लावणी - अक्रुर

अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला.


अक्रुरा गोपी आक्रंदती हरीप्रति ठेवा । मथुरेशीं नको नेऊं पहारे मथुरेशीं नको नेऊं आमचा प्राणविसांवा ॥ध्रृ०॥

येऊन गोकुळी अवतरला दीनबंधु । तेपासुनि अवघे आनंदले गोपबंधू त्रैलोक्यामाजी दुमदुमिला आनंदु ।

हें क्षीर सागरिचें निधान ब्रह्मानंदु । हा भक्तांना कनवाळू गोकुळाबाई । अक्रुरा याविना गोपी धृतराष्‍ट्र न दिसे कांहीं ।

मथुरेशीं कसा नेतां समुद्रजावाई । या हरिवांचुनि आम्ही मृत्यु पावलों लवलाही । हा पुतनारी घननीळ हत्तीचा छावा । आमचा प्राणविसांवा ॥१॥

मथुरेशीं कंस कसा रिपु निर्मिला हरिचे साठीं । धाडिलें तुम्हातें आणावया जगजेठी । अक्रूर पण तुम्ही क्रूर भासतां पोटीं ।

निष्‍ठुर हा तुमच्या ह्रदयीं विषाच्या गोटी । आधीं समस्त गोपींचें प्राण वधावे । मग स्वस्तिक्षेम मथुरेशीं हरीला न्यावें ।

हरि गेल्यावर राहुन आम्ही काय करावें । म्हणुनि स्वहस्तें आम्हाशीं मारुनि जावें । या मुरारीचा दचका प्राणाशीं नसावा । आमुचा प्राण० ॥२॥

अक्रूर म्हणे पुरुषोत्तम सर्वां ठायीं । भरुनि उरलासे तुम्हाशीं ठावा नाहीं । हा जळिं काष्‍ठीं पाषाणीं शेषशायी ।

कंसालागी हरी हा वधील एके धाई । ही तुम्हास भासती याची लहान पराई । परि हा प्रळयाग्नि कैक बांधिल पायीं ।

हा सर्वांचा देह असुनि विदेही । गोपीहो तुम्हाला भ्रांत पडली एव्हां । आमचा प्राण० ॥३॥

अक्रुरा तुम्हि इतुकें बोललां असत्य । कळलें ये समयीं तूं कंसाचा भृत्य । वचनें ऐकुनी गोपी चित्तीं वनवास जाला ।

अक्रुरा काननीं कसें मोकलिलें गोपिकांला । जननी मृत्तिका फाकिती प्रयळ झाला । मालणी कैक प्राशिती विषाचा प्याला ।

फंदि अनंत म्हणे ह्रदयीं हरि बसवा । आमचा प्राणविसांवा । मथुरेशी नको नेऊं अक्रुरा पहारे । मथुरेशीं नको नेऊं आमुचा प्राणविसावा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 24, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP