सदाश्रितपदा ! सदाशिवमनोविनोदास्पदा !
स्वदासवशमानसा ! कलिमलांतका ! कामदा !
वदान्यजनसद्गुरो ! प्रशमितामितासन्मदा !
गदारिदरनंदकांबुजधरा ! नमस्ते सदा. ॥१॥
पदाब्जरज जे तुझे, सकलपावनाधार ते
अघाचलहि तारिले बहु तुवांचि राधारतें; ।
अजामिळ, अघासुर, व्रजवधू, बकी, पिंगळा,
अशां गति दिली; उरे न तृण भेटतां इंगळा ॥२॥
तुझ्या बहुत शोधिले अघनिधी पदांच्या रजे;
न ते अनृत, वर्णिती बुध जनी सदाचार जे; ।
असे सतत ऐकते, सतत बोलते, मीच ते
प्रमाण न म्हणो जरी उचित माझिया नीचते ॥३॥
तैसाचि उरलो कसा ? पतित मी नसे काय ?
की कृपाच सरली ? असेहि न घडे जगन्नायकी ।
नसेन दिसलो कसा ? नयन सर्वसाक्षी रवी,
विषाद धरिला म्हणो ? न सुरभी विषक्षीर वी ॥४॥
व्रजावन करावया बसविले नखाग्री धरा;
सलील तइं मंदारख्यहि नग स्वपृष्ठी धरा; ।
वराहतनु घेउनी, उचलिली रदाग्रे धरा;
सुदुर्धर तुम्हां कसा पतित हा ? न का उद्धरा ? ॥५॥
नतावनधृतव्रत ज्वलन तूचि बाधावनी;
पदप्रणतसंकटी प्रजव तूचि बा ! धावनी; ।
दया प्रकट दाखवी कवण सांग त्या वारणी ?
सतीव्यसनवारणी ? जयजयार्थ त्या वा रणी ? ॥६॥
सुपात्र न न रमाहि यद्रतिसुखास दारा परी,
असा प्रभुहि सेवका भजसि खासदारापरि; ।
प्रियाकुचतटी जिही न बहुवार पत्रावळी,
तिही अमित काढिल्या नृपमखांत पत्रावळी ॥७॥
न पावसि, म्हणोनि मी म्हणतसे तुला आळशी;
वरी न असदुक्ति हे रविसखोत्थिता आळशी ।
असंख्य जन तर्पिले, क्षुधित एकला जेमनी
चुकेल, तरि त्यास दे, परि वदान्य लाजे मनी ॥८॥
अंगा ! प्रणतवत्सला !' म्हणति त्या जनां पावलां;
म्हणोन तुमच्याच मी स्मरतसे सदा पावला ।
करू बरि कृपा, हरू व्यसन, दीन हा तापला.'
असे मनि धरा; खरा भरवसा मला आपला ॥९॥
(गंगेचे सामर्थ्य )
मला निरखिता भवच्चरणकन्यका आपगा
म्हणे, 'अगइ ! ऐकिलेहि न कधी असे पाप गा ! ।
कर श्रवणि ठेविते, नुघडि नेत्र, घे भीतिला;
न घालिन भिडेस मी, जरिहि कार्यलोभी तिला ॥१०॥
(अन्यदेवतांचे सामर्थ्य)
सदैव नमिता जरी पद ललाट केले किणे,
नसे इतर तारिता मज भवत्पदाब्जाविणे;
नता करुनि मुक्तही म्हणसि 'मी बुडालो रिणे,'
अशा तुज न जो भजे मनुज धिक् तयाचे जिणे ! ॥११॥
(भगवद्दर्शनार्थ प्रार्थना)
पटुत्व सकलेंद्रियी, मनुजता, सुवंशी जनी,
द्विजत्वहि दिले भले, बहु अलभ्य जे की जनी; ।
यशःश्रवणकिर्तनी रुचि दिली; तरी हा 'वरा'
म्हणे 'अधिक द्याच की,' अखिल याचकी हावरा ॥१२॥
असे न म्हणशील तू वरद वत्सल, श्रीकरा !
परंतु मज भासले म्हणुनि जोडितो मी करा; ।
दिले बहु बरे खरे, परि गमे कृपा व्यंग ती.
अलंकृतिमती सती मनि झुरे, न जो संगती ॥१३॥
कराल पुरती दया, तरि असो दिले पावले;
परंतु हरि ! एकदा त्वरित दाखवा पावले; ।
प्रसाद करणे मनी जरि नसेल, हे आवरा;
जया बहु तयास द्या, मज कशास ? मी हावरा ॥१४॥
(सलगीचे भाषण.)
'दिले, फिरुनि घेतले,' अशि अकीर्ति लोकी न हो;
सुनिर्मल तुझी पदे कधि तरी विलोकीन, हो ! ।
निजप्रियजनाकडे तरिहि दे हवाला; जशी
पडेल समजाविशी, तशि करोत; कां लाजशी ?॥१५॥
(पश्चात्ताप)
अहा ! निपट धृष्ट मी; प्रभुवरासि 'कां लाजशी ?'
म्हणे; तुज नसो तशी विकृति, भाविकाला जशी ।
परंतु अपराध हा गुरु, म्हणोनि शिक्षा करी;
असेचि धरिली नयच्युतदमार्थ दीक्षा करी ॥१६॥
(स्वतःचे पातित्य)
सदैव अपराध हे रचितसे असे कोटि, गा !
स्वयेहि कथितो, नसे तिळहि लाज, मी कोटिगा; ।
अजांडशतकोटि ज्या उदरि सर्वदा नांदवा,
न त्यांत अवकाश या ? स्थळ दिले तदा का दवा ? ॥१७॥
तुझ्या जिरविले बहु प्रणतमंतु पोटे, पण
त्यजी मदपराध, हे मजकडेचि खोटेपण; ।
दवाग्नि जठरी अतिक्षुधित, त्यास हे अन्न द्या;
वितृष्ण करिती श्रितां तुमचिया दयासन्नद्या ॥१८॥
(भगवंताचे पतितपावनत्व)
न होय कवणाहि, ते तुमचियाचि लीलालसे
पदे चरित दाविजे त्रिजगदब्जकीलालसे; ।
मदुद्धरण मात्र कां जड तुम्हां दिसे ? वारिती
स्वकव्यसन मर्त्यही, न करितीच सेवा रिती. ॥१९॥
(भगवत्कारुण्य)
दयाब्द वळशील तू, तरि न चातका सेवकां
उणे किमपि; भाविकां उबगशील तूं देव कां? ।
अनन्यगतिका जनां निरखितांचि सोपद्रवा,
तुझेचि, करुणार्णवा ! मन धरी उमोप द्रवा. ॥२०॥