केकावली - प्रसंग ५

केकावली हे उत्कृष्ट वीणाकाव्य तसेच ध्वनीकाव्य आहे. केकावलीतील मुख्य रस भक्ति असून करून रस त्याचा अंगभूत आहे.


(सीतेप्रमाणे मजवरही दया करा, अशी प्रार्थना)

तयी प्रभुवरा ! तसे सदय; कां असे ? आज हो !

विचारुनि पहा बरे निजमनी महाराज ! हो !

वनोवनि फिरा पिशापरि; म्हणा अहोरात्र ’हा’ !

नसे कुशळ भाषणी, परि असे कृपापात्र हा ॥८१॥

समागम तुझा घडो म्हणुन जाहले लाकडे

तपोनळि, तसे मुनि त्यजुनि, जोडिली माकडे; ।

अयुक्त बहु ज्या जनास्तव घडे, पडे सांकडे,

तदुक्तिहुनि आमुचे बहुत बोलणे वाकडे ॥८२॥

’जगत्रयमनोहरा ! बलगुणैकरत्‍नाकरा !’

म्हणे ’कनकरंकु द्या मज, महा प्रयत्ना करा.’ ।

प्रियाहि अशि जाहली तुज कुकार्य आज्ञापिती;

सुधा त्यजुनि कामुक प्रकट अंगनाज्ञा पिती ॥८३॥

स्वदास समयी जपे, तरि न दे वरा, चाकरी

चुके न, परि सार्थक श्रम न देवराचा करी; ।

वदेहि भलतेचि; ते तिसचि, कोप टाका, पुसा;

असे मृदु, म्हणोनि बा ! मज न धोपटा कापुसा ॥८४॥

(आवड गोड-कृष्णावतारकथा)

न जे प्रिय, सदोष ते; प्रिय सदोषही चांगले.

स्वतोक पितरां रुचे, जरिहि कर्दमी रांगले ।

तुलाचि धरि पोटिशी कशि तदा यशोदा बरे ?

जरी मळविशी रजोमलिनकाय तू अंबरे ॥८५॥

तुझे कथिति गोपिका विविध तीस बोभाट, ते

सुखप्रद गुणस्तवापरिस जाहले वाटते; ।

क्षमा न करि एकदा, तरिहि फार खोडी करा;

न देचि भय, ताडनोद्यमसमेत सोडी करा ॥८६॥

जरी म्हणसि बांधिले, तरि न कष्टवीले; करा

विचार, जशि कष्टवा तशि न कष्टवी लेकरा; ।

यथेष्ट पुरते जरी प्रथम दाम, का सांधिती ?

न ती प्रबळ गोपिका; तुज तुझी दया बांधिती ॥८७॥

(भगवन्निषुरता क्षणिक व केवळ भक्तकल्याणार्थ असते.)

तुम्हीहि बळि बांधिला म्हणुनि आमुची माय जी

मनांत सहजा दया, निपट टाकिली काय ? जी ! ।

सकोप दिसती गुरु क्षणभरीच; जे तापले

जल ज्वलनसंगमे, त्यजि न शैत्य ते आपले ॥८८॥

(भगवंताची सदयता)

प्रसिद्ध तुमचे महासदय पाय; जीवांकडे

चुकी, म्हणुनि होतिल क्षणहि काय जी ! वांकडे ? ।

न निष्ठुर पिता; म्हणे मनि ’न हो प्रजा टोणपी;’

अपथ्यरुचि रुग्ण तो कटुक ओखदे कोण पी ? ॥८९॥

असंख्य खळ संगरी निजकरी तुवा मारिले;

न निष्ठुरपणे, कृपा करुनि ते भवी तारिले; ।

जगज्जनक तू, मुले सकळ जीव, या भातुके

दटावुनिहि देशि बा ! अमृत नेदिजे घातुके ॥९०॥

(भगवत्कथाप्रशंसा)

कथा श्रवणचत्वरि जरि पुनः पुन्हा ये, रते

महारसिक तद्रसी, विटति ऐकता येर ते; ।

विलोकुनि विलासीजन पुनःपुन्हां कामुका

वरी प्रकट शांतिला धरि, परंतु मीना बकी

गिळि; तशि तुला टपे सुकृतबुद्धिहीना बकी; ।

जिणे गरळ पाजिले; अमृत पाजिले तीस ता;

खळासि न दिसो भलेपण, खरे भल्या दीसतां ॥९१॥

(देवच खरा सदय पिता)

सदाहि हित नायको; बहु अपाय केले, करू;

तरी सकृप बाप तू म्हणसि, ’नायके लेकरू;’

कधी न करिसी प्रभो ! भजकबाळकोपेक्षण;

न तूजवरी ज्यापरी पशुपपाळ कोपे क्षण ॥९२॥

खरा जनक तू, जना इतर कोण हो ! देव वी ?

समीहित फळे जगा तव पदाब्ज दे, देववी; ।

अशीच करुणा असो हरि ! कधी न भंगो पिता;

अशा मज असाधुला इतर कोण संगोपिता ? ॥९३॥

सुविद्य, धन मेळवी, वचन आयके, आवरी

प्रपंच, भर घे शिरी, करि कृपा पिता त्यावरी; ।

असा जरि नसे, रुचे तरि न तो अभद्र क्षण;

तसा तुजचि आवडे; करिसि तूचि तद्रक्षण ॥९४॥

(मातृमहिमा)

पिता जरि विटे, विटो; न जननी कुपुत्री विटे;

दयामृतसार्द्रधी न कुलकज्जले त्या किटे; ।

प्रसादपट झांकिती परि परा गुरूचे थिटे;

म्हणूनि म्हणती भले ’न रिण जन्मदेचे फिटे ॥९५॥

(भगवत्कृपा हीच खरी माता)

विटेल जननीहि की शत रची निमित्ते विधी;

मळे कलियुगी श्रुती जशि, खळी तिची तेवि धी ।

कदाचित विटेल; बा ! तव दया न दीनावरी;

जशी जगदघक्षयी कर भवन्नदी नावरी ॥९६॥

कृपाचि जननी तुझी; सकल जीव दायाद; या

तिणेचि उपदेशिल्या करिति सर्व दाया दया; ।

असे उमजता भले न गुरुभाव तो टाकिती;

मता तुजहि गोपिका, मग जनास तोटा किती ? ॥९७॥

(देवाची कृतज्ञता)

भरोनि कुचकुंभ जी विपरसे मुखी दे बकी,

प्रभो ! तिसहि ठेविशी, जशि महासुखी देवकी; ।

न होति जननी कशा पशुपदार, गाई ? लया

न पावतिच तत्सुखे, कृति न कोण गाईल या ? ॥९८॥

अशी तरि कृतज्ञता हरि ! तुझ्याच ठायी अगा !

सख्या ! अणुचि मानिशी, करुनि सुप्रसादा अगा ! ।

भुले सुकविवाग्वधू तव गुणा अनर्घ्यानगा;

म्हणेल जन कोण, की यश पुनःपुन्हा ते न गा ? ॥९९॥

तुम्ही बहु भले, मला उमज होय ऐसे कथा;

कसा रसिक तो ? पुन्हा जरि म्हणेल आली कथा; ।

प्रतिक्षण नवीच दे रुचि, शुकाहि संन्यासिया;

न मोहिति भवत्कथा अरसिका अधन्यासि या ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : August 19, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP