१
भरल्या बाजारांत भरणी आलीया रताळ्याची
मला आगत गोताळ्याची
२
अंगडया टोपडयाचा बाजार कवां झाला
रात्री भडंग्या मामा आला
३
माझा अंगलोट बहिणाई तुझ्यावाणी
एका झर्याच प्यालो पाणी
४
आम्ही दोघी बहिणी एकाच चालणीच्या
लेकी कुना मालनीच्या
५
अक्काची ग चोळी येते माझ्या अंगा
आम्ही दोघी बहिणी एका वेलाच्या दोन शेंगा
६
माऊलीपरास आशा थोरल्या बहिणीची
चोळी फाटली ठेवणीची
७
मावळा इच्यारतो भाचीबाईचा कंचा वाडा
हायती चांदसूर्य कवाडा
८
मामाच्या पंगतीला भाचा बसला नटवा
दृष्ट व्हईल उठवा
९
मेहुना राजस माडीचा कडीपाट
माझी बहिणाई जिन्याची चवकट
१०
मेहुन्याच नात नका शिरू आडरानी
मी तुमच्या धाकल्या बहिनीवानी
११
आऊक्ष मागत्ये मेहुन्या दाजिला
माझ्या बहिणाईला सुख मेथीच्या भाजीला
१२.
मेहुन्या रजसाचा पलंग अवघड
बहिणाई, कडी धरून वर चढ
१३
बहिनीच्या गांवा जाते, माझा चढानं पाय पडे
बहिणाई माझी, जाई शेवंती पाया पडे
१४.
पाची परकाराच ताट घालत्ये सजुरी ऊनऊन
मेहुन्या राजसा जेवा, तुम्हाला पाठची न्हाई भन
१५.
गळा भरीला दागिन्यान, सराला न्हाई जागा
माझी बहिणाई, सुभंदाराला दिली राधा
१६
मेहुना रागस,किती नटशील जमादारा
माझी बहिणाई पंख्यान घाली वारा
१७.
पाटाच ग पानी उसासंग एरंडाला
सांगुन मी धाडी बहिनीकारण मेव्हन्याला
१८
आजोळी जातो बाळ, आजी घेतीया अलाबला
अवखळ नातू एकला कसा आला?
१९.
चुलत भावंड नका म्हनूसा लोक लोक
एका ताईताच गोफ
२०
चुलत भावंड नका म्हनूंसा वंगाळ
एका राशीच जुंधळं
२१.
पाया पडू आली, ओटी भरुया गव्हाची
रानी चुलतभावाची
२२
आईला म्हनु आई , चुलतीला म्हनु आऊ
माझ्या कापाला मोती लावू
२३.
घराला पाव्हणा, अंगनी सुपारीच्या डाल्या
चुलता पुंडाईत झाला
२४.
मावळन आत्याबाई तुमच्या माहयारी माझी सत्ता
तुमचा बंधुजी माझा पिता
२५
मावळ्याच्या घरी भाचीबाईच संवळं
मामी वाढते जेवाया, मामा बसला जवळ
२६.
बंधुजी परायास, भाच्या राघुची आगत
मुदला परायास मला याजाची लजत
२७
पाया पडूं आली भावजई गुजर अंगनात
बंधुजीचं बाळ, हिरा झळकितो कंकनात
२८
मावळन आत्याबाई वाडा तुझा चहुकोनी
भाच्यासंगट कळवंतिणी
२९.
सोनसळे गहुं शेवाई बारा वावु
मायबाई, आला माझा मावळा तुमचा भाऊ
३०
सोनसळे गहु त्याचे प्रकार केले बहु
एका ताटी जेवले साडभाऊ
३१
मला हौस मोठा भाचा मुराळी मला यावा
ऊन लागता पुढं घ्यावा
३२
पाच पकवान करीते ताजंताजं
मामाच्या पंगतीला जेवत बाळ माझं
३३.
मामाच्या पंगतीला भाचा बसला नटुन
गंध लावितो उठून
३४
पाया पडू आली, म्या धरिली वरच्यावर
भावजईच्या कडेला भाचा दुणीदार
३५
भावजय गुजरीच पाया पडण चांगल
हळद्कुंकवान माझ जोडव रंगल
३६
आपुली माया, लोकाची तशी जाणा
धनी किती सांगू, नातू आजोळाला आणा