली जाते.
'श्रीसत्याम्बा' मधील 'सत्य' शब्द हा ब्रह्मवाचक आहे. 'जे सतत असते तेच सत्य !' ईशशक्ती शिवाय दुसरे काहीच सत्य नाही. तर अम्बा याचा अर्थ आई किंवा माता. देवी जगन्माता आहे. कारण तिच्या पासूनच अखिल ब्रह्मांडाची उत्पत्ति आहे. अशाप्रकारे 'सत्याम्बा' हा शब्द निर्माण झाला. हीच श्रीसत्याम्बा महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वति असून वेगवेगळ्या कार्यासाठी तिने ही विविध रुपे धारण केलेली आहेत. हिचे स्मरण आणि पूजन अत्यंत पुण्यप्रद असून साधकांचे सर्व मनोरथ त्वरित पूर्ण करणारे असल्याने हिचे व्रत नियमाने करणे मनुष्यमात्राच्या हिताचे आहे.
व्रत कसे करावे ?
श्रीसत्याम्बा व्रताचा विधि अतिशय सोपा आहे. हा व्रतविधी सूर्य संक्रांतीच्या दिवशी, म्हणजेच सूर्य ज्या दिवशी नव्या राशीत प्रवेश करतो त्या दिवशी किंवा अष्टमी पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार या दिवशी करावा. परंतु मन प्रसन्न असेल अशा अन्य दिवशीही करण्यास हरकत नाही.
त्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान वगैरे उरकावे व कायावाचा मनाने देवीचे स्मरण व पूजन करावे. व्रताचे फल त्वरित मिळण्यासाठी व्रतकर्त्याने शास्त्रात सांगितलेल्या यम-नियमांचे पालन करणे मात्र फार आवश्यक आहे. कारण त्यायोगेच मन शुद्ध होऊन त्या ईशशक्तीशी मनाने संबंध जोडणे लवकर साधते व त्या शक्तीची कृपाही त्वरित होते.