विक्रमसागर त्याचा बुडवी उत्तर देशाला
लोट तयाचे धडका देती दक्षिण दाराला.
थोप थांबवायाला ती सह्याद्रि पुढे सरला
प्रचंड तो गिरिराज खरा पण आला टेकीला.
करुन चढाई फौजा आल्या भिडल्या दाराला
गड किल्ले कापती साहता त्यांच्या मार्याला.
महाराष्ट्रधर्माचे आहे क्षात्रकर्म बीज
'आब आज जाताहे' राखा भाई हो ! लाज.
शत्रुसंघ पाहता दाट बेछूट शूर होती
शिरा शिरा ताठती, अचाट स्फुरणे संचरती.
समरशूर गर्दीत एक बेधडक भिडुन मिसळे
शत्रुभार संहारकर्म विक्राळ परम चाले.
तुच्छ तनुब्रह्माण्ड चंड संग्रामकैफ चढतो
प्रशंसिता तुंबळ त्वेष लंगडा शब्द पडतो.
डंक्यावरती टिपरी पडली; हुकुम जमायाचा.
चला मराठे चला ! वख्त हा आणीबाणीचा.
हेटकरी मावळे, देशमु, पांडे रणबहिरी,
दरकदार, रामोशि, धारकरि सराईत भारी;
एक एक हंबीर वीर हा वर्णवे न काही
जय करण्याची चिंता अंबा जगदंबा वाही.
स्वधर्मकाव्यज्योति अखंडित तुम्हामुळे जळती,
राख तयांची होती सुरता तुमच्या जर नसती.
प्रबळ शत्रु खेटता तेज ये मुळचे प्रगटोनी
चला दाखवा तया मराठी भाल्याचे पाणी.
धर्मशिळेवर पाय ठेविला तो मागे घेणे
पूर्वजास ते उणे, आपुले हसु होइल तेणे.
पहा पहा ते पितर आपले काय बरे म्हणती-
"आभाळातुन पडला का हो ! तुम्ही धरेवरती ?
"भरीव छात वळीव भुज हे दिले तुम्हा आम्ही
"स्वोदपूर्तीकरिता केवळ आणु नका कामी.
"डोळे वाणी अमुची बघते वदते त्यात तुम्ही
"जीवलतेची नवती अमुची फुलली, तेच तुम्ही.
"स्वप्नाजागरी पडछायेसम आम्ही सांगाते
"करित मोकळे आहो तुमचे विजयाचे रस्ते."
काल बदलला, ध्येय बदलले, पूर्वपुण्य फळले;
अभिनवभारत जन हो ! आता जन्माला आले.
चित्र मागले तुम्हापुढे मी एक उभे केले
ओळख तुमची पटते का हो वदा त्यात पहिले.
चढती दौलत, बढता होवो वेल मराठ्यांचा
जय मराठे ! जय मराठे ! जय बोलो त्यांचा !
नव्या उमेदी, नवे जिव्हाळे, नव्या मराठ्यांचे
नवे भरोसे, नवे कवन हे नव्या उमाळ्याचे